यवतमाळ सामाजिक

धाम नदी संवाद यात्रेस उत्साहात सुरुवात

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- पंकज तडस 

धाम नदी संवाद यात्रेस उत्साहात सुरुवात

▪️ नदी काठावरील 45 गावांची परिक्रमा

▪️ सुजातपूर येथे 8 मे ला होईल समारोप

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश असून त्यातील धाम नदीच्या संवाद यात्रेस आज या नदीचे उगमस्थळ असलेल्या कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून सुरुवात झाली. नदीकाठावरील 45 गावांची परिक्रमा करत यात्रा समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे दि.8 मे रोजी समाप्त होईल.

धामकुंड येथे यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी गावचे सरपंच शरद भड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, कारंजाचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पंधरे, नदी समन्वयक सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे, किर्तनकार भाऊसाहेब थुटे, माजी जिल्हा परिषद सभापती गोपाळराव कालोकर, उमाकांत तायवाडे आदी उपस्थित होते.

धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या गायमुख व भामकुंड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जैवविविधता, जलस्त्रोत, प्राणी, पक्षी, नदीची स्थिती आदींची गावक-यांकडून माहिती घेण्यात आली. त्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात नद्या स्वच्छ, सुंदर व अमृतवाहिनी होण्यासाठी गावक-यांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचे मंगेश वरकड यांनी सांगितले. गावक-यांच्या सहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

किर्तनकार भाऊसाहेब थुटे यांनी ज्याला ज्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे, असे सांगितले. मुरलीधर बेलखोडे व सुनील रहाणे यांनी चला जाणूया नदीला अभियान व धाम नदी संवाद यात्रेची सविस्तर माहिती दिली. गावक-यांनी या अभियानात सहभागी होणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शरद भड, मंगेश पंधरे, गोपाळराव कालोकर, उमाकांत तायवाडे यांची देखील भाषणे झाली. यावेळी जलजागृती रथाचा सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. जलजागृती रथ व गावक-यांची जलजागृती रॅली देखील काढण्यात आली. यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मंडळ अधिकारी सिध्दार्थ लभाने, वनरक्षक शफी पठाण, ग्रामसेवक नामदेव ढोबाळे, तलाठी मंजुषा दाळवणकर, युवा स्वयंसेवक काजल रोकडे, अजय रोकडे, शेजल पोहणकर, विजय अढाव उपस्थित होते.

Copyright ©