महाराष्ट्र सामाजिक

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेने घडविली मुंबईची सफर

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेने घडविली मुंबईची सफर

“साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला. पण सगळ्यांत जास्त समाधान वाटले ते तुम्हाला भेटून…’’ हे उत्स्फूर्त शब्द आहेत घाटंजी येथील वृद्ध कष्टकऱ्यांचे.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील कष्टकरी महिला आणि पुरुषांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व वृद्ध कष्टकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.  वृद्ध कष्टकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना ‘एसटी’च्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. वृद्ध, निराधार आणि कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. कष्टकरी आणि वृद्धांना मुंबईची सफर घडवून त्यांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा रसिकाश्रय संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे.

जीवाची मुंबई- गरीब वृद्ध कष्टकऱ्यांची सहल

ज्यांची मुले सक्षम आहेत, त्या वृद्धांनाही अनेकदा कुणी तीर्थयात्रेला नेत नाहीत. स्वत:च्या चकचकीत आयुष्यात अनेक तरुणांना जन्मदातेही नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल? या जाणीवेतून कष्टकरी वृद्धांच्या सहलीचा उपक्रम घेण्यात आल्याचे रसिकाश्रय संस्थेचे महेश पवार यांनी सांगितले.

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

“विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

 

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन 2021-22 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

 

शिक्षणमंत्री श्री.केसरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असते. शासनाने नुकताच 61 हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविला असून, त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण क्षेत्रात यापुढेही अग्रेसर राहण्यासाठी तसेच अधिकाधिक रोजगार निर्माण होण्याच्या उद्देशाने व्यावसायिक शिक्षणावर तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यात भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल कौतुक करून शालेय शिक्षण विभागामार्फत देखील टीसीएस, टीआयएसएस, अमेझॉन आदींसोबत करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतस्तरावर आदर्श महिलांचा सन्मान करणार – मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, “शिक्षकांकडे उच्च गुणवत्ता असून ते निस्वार्थ भावनेने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतात. अशा आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे, हा शासनाचा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या महिला धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर दोन आदर्श महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यातील किमान एक महिला शिक्षक असेल. प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष पुरविणारी भारतातील गुरूकुल शिक्षण पद्धती जगभरात अव्वल होती, याचा उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून राज्यात अधिक गुणवान पिढी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजितसिंह देओल यांनी कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. गुणवत्ता पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी इतरांना प्रेरणा मिळेल असे कार्य करून आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी पायाभूत सुविधांसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, यांचा ज्ञानदानासाठी योग्य वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. 2021-22 यावर्षीच्या 108 पुरस्कार विजेत्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह पुरस्काराची रक्कम दहा हजार रूपये तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिले जाणारे एक लाख रूपये असे एकत्रित एक लाख दहा हजार रूपये पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या दिशादर्शिकेच्या ‘मंथली टेबल प्लॅनर’चे अनावरण करण्यात आले. प्रारंभी शिक्षण आयुक्त यांच्या प्रस्तावनेचे वाचन कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. तर संचालक कृष्णकुमार पाटील यांनी आभार मानले. आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, संचालक (योजना) महेश पालकर, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.

राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ सुरु करणार

– पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 24 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकर भक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  भगूरमधील ‘सावरकर वाडा’ येथे पर्यटन विभागामार्फत आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ‘स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 9.00 ते 10.30 दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.

‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’

देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’मध्ये सावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक, रत्नागिरी, पुणे आणि सांगली येथील ठिकाणे आहेत. यामध्ये सावरकरांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, तीळभांडेश्वर गल्ली, डेक्कन येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली तसेच डॉ.हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते ठिकाण, गुरव समाजाचे मारूती मंदिर, रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, दादर येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक,सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारक या ठिकाणांचा समावेश आहे.

थीम पार्क   भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

Copyright ©