महाराष्ट्र सामाजिक

तपासणी व नोंदणी शिबिराचा 3 हजार 600 दिव्यांगांनी घेतला लाभ

वर्धा जिल्हा प्रतिनिधी  पंकज तडस

तपासणी व नोंदणी शिबिराचा 3 हजार 600 दिव्यांगांनी घेतला लाभ

जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य तपासणी व नोंदणी शिबिराचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हाभर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात एकुण 3 हजार 639 दिव्यांगांची मोफत साहित्य देण्यासाठी तपासणी करण्यात आली.
तालुका स्तरावर आयोजित या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शवून तपासणी व नोंदणी करुन घेतली. तपासणी केलेल्या दिव्यांगांना केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतीय कृत्रिम अंग निगमच्यावतीने नि:शुल्क साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वर्धा तालुक्याच्या शिबिराचा 951 दिव्यांगांनी उपस्थित राहून लाभ घेतला. आष्टी येथील शिबिरात 405, कारंजा येथील शिबिरात 337, हिंगणघाट तालुक्याच्या शिबिरात 362, देवळी व पुलगाव येथील शिबिरात 591, आर्वी येथील शिबिरात 447, समुद्रपूर येथील शिबिरामध्ये 360, सेलू तालुक्याच्या शिबिरात 286 याप्रमाणे जिल्हाभर एकुण 3 हजार 639 दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अंग साहित्यासाठी तपासणी करुन घेतली.
तपासणी केलेल्यांमध्ये 447 अंध बांधवांचा समावेश आहे. मुकबधीर 613, मतीमंद 206 तर सर्वाधिक 2 हजार 373 अस्थिव्यंगांचा समावेश आहे. तपासणी केलेल्या या बांधवांचे साहित्य तयार होऊन आल्यानंतर त्यांना वितरीत केले जाणार आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे यांनी कळविले आहे.

Copyright ©