यवतमाळ सामाजिक

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

– दीड हजारांवर रूग्णांची तपासणी,

– आजपासून डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख करणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस-दारव्हा-नेर या तालुक्यात सुरू असलेल्या ‘आरोग्य संकल्प शिबीर’ उपक्रमांतर्गत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आज गुरूवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात तब्बल एक हजार ५५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रूग्णांवर उद्या शुक्रवारपासून वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आज जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचळ, डॉ. रागिनी पारेख, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्यात डॉ. जतकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी, दिग्रस, दारव्हा, नेर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या आरोग्य संकल्प शिबिराची माहिती दिली. गरजू आणि गरीब लोकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य संकल्प शिबीर घेण्यात येत आहे. याद्वारे शेकडो रूग्णांवर विविध ठिकाणी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकारी डॉ. रागिनी पारेख या गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोर, गरीब रूग्णांसाठी प्रकाशदूत ठरल्या आहेत. त्यांच्या शिबिरामुळे हजारो रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे. कधीही जग न पाहू शकणाऱ्या अनेक रूग्णांवरही दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यात येवून त्यांना सृष्टीचे दर्शन डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या चमूने घडविले, असे गौरवोद्गार यावेळी संजय राठोड यांनी काढले.

आज तपासणी झालेल्या रूग्णांमधून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रूग्णांवर उद्या १७ फेब्रुवारीपासून डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख हे शस्त्रक्रिया करणार आहेत. पुढील दोन दिवसांत एक हजारांवर रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. शस्त्रक्रियेची गरज नसलेल्या रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरासाठी मॉ आरोग्य सेवा समिती, बाळासाहेबांची शिवसेना दारव्हा, दिग्रस, नेर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Copyright ©