यवतमाळ सामाजिक

श्री हर हर महादेव संस्थान येथे चैत्र नवरात्र महोत्सव

श्री हर हर महादेव संस्थान येथे चैत्र नवरात्र महोत्सव

संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन ; कथा ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी

येथील संभाजी नगर भागातील हर हर महादेव दुर्गामाता संस्थान येथे चैत्र नवरात्री महोत्सव साजरा करण्यात येत असून या महोत्सवानिमित्त संगीतमय शिवपुराण कथेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.अनुपमाताई पिंपळकर यांच्या रसाळ वाणीतून सुरू असलेली शिवपुराण कथा ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

 

चैत्र नवरात्री महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील चैत्र नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार दि.२२ मार्च रोजी यजमानाच्या हस्ते देवीचा महाअभिषेक, गुढी उभारून कलश स्थापना करण्यात आली. त्यानंतर दररोज सकाळी काकडा, गीता पाठ व सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर महाआरती करण्यात येते. दररोज सायंकाळी विविध कीर्तनकारांचे हरीकिर्तन पार पडते. तसेच दररोज दुपारी ह.भ.प.अनुपमाताई पिंपळकर यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय शिवपुराण कथा असते. शनिवार दि.२५ मार्च रोजी या शिवपुराण कथेत शिव-पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी भगवान शंकराच्या वेशभूषा ओम राजूरकर या चिमुकल्याने तर पार्वतीची वेशभूषा खुशी काळबांडे या चिमुकलीने केली होती. तसेच याच कार्यक्रमात दुर्गेश काळबांडे याने श्रीकृष्णाची तर आराध्या बाळापुरे हिने राधेची वेशभूषा केली होती. या चिमुकल्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

शिव पार्वती विवाह सोहळ्या दरम्यान ‘पार्वती बावरी झाली ग महादेवाची नवरी झाली ग’, या गीतावर सर्व भाविकांनी नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. या चैत्र नवरात्री उत्सवासाठी श्री हर हर महादेव दुर्गामाता संस्थान संभाजी नगरचे कार्यकर्ते, तसेच संभाजी नगरवासी परिश्रम घेत आहेत.

Copyright ©