यवतमाळ शैक्षणिक

तरुणांनी मोबाईलच्या स्क्रीन वरून पुस्तकांच्या पानांवरती यावे- प्रा.प्रशांत कराळे 

तरुणांनी मोबाईलच्या स्क्रीन वरून पुस्तकांच्या पानांवरती यावे- प्रा.प्रशांत कराळे 

ग्रामपंचायत तेंडोळी येथे युवकांसाठी खास कार्यक्रम ” तू नव्या जगाची आशा ”

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी आजच्या तरुणांनी मोबाईलच्या स्क्रीन वरून पुस्तकांच्या पानांवरती यावे असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. प्रशांत कराळे यांनी केले.

 

ते पंचायत समिती, आर्णी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेंडोळी द्वारा स्वामी विवेकानंद जयंती , राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्हाट्सएप ग्रुप सुविचार : संस्कार कलश व ग्रामपंचायत तेंडोळी ता.आर्णी यांच्या संयुक्त सौजन्याने मौजा आमनी येथे आयोजित ‘तु नव्या जगाची आशा’ हया युवकांसाठीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, , ‘स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वांत महत्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा… ‘ स्वतःच स्वतःचे भवितव्य घडवा. ‘गतं न शोच्यम्’ जे झाले ते होऊन गेले. त्याबद्दल खंत करीत बसूनका. म्हणतात ना की ‘वाहिले ते पाणी नि राहिली ती गंगा’ अनंत भावीकाळ तुमच्यापुढे विस्तारलेला आहे आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावयास हवे की तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार नि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील आणि हे पण सदा लक्षात असू दया की, तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेली कुकमें ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत, त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे, की तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कमें हजारो लाखो देवदूतांच्या शक्तीने तुमचे रक्षण करण्यास सदासर्वदा सज्ज आहेत हे सांगत त्यांनी ग्रामीण तरुणांशी विविधांगी संवाद साधला.

तर विजयकुमार ठेंगेकर यांनी प्रास्ताविकातून ख-या अर्थाने प्राचीन संस्कृती आणि वैभवशाली इतिहासाचे लेणे लाभलेले भाग्यवान आपण आहोत. आजची युवापिढी ही संगणक युगात जन्माला आलेली आहे. उज्ज्वल भविष्याच्या निर्माणासाठी वर्तमानात भूतकाळाचा अभ्यास करून पुढे चालणे महत्वाचे असते. बलवान राष्ट्राच्या उभारणीसाठी ते आवश्यक असते. मात्र आजची युवापिढी ही चंगळवादाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. याला कारण, अस्मितेची विस्मृती, भय, भोग, भ्रम आणि भंपकपणाचा बाजार जोरात चालू आहे. श्रमापेक्षा दिखाव्याला प्रतिष्ठा आली आहे. चारित्र्य, राष्ट्रभक्ती, सेवा आणि त्याग या गोष्टी शब्दकोशापुरत्याच मर्यादित होताना दिसत आहेत. हे सर्व आपल्याला नेमके कोठे घेऊन जाणार असा प्रश्न पडतो आहे . आताची युवा पिढी हुशार आणि चौकस आहे. तिला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ते नसल्याने तिच्यासमोर जीवनउद्देशच नाही. सुराज्य निर्माण करणे हे ध्येय या पिढीच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या युवा वर्गास योग्य दिशा देण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ. सपना रविशंकर राठोड, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत कराळे, पंचायत समिती, आर्णीचे विस्तार अधिकारी पंचायत गोविंदजी इंगोले, यांचेसह उपसरपंच भागवनजी निकुरे, ग्रामपंचायत सदस्य परशराम राठोड, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, समाज कार्यकर्ते दिनेशभाऊ महाजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष आडे, रिलायन्स फाउंडेशन चे समनव्यक संदिप घोडे, शिक्षक देठे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विजयकुमार ठेंगेकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष आडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी जितेश चव्हाण, सुशील निकुरे, शिवाजी कोलते विकासगंगा संस्थेच्या समनव्यक स्वाती राठोड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात युवक-युवती उपस्थित होत्या.

Copyright ©