Breaking News यवतमाळ

बोगस कागदपत्र सादर करून आमदार निधी हडपला हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळने केला विदर्भ हॉकी संघटनेच्या नावाचा दुरुपयोग

बोगस कागदपत्र सादर करून आमदार निधी हडपला
हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळने केला विदर्भ हॉकी संघटनेच्या नावाचा दुरुपयोग

हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ या संघटनेने विदर्भ हॉकी संघटनेची संलग्नता असल्याचे भासवून एप्रिल 2022 मध्ये पोस्टल ग्राउंड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा आयोजनसाठी स्थानिक आमदारांचा क्रीड़ा निधी प्राप्त करण्यासाठी दोन वेगवेगळ्या राज्य संघटनेची पावती व संलग्नता प्रमाणपत्रासह शासनाकडे बोगस व खोटी कागदपत्रे सादर केली व तब्बल दोन लाख रुपयाचा आमदार निधी हडपला.
यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव शाहिद सय्यद यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन विभाग यवतमाळ यांच्याकडून माहिती अधिकार अंतर्गत हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ या संघटनेने एपिल 2022 मध्ये आमदार निधी प्राप्त करण्यासाठी सादर केलेला प्रस्तावाचे कागदपत्रे मागितली होती. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली.
हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ यांनी स्थानिक पोस्टल ग्राउंड येथे 22 ते 25 एप्रिल 2022 या दरम्यान राज्यस्तरीय पुरुष व महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या आयोजन खर्चासाठी आमदार मदन येरावार यांचा क्रीड़ा निधि मिळावा यासाठी त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. आमदार निधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा क्रीडा संघटनेला संबंधित राज्य संघटनेचे ऑफिलेशन व त्यांचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते. प्रस्ताव सादर करताना हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळच्या सचिव मनीषा आकरे यांनी त्यांच्या संघटनेच्या लेटर पॅडवर विदर्भ हॉकी असोसिएशन नागपूर यांच्याशी अॅफिलेशन (संलग्नता) असल्याचे दाखवले. खरी परिस्थिती ही आहे की विदर्भ हॉकी असोसिएशन नागपूरने यवतमाळ जिल्ह्याची संलग्नता जिल्हा हॉकी असोसिएशन ज्यांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश नंदुरकर व सचिव शाहिद सय्यद हे आहेत त्यांना गेल्या २५ वर्षापासून दिलेली आहे. असे असताना देखील हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळने त्यांच्या लेटर पॅडवर विदर्भ हॉकी असोसिएशनची संलग्नता असल्याचे दाखविले.
आमदार निधीच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करताना संबंधित संघटनेला राज्य संघटनेचे संलग्नता प्रमाणपत्र व राज्य स्पर्धा आयोजनाचे पत्र अत्यावश्यक असते त्याशिवाय निधी मंजूर होत नसतो.
हॉकी संघटनेच्या सचिव मनीषा आकरे यांनी प्रस्ताव सादर करतांना विदर्भ हॉकी संघटनेची फक्त पावती जोडली व संलग्नता प्रमाणपत्र दिलेच नाही.तरी देखील जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे ज्यांच्यावर प्रस्ताव तपासण्याची जबाबदारी आहे. त्यांनी 22/04/2022 रोजी या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली. याच प्रस्तावाच्या आधारावर जिल्हा नियोजन विभागाने देखील 04/05/2022 रोजी प्रशासकीय मान्यता देत दोन लाख रुपयाचा निधी मंजूर देखील केला.
विशेष म्हणजे माहिती अधिकार अंतर्गत या प्रस्तावाची माहिती मागितल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जे कागदपत्र या प्रस्तावासोबत दिले. त्यामध्ये हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ या संघटनेला 23 जुलै 2022 रोजी हॉकी महाराष्ट्र या संघटनेची संलग्नता मिळाल्याचे पत्र म्हणजेच स्पर्धा संपल्यानंतर अडीच महिन्याने दिली असल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. म्हणजेच या जिल्हा हॉकी संघटनेने प्रस्ताव दाखल करताना विदर्भ हॉकी असोसिएशन नागपूर या संघटनेची पावती जोडली तर स्पर्धा संपल्यानंतर व निधी मंजूर झाल्यानंतर हॉकी महाराष्ट्र या राज्य संघटनेचे संलग्नता असल्याचे प्रमाणपत्र जोडूंन चक्क शासनाचीच फसवणूक केल्याचे निदर्शनास येते.
या सर्व प्रकरणात हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक यवतमाळच्या सचिव मनीषा आकरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपडे यांचेशी संगनमत करून खोटी कागदपत्रे सादर करून आमदार निधी हडपला याबाबत विदर्भ हॉकी संघटनेच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच संबंधित संघटनेवर विदर्भ हॉकी संघटनेच्या नावाचा दुरुपयोग करुन आमदार निधी हडपल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करणार असल्याचे विदर्भ हॉकी संघटनेचे कॉर्डिनेटर कृष्णा जोशी यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे कळविले आहे

Copyright ©