यवतमाळ सामाजिक

नवनाथांचा पदोपदी लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या भिंगारला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटिबध्द व्हा – मिलिंद चवंडके

नवनाथांचा पदोपदी लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या भिंगारला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटिबध्द व्हा – मिलिंद चवंडके

  1. भिंगार – कलीयुगातील अखिल मानवांना शाश्वत सुखाचा आधार देण्याकरिता नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. अलौकिक सामर्थ्यांचे दर्शन घडवत नवनाथांनी जीवनोपयोगी संदेश दिले. हे संदेश आपणास आजही पदोपदी मार्गदर्शक ठरतात. संदेशरूपाने नवनाथांचा लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

येथील नेहरू चौकामधील श्रीचैतन्य कानिफनाथ देवस्थान (आस्थाना)ने आयोजित केलेल्या गुढीपाडवा महोत्सवात दैनंदिन जीवनात नाथांचा आधार या विषयावर ते बोलत होते. श्री.सागर फुलारी यांनी स्वागत केले. श्री.रणजित रासकर यांनी परिचय करून दिला. श्री. नवनाथ भालके महाराजांच्या हस्ते श्री.चवंडके यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मानित करण्यात आले.

श्री.चवंडके पुढे म्हणाले, नवनाथांनी समाजप्रबोधनाचा वसा घेत तिर्थाटन केले. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीकडे लक्ष वेधत अन्नदानाचे अन् भिक्षेचे महत्त्व सांगितले. अन्नदानास नाथसंप्रदायात खुप महत्व आहे ते यामुळेच! नाथांचा आयुर्वेदशास्त्राचा उत्तम अभ्यास होता. समाजातील लोकांची दुःखे दूर सारण्याकरिता ते आपल्या प्रभावी मंत्रशक्तीचा-तप सामर्थ्याचा वापर करत. मंत्र, तंत्र, यंत्र सिध्द करून दुःखितांच्या दुःखावर हळूवार फुंकर घालावी. त्यांना दुःख मुक्त करावे, याचा कृतीशील आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. प्रापंचिकांची दुःखे घालवताना, समस्या सोडवताना प्रपंचात गुंतून न पडता आत्मोध्दार करून घ्या, हे सांगितले. झाडाची तोडलेली फळे पोट भरल्यावर परत झाडास लटकावण्याचा चमत्कार करून दाखवताना निसर्गामधून आवश्यक तेवढेच घ्या, हे गुज सांगत परमात्मा सृष्टीरूपाने नटला आहे या वास्तवावर बोट ठेवले. पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले. गोवरगिरीत जन्म घेऊन गोमातांचे शेण किती पवित्र याकडेही लक्ष वेधले.

 

पंचमहाभूतांचे संघटन आणि विघटन कसे करता येते हे सप्रमाण स्पष्ट केले. मंत्रयोग, लययोग, हठयोग व राजयोग यांच्या सहाय्याने शिवरूप होण्याचे गूढ विषद करत जीवनमुक्तीचे रहस्य निवेदन केले. कडक ब्रम्हचर्य, योगसाधना आणि शिवउपासना यामधून हिंदू धर्माला शुध्दतेच्या उच्च पातळीवर नेले. सदाचाराचे महत्व वाढवले.

 

नगर जिल्ह्यातील गर्भगिरीकडे जाताना नाथ ज्या स्थानी थांबले ती स्थानं आस्थाना म्हणून ओळखली गेली. तिबेटी परंपरेतही स्थान मिळवलेल्या नाथ संप्रदायाने महाराष्ट्रामधील विविध साधना प्रणालींशी समन्वय साधला. मध्ययुगीन भारतीय साधनेची गंगोत्री म्हणून नाथसंप्रदायाकडेच पाहिले जाते. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत बहरलेल्या तंत्रसाधनेवर नाथ संप्रदायाने वेगळेपणाचा ठसा उमटवला. योगप्रधान शिवयुक्त अनुभूतींनाच प्रमाण मानले. वामाचारी विकृत साधनांच्या निर्मूलनासाठी आणि भारतीय धार्मिक जीवनाच्या शुध्दीकरणासाठीच नवनाथ अवतरले. श्रध्देची आणि जिज्ञासेची दिवटी पाजळून नाथांना शरण गेल्यास ते आपल्या दैनंदिन जीवनात पावलोपावली सोबत असल्याचे अनुभवास येते, असे श्री.चवंडके यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.

 

गुढीपाडवा महोत्सवात शंकर महाराज मठ भजनी मंडळ (केडगांव) यांचा हनुमान चालिसा, सनी वाघेला व भजनी मंडळ (दौंड) यांची भजनसंध्या, गुरूवर्य अशोकदादा जाधव (केडगांव) यांचे प्रवचन व त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत श्रीदत्त याग, नवनाथ याग व नवचामुंडा याग करण्यात आले. याग सोहळ्यात ५५ जोडप्यांनी सहभाग घेतला. श्रीकानिफनाथ महामस्तकाभिषेक, पालखी मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा असे कार्यक्रम संपन्न झाले. चैतन्य कानिफनाथ आस्थाना भक्त मंडळ, नवरंग ग्रुप, नेहरु चौक तरुण मंडळ या सर्वांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. गुढीपाडवा महोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली.

दैत्यगुरू शुक्राचार्यांनी तपश्चर्या केल्याने काशीविश्वेश्वर प्रगट झाले ते शुक्लेश्वर स्थान समंगा नदीकाठी भिंगारमध्येच आहे. याच नदीत स्नान केल्याने नारदमुनींचे पुत्र अष्टवक्र यांना अव्यंग देहाची प्राप्ती झाली, या पुराणकथा भिंगारमधील पवित्र स्थानांच्या स्मृती जागवतात. समंगा नदीचा अलिकडे भिंगारनाला झालाय. समंगा नदीस पूर्वीचे पावित्र्य प्राप्त करून दिल्यास भिंगारचा सर्वांगीण विकास होईल. येथील शुक्लेश्वर या नाथपंथी शिवालयाची माहिती पेशव्यांनाही होती म्हणूनच पानिपतकडे निघताना भाऊसाहेब पेशवे यांनी भिंगारचे पाण्याखाली जाणारे शुक्लेश्वराचे देऊळ वर काढून बांधा, अशी आज्ञा दिली होती. त्या आज्ञेचे पालन न झाल्याने आजही हे मंदिर पावसाळ्यात पाण्यात जात असल्याचे दिसते. भृगूऋषींची तपोभूमी असलेले, नाथांच्या, दिनकरस्वामींच्या, चक्रधरस्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले हे गाव. भिंगारला आध्यात्मिक वैभव प्राप्त करून देण्याकरिता तरूणांनी कटीबध्द व्हावे, असे आवाहनही श्री.चवंडके यांनी केले.

Copyright ©