यवतमाळ सामाजिक

ओलावा’ भागविणार मुक्या जनावरांसह पक्षांची ‘तहान’ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पाण्याच्या हौदांसह जलपात्रांचे लोकार्पण

ओलावा’ भागविणार मुक्या जनावरांसह पक्षांची ‘तहान’ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पाण्याच्या हौदांसह जलपात्रांचे लोकार्पण

यवतमाळ – सध्या अवकाळी पावसाची स्थिती असली तरी उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या आहेत. यावर्षी नेहमीपेक्षा अधिक कडक उन्हाळा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुक्या जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या संवेदनेतून येथील ‘ओलावा’ पुशप्रेमी फाऊंडेशनच्या तरूणांनी पुढाकार घेतला. या तरूणांनी एकत्र येत शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे ५० हौद व पक्षांसाठी जलपात्र ठेवून मुक्या जनावरांसह पक्षांची ‘तहान’ भागविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

 

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या मोहिमेतील हौदांचे लोकार्पण करण्यात आले. कडक उन्हाळ्यात रस्त्यावरील जनावरे आणि पक्ष्यांची या उपक्रमामुळे तहान भागेल. यवतमाळातील तरूणाईने संवेदना दाखवून केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी काढले. ‘ओलावा’च्या सदस्यांनी पाण्याच्या बाटल्यांचा वापर करीत पक्ष्यांसाठी जलपात्र स्वत: तयार केले. आज असे ५० जलपात्र शहरात विविध ठिकाणी नागरिकांकडे लावण्यात आले. ज्या व्यक्तींनी दररोज हौद व जलपात्रात पाणी भरून त्यांची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी घेतली त्यांनाच हे हौद व जलपात्र देण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात जनावरे आणि पक्षांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल, अशी अपेक्षा ‘ओलावा’च्या सदस्यांनी व्यक्त्‍ केली.

 

जागतिक चिमणी दिनानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यामागे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या मुक्या जनावरांना आधार देण्याचा हेतू असल्याचे ‘ओलावा’चे सुमेध कापसे यांनी सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पशु, पक्षांना मदत करावी, असे आवाहन ओलावा फाऊंडेशनने केले आहे. नागरिकांना प्राणी कल्याणाबाबत जागरूक करण्यासाठी ‘ओलावा’च्या वतीने जनजागृती मोहीम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमासह फाऊंडेशनच्या वतीने जखमी आणि आजारी जनावरांना वैद्यकीय मदत देखील केली जात आहे. ‘ओलावा’ पशुप्रेमी फाऊंडेशनच्या आजच्या या उपक्रमात कमल बागडी, मंगेश खुणे, सुधा पटेल, ॲड. प्रमोद मुंधडा, घनशाम दरणे, नितीन पखाले, तेजस भगत, डॉ. आलोक गुप्ता, घनशाम बागडी, गौरव जोमिवाले, मयंक अहीर, सुमेध कापसे, कार्तिक चौधरी, कपिल टेकाम, संतोष जाधव, पियूष शर्मा, भूषण घोडके, पवन दाभेकर, प्राजकता गावंडे, नागेश कणाके, कुमार चौधरी आदी सहभागी झाले होते.

Copyright ©