यवतमाळ सामाजिक

मुक्तीचे सहज सुलभ साधन म्हणजेच हरिपाठ – ह. भ. प. सौ. रेशीम खेडकर

मुक्तीचे सहज सुलभ साधन म्हणजेच हरिपाठ – ह. भ. प. सौ. रेशीम खेडकर

यवतमाळ ः सत्य युगात तपश्‍चर्या, त्रेतायुगात यज्ञयाग, द्वापार युगात, कर्मकांड तर कलीयुगात नामसंकीर्तन भक्ती हेच मुक्तीचे, ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. निरनिराळ्या व्यथा, वेदना, लोभ, आसक्ती क्रोध, इर्षा इत्यादीच्या विळख्यात सापडलेल्या मानव समाजांना सुखी, आनंदी करण्यासाठीच नव्हे तर नीती धर्माचे पालन व्हावे यासाठी समस्त संतांनी आपला देह चंदना सारखा झिजविला. लोकांचा रोष पत्करून, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून ’बुडते हे जन पहावेना डोळा। म्हणोनी कळवळ येत असे’ या ब्रिदाशी एकनिष्ठ राहीले. नाम संकीर्तन साधन या पै सोपे ! जळतील पापे जन्मांतरीची असे एकमेव मुक्तीचे सहज सुलभ साधन म्हणजेच हरिपाठ हे अमोध शास्त्र माऊली ज्ञानेशाच्या मुखातून प्रकट झाले. देवाचिये उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधीयेल्या ॥ असे हरिपाठाचे 28 अभंग. यावश्‍चंद सूर्य असे पर्यंत अजरामर राहणारे…. नव्हे – नव्हे हे अभंग जोवर अभंग राहतील तोवर चंद्र सूर्य सुद्धा अभंग राहतील असे प्रतिपादन ह.भ.प. सौ. रेशीम खेडकर यांनी केले.
कीर्तन महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजित 15 व्या कीर्तन महोत्सवात माऊली ज्ञानेशाची थोरवी विषद करतांनाच काय वानू मी संतांचे उपकार निरंतर मज जागविती, असे वक्तव्य त्यांनी केले. कीर्तनकाराचे स्वगत सौ. सुधाताई कैपिल्यवार व मार्ल्यापण प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी केले. संवादिनी वादक गंगाधरराव देव तथा तबला वादक श्रीधर कोरडे यांचे स्वागत डॉ. सुशिल बत्तलवार यांनी केले. गीतसेवा कु. शुभलक्ष्मी कुळकर्णी या बालीकेने सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. समर्पक सुत्रसंचालन भक्ती जोशी यांनी केले.
उत्तरार्धात संत श्रेष्ठ सावता यांचे आख्यान सादर केले. अरण – भेंडी येथे आयुष्यभर आपले मळा मालक, नव्हे – नव्हे समस्त विश्वाचे मालक पांडुरंगाचा मळा आपल्या भाव भक्तीने त्यांनी फुलवला पण कधीच पंढरपूर क्षेत्री गेले नाही. सज्जनहो हा अहंकार नव्हे तर श्रध्दा आणि दृढभक्ती होती. त्यांच्या मळ्यातील कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हिच त्यांची पांडुरंगाप्रती असणारी निष्ठा. आणि या निष्ठेनेच प्रत्यक्ष पांडुरंगाला त्याच्या मळ्यात यावे लागले. आणि त्यांच्या लाडक्या मुलिची ’नागूची’ इच्छा पूर्ण करावी लागली. ’राजा पंढरीचा हरी माझा आला मळा भक्तीचा फुलला’ या अभंगाने त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. आरतीचे यजमान पद आशाताई इंगोले, राजेन्द्र डांगे, संगीता डांगे, नरेन्द्र खत्री, श्रीमती शैलाताई दमकोंडावार यांनी भूषविले.

Copyright ©