यवतमाळ शैक्षणिक

स्नेहमिलन!विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान म्हणजे शिक्षकासाठी खरा खुरा पुरस्कार

आर्णी जिल्हापरिषद मराठी शाळेत 2001-04 वर्षी शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या सन्मानाचे भान ठेवत,रविवारी 8जानेवारीला स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करून आदर्श शिक्षक अलिअहमद भाटी यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला.यामुळे सत्कारमूर्ती शिक्षक अक्षरशः भारावून गेले होते.तर कार्यक्रमाला उपस्थित आर्णीचे गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांनी आपल्या भाषणातून सांगताना, “चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठे होऊन, शिक्षकाचा केलेला सन्मान म्हणजे शिक्षकासाठी खरा खुरा पुरस्कार” असल्याचे भावनिक उदगार काढले.
जिल्हापरिषद प्राथमिक मराठी शाळा आर्णी येथे वर्ष 2001 ते 2004 वर्षी इयता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन,सुंदर अश्या स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण देऊन घडविणारे शिक्षक अलिअहमद भाटी यांचा सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार सत्कार केला.
आपल्या हाताखालून घडलेले चिमुकले विद्यार्थी आज मोठे होऊन कोणी डॉक्टर, इंजिनिअर,उत्तम व्यावसायिक झाले व त्यांनी आठवण ठेऊन सन्मान केल्याने सन्मानमूर्ती शिक्षक अलिअहमद भाटी भावनिक झाले होते.
दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा देत, सर कसे शिकवत होते, गाणे शिकवीत होते, कथा सांगत होते, कुणाला सहलीला पैसे नसेल तर त्याची व्यवस्था कसे करत होते.
सरांचा आवडीचा विषय गणित गणितात सरांचा कसा हातखंडा आहे, सर इयत्ता १ते ४चेच गणित नाही तर पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्यावर आलेल्या गणितातील समस्या सरांनी कशा दूर केल्या या गोष्टींना मुलांनी उजाळा दिला.
खरोखरच शिष्यांनी गुरूचा आदर पूर्वक विनय पूर्वक केलेला सन्मान म्हणजेच खरा खुरा शिक्षक पुरस्कार होय, अश्याप्रकारे उपस्थीत गटशिक्षाधिकारी रावते यावेळी व्यक्त झाले.

Copyright ©