यवतमाळ सामाजिक

जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळाचा ‘मंगलम् २०२२’ उपवर युवक-युवती परिचय मेळावा संपन्न

 

यवतमाळ –

जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळ, यवतमाळद्वारा सर्वशाखीय माळी समाजाचा उपवर युवक-युवती परिचय मेळावा, दादासाहेब कोल्हे स्मृती सभागृह, दारव्हा रोड, यवतमाळ येथे रविवार, दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी ‘मंगलम् २०२२’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अरूणराव मेत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य, डॉ. प्रविण बनसोड, नेहरू महाविद्यालय नेर, प्राचार्य, डॉ. सुनिल वाशिमकर, म. फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, यवतमाळ हे होते. यावेळी मंचावर मुख्य संयोजक शशांक केंढे, सावित्रीआई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी चिंचोळकर, सचिव, संजय येवतकर, संस्थापक सदस्य उमाकांत परोपटे, क्रांतीसूर्य माळी युवा मंडळाचे अध्यक्ष निशीकांत थेटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपवर युवक-युवतींचे परिचय सत्र संपन्न झाले.

अध्यक्षस्थानाहून बोलताना अॅड. मेत्रे यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करून पुढील मेळावा, रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी घेणार असल्याचे घोषीत केले. या कार्यक्रमात संघटकांचा, संपर्क प्रमुखांचा तथा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. प्रविण बनसोड यांनी विचार परिवर्तनासाठी आणि व्यापक स्नेहबंध घडण्यासाठी ‘मंगलम् २०२२´ ही सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होत रहावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ.वाशिमकर यांनी माळी समाजाने एकसंध राहण्याकरिता आपली मुठ पक्की बांधावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाकरिता जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळाचे पदाधिकारी, क्रांतीसूर्य माळी युवा मंडळाचे कार्यकर्ते, सावित्रीआई फुले महिला मंडळाच्या सदस्या तथा यवतमाळातील विविध माळी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मयूरी निरपासे, सुनयना येवतकर, सारिका चांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप कोरडे यांनी केले. मंडळाच्या वतीने मेळावा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेणाऱ्या सर्वांचेच तसेच नोंदणीदारांचे, पालकांचे, जाहिरातदारांचे, देणगीदारांचे जाहीर आभार मानण्यात आले. ‘मंगलम् २०२२’ हे पुस्तक डिजीटल स्वरूपात अमन पाचघरे यांनी तयार केले असून प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहे. यवतमाळात सुयोग बुक डेपो, दाते कॉलेज समोर, गुरूदेव कम्प्युटर, शिरे ले-आऊट, दाते कॉलेज मागे येथे पुस्तके विक्रीला उपलब्ध आहे. चौकशीकरिता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे प्रसिद्धी प्रमुख यांनी केलेले आहे.

Copyright ©