यवतमाळ सामाजिक

बातम्यांमधील किस्स्यां’तून उलगडले पत्रकारितेचे अंतरंग

बातम्यांमधील किस्स्यां’तून उलगडले पत्रकारितेचे अंतरंग

यवतमाळ: समाजाचा आरसा असणारा पत्रकार बातम्या शोधून वृत्तांकन करतो तेव्हा त्याच्याभोवती अनेक चांगल्या, वाईट, गमतीशीर, रोचक घटना घडत असतात. अशाच बातम्यांमागील किस्स्यांतून यवतमाळच्या ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेचे अंतरंग ऊलगडले. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बातम्यांमागील किस्से या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणलाल खत्री, दिनेश चोरडिया, पद्माकर मलकापूरे, गणेश बयस, दिनेश गंधे, सुरेश गांजरे, टी. ओ. अब्राहम, रघुवीरसिंह चौहाण, किशोर जुननकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठ पत्रकारांनी अतिशय कष्टाने, सामाजिक भान ठेवून पत्रकारितेचा वारसा जपला, त्यांना बातमीदारी करताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. बातम्या करताना व बातमी प्रकाशित झाल्यानंतर अनेक किस्से पत्रकारांशी निगडित घडतात जे बातम्यांमध्ये मात्र नसतात मात्र नव्या पिढीला ते किस्से दिशादर्शक ठरणारे असतात, म्हणून जेष्ठांचे अनुभव ऐकण्यासाठी बातम्यांमधील किस्से या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी पत्रकारांनी सांगितलेल्या किस्स्यांमधून पत्रकारांचे धाडस, पत्रकारितेची ताकद व बलस्थाने काय असू शकतात. खरी पत्रकारिता जिवंत राहावी यासाठी पत्रकारांनी कोणती मूल्य जोपासली पाहिजे, आजच्या स्पर्धेच्या युगात समाज घटकांच्या समस्यांना कसा न्याय द्यावा, निर्भीड पत्रकारितेला मर्यादा येऊ न देता सामाजिक समस्या प्रखरतेने कशा मांडाव्या असे अमूल्य व दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकारांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रमिक पत्रकार संघाचे राज्य प्रतिनिधी नागेश गोरख यांनी तर आभार सुरेंद्र राऊत यांनी मानले.

Copyright ©