यवतमाळ सामाजिक

विक्रमादित्य सायकल स्वारांचे यवतमाळनगरीत अभूतपुर्व स्वागत

विक्रमादित्य सायकल स्वारांचे यवतमाळनगरीत अभूतपुर्व स्वागत

यवतमाळ : क्रीडा भारती सायकलींग ग्रुप यवतमाळचे सायकलविर डॉ. आशिष गवर्शेटीवार, डॉ. महेश मनवर, डॉ. हर्षल झोपाटे, इंजि. सुरेश धुसंगे, डॉ. अतुल माईंदे, अभिजीत राऊत, विरांगणा डॉ. जया मनवर या सात सायकलविरांनी कश्मीर ते कन्याकुमारी ३ हजार ६६५ किमीची सायकल यात्रा अवघ्या ६ दिवस ४ तासात पुर्ण करुन विश्वविक्रम केला आहे. व ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान यवतमाळच्या सायकलविरांनी पटकाविला आहे. या सायकल विरांचे आज यवतमाळनगरीत आगमन झाल्यानंतर दि. १६ डिसेंबर विजयदिन निमित्त यवतमाळ येथील संविधान चौकातून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत भव्‍य स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम सायकलविरांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तदनंतर दै. सिंहझेपचे संपादक मनोज जयस्वाल यांच्या सहयोगाने मिळालेल्या खुल्या जिपमधून सायकलविरांची विजयी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. ही विजयी मिरवणूक संविधान चौक, एलआयसी चौक, स्टेट बँक चौक, लोखंडी पुल, गांधी चौक, तहसील चौक, दत्त चौक, गोधनी रोड, माईंदे चौक, विरवामनराव चौक मार्गाने मार्गक्रमण करीत बालाजी सोसायटी येथील विर सावरकर क्रीडांगण येथे सांगता करण्यात आली. या विजयी मिरवणूकीचे अणे महिला महाविद्यालय, विवेकानंद विद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षकांनी रस्त्यावर उभे राहून पुष्प वर्षाव करुन स्वागत केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरिक्षक मनोज केदारे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष अजय म्हैसाळकर, कार्यक्रमाचे संयोजक दिलीप राखे, तसेच क्रीडा भारतीचे महेश जोशी आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आशीष गौरशेट्टीवार याने सहा दिवस ४ तास कश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रेचे थोडक्यात कथन करुन दिलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळात ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव नोंदविण्याचे यश आल्याचे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरिक्षक मनोज केदारे यांनी यवतमाळातील क्रीडा भारतीच्या सात सदस्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा करुन कौतुक केले.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की १६ डिसेंबर हा भारत पाकिस्तान युध्दातील भारताचा विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सायकलविरांनी अत्यल्प वेळात विश्वरेकॉर्ड निर्माण केल्याबद्दल केदारे यांच्याशुभहस्ते सर्व सायकलविरांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा भारतीचे सदस्य विजयकुमार बुंदेला यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष गुलवाडे, व्‍यंकटेश कुंटावार, प्रा. प्रेमानंद रामपूरकर, निता कुंटावार, महेश जोशी, अक्षय गावंडे, डॉ. चेतन राठोड, राजू लोणकर, निलेश नारसे, माजी सैनिक उदय मोरे, नितीन लाखानी, सौ. वर्षा लाखानी, मोहन दानी, सुरेश जिरापूरे, मनोहर जाधवानी, प्रशांत टोणे, संतोष घोडेकर, नरेश ढाले, जयंत गुल्हाने आदींनी पुढाकार घेतला.

Copyright ©