यवतमाळ सामाजिक

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून झालेल्या शिबिरात ५७७ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया – डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांनी दिली नवदृष्टी

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून झालेल्या शिबिरात ५७७ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया – डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांनी दिली नवदृष्टी

यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस-दारव्हा-नेर या तालुक्यात झालेल्या ‘आरोग्य संकल्प शिबीर’ उपक्रमातून निवडण्यात आलेल्या रूग्णांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथील येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडली. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिनी पारेख यांनी दोन दिवसांत तब्बल ५७७ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली.

वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये गुरूवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात तब्बल एक हजार ५५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ५७७ रूग्णांवर शुक्रवार व शनिवारी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचळ यांनीही शिबिराला सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर व महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस आदींनी या शिबिरासाठी सहकार्य केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकारी डॉ. रागिनी पारेख या गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोर, गरीब रूग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. या शिबिरासाठी मॉ आरोग्य सेवा समिती, बाळासाहेबांची शिवसेना दारव्हा, दिग्रस, नेर येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©