यवतमाळ सामाजिक

युवा शक्तीने आपल्या गावाप्रती जिव्हाळा जपून ग्रामविकासात मैलाचा दगड व्हावे

युवा शक्तीने आपल्या गावाप्रती जिव्हाळा जपून ग्रामविकासात मैलाचा दगड व्हावे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

तेंडोळी येथे राष्ट्रिय सेवा योजना शिबीर संपन्न

परिस्थितीचे लगाम खेचून तिला काबुत करणारी ही युवा पिढी असून कार्याची पताका अखंड फडकावीत ठेवणे हेच या पिढीचे ध्येय आहे आणि ते गाठण्यामध्ये युवा शक्ती यशस्वी ठरलेली आहे. आणि म्हणूनच आता संयुक्त राष्ट्र संघ देश विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना युवा शक्तीने ग्राम विकासासाठी कटीबद्ध होऊन आणि आपल्या गावाप्रती जिव्हाळा जपून गावापासून मला काय मिळते त्यापेक्षा मी गावास काय देऊ शकतो. माझे गाव विकासात काय योगदान आहे ? याचा सारासार विचार करून गावाच्या शाश्वत विकासात एक मैलाचा दगड बनावे असे प्रतिपादन ग्रामपंचायत तेंडोळी चे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले. ते स्वर्गीय राजकमलजी भारती कला,वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी यांच्या द्वारा तेंडोळी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये “युवा शक्तीचे ग्राम विकासातील योगदान” या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ग्रामविकासाच्या प्रक्रियेत येतांना गावाच्या समस्या समजून घेणे महत्त्व महत्त्वाचे आहे. यामध्ये गावाची स्वयंपूर्णता समजून घेणे, वाढीस लागलेले स्थलांतर, गावातील व्यसनाधीनता, गावातील राजकारण, संसाधनाचे केंद्रीकरण व अयोग्य वाटप, शासकीय योजनांचे होणारे धीमे गतीने अंमलबजावणी, लोक सहभाग व श्रमदानाची लोप पावत चाललेली भावना, रोजगार व स्वयंरोजगाराची वाणवा, कौशल्य असलेले मनुष्यबळ गावात शिल्लक नसणे, गावातील रस्ते,पाणी, वीज, आरोग्य, शाळा या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत किंवा नाहीत या सर्व बाबीचा विचार करून व ग्राम प्रशासन व शासकीय योजनांचा अभ्यास करून गावाच्या सर्वसमावेशक शाश्वत आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन तरुणांनी ग्राम विकासासाठी पुढे यायला हवे. तरच गाव आणि गावाच्या विकासासोबत देशाचा विकास साधला जाईल यात शंका नाही.

तसेच त्यांनी यावेळी जल पे चर्चा यावर मार्गदर्शन करतांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचा नियोजन आराखडा समजावून देत पाण्याचा अपव्यय न करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम.अराठे सर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजयकुमार ठेंगेकर, प्रमुख अतिथी म्हणून महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर.पी.टेकाडे मॅडम, परशराम राठोड, शालीक पवार,महादेव शेलोटे, प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत हर्सूलकर यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. समीक्षा काळे हिने केले.

Copyright ©