Breaking News राजकीय विदर्भ

वाई बाजार ग्रामपंचायत ग्रामसभेविनाच ; ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संभ्रमावस्था.

 

ग्राम पंचायत पदाधिकार्‍यावर कारवाईची मागणी.

श्रीक्षेञ माहूर – सुरेखा तळनकर

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ नुसार सहा सभापैकी एका सभेचे आयोजन २६ जानेवारी रोजी घेणे बंधनकारक असताना माहूर तालुक्यातील वाई बाजार ग्राम पंचायतने माञ प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेतली नसल्याने येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांत संभ्रमावस्था निर्माण झाली असून ग्रामपंचायत सचिवासह पदाधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती अनु.जाती,अनु जमाती,इतर सर्वसाधारन व इतर घटकांना मिळावी व त्या नागरिकांना याचा लाभ मिळावा,त्यातील योग्य लाभार्थ्यांनाच घरे,शौचालय,गोटे,सिंचन विहीरी मिळावीत, गावपातळीवर असलेल्या समस्या सर्वांसमोर मांडल्या जाव्यात आणि त्याचे निवारण व्हावे आणि विविध मुद्यावर चर्चा होण्यासाठी शासनाने ग्रामसभेचे आयोजन केले आहे. परंतु याला वाई बाजार ग्रामपंचायतीने अक्षता दाखविल्या आहेत.२६ जाने.रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असतांना ग्रामपंचायत कडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले नसल्याने लख्ख उजेडातही आपण अंधारातच चाचवडत आहोत की काय अशी प्रचिती ग्रामस्थांना आली आहे.

कोणत्या योजना आल्या आहेत, शासकीय घरे,शौचालय,गोटे,सिंचन विहीरी कोणाला मिळतायेत याचा थांगपत्ता लागत नाही. राजकारणाच्या दृष्टिकोणातून ज्यांची बाजू वरचढ आहे. अशांना योजना लवकर उपलब्ध होतात की काय ? अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे. ग्रामसभाच नसल्याने आपली मागणी आणि समस्या कोणाजवळ मांडायच्या असा प्रश्न सर्वसामान्य गरीब कुटुंबांना पडला असून तेव्हा अशा बेजबाबदार ग्राम पंचायत पदाधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

———————-
ग्रामसभेचे वेळापत्रक !

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ नुसार सहा सभापैकी चार सभेचे आयोजन एप्रिल-मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व २६ जानेवारी रोजी आयोजित करणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची पहिली सभा ही त्या वर्षाच्या सुरवातीनंतर दोन महिन्यांच्या आत भरविण्यात आली पाहिजे असे असतांना सत्ताधार्‍याकडून मागील अनेक वर्षापासून ग्रामसभा घेण्यात आली नसल्याने या मागचे काय गौड बंगाल आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून वाई बाजार ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्ठाचार दडला असल्याची प्रतिक्रिया नव्याने सदस्य झालेल्या एका ग्रामस्थांच्या हितचिंतकाने दबक्या आवाजात दिली आहे.

प्रजासत्ताक दिन निराशेच्या वातावरणात साजरा.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते.असे असतांना वाई बाजार ग्रामपंचायत याला अपवाद असून या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक झेंड्याजवळ स्थानिकच्या शाळा, विद्यालय, इग्लीश स्कुलसह ग्रामस्थांच्या उपस्थित राष्ट्रध्वजाचे आरोहण करुण वंदना दिली जाते.असे असतांना त्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रध्वजाच्या वट्याला साधी रंगरंगोटी केली नाही,परिसरात पताके सुध्दा लावण्यात आले नाही.राष्ट्रगितासाठी ध्वनी यंञना वापरण्यात आले नाही.त्याच बरोबर उपस्थित विध्यार्थाना चाॅकलेट,गोळ्या किंव्हा बिस्कीट वितरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकार्‍याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली असून प्रजासत्ताक दिन निराशेच्या वातावरणात साजरा झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

Copyright ©