यवतमाळ सामाजिक

गोविंदप्रभूंचे मानवतेचे आचरण हेच समाज प्रबोधन

गोविंदप्रभूंचे मानवतेचे आचरण हेच समाज प्रबोधन

” आज ज्या अर्थाने आपण समाजप्रबोधन हा शब्द योजतो त्याचा अर्थ श्री गोविंद प्रभूंच्या कृती आचरणात शोधता येतो. महानुभावीय ग्रंथात भाषिक सांस्कृतिक संपन्नता आहे . यापैकी लीळाचरित्र ग्रंथात ‘ राऊळ माय राऊळ बाप ‘असे कारुण्य पदोपदी जाणवते . गोविंदप्रभूंचे मानवतावादी प्रत्यक्ष आचरण यातूनच त्यांचे समाज प्रबोधन प्रतीत होते.”असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.रमाकांत कोलते यांनी केले.
ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ महानुभाव अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित तपस्वी तुळशीरामजी मेश्राम स्मृती सर्वज्ञ चक्रधर स्वामी व्याख्यानमालेत नेहरू महाविद्यालय नेरपरसोपंत येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण बनसोड होते. मंचावर महंत डॉ. सोनपेठकर सुश्री केशरताई मेश्राम श्री सुभाष पावडे संस्थेचे सदस्य डॉ. संजय काळे हे उपस्थित होते.
विद्यापीठाने महाविद्यालयाकडे सोपविलेल्या कार्यक्रमानुसार प्रस्तुत व्याख्यानमालेत गोविंदप्रभूंचा लोकजागर या विषयाचे व्याख्यानपुष्प गुंफताना डॉ. कोलते यांनी गोविंद प्रभू यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविले. तल्लख कुशाग्र बुद्धीचे गोविंद प्रभू यांच्या मनात स्त्रियांबद्दल अपार आपुलकी होती. स्त्रियांमध्येही गोविंद प्रभू बद्दल पराकोटीचा विश्वास होता. चक्रधर स्वामी संत नामदेव संत तुकाराम आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचे अनेक दाखले देत डॉ. कोलते यांनी विषयाच्या अनुरोधाने सखोल मांडणी केली. थॉमरसेट मॉम यांच्या उक्तीप्रमाणे चांगला वाचकच चांगला लेखक होतो असा सल्ला वाङ्‌मयाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांना आणि लीळाचरित्र या ग्रंथाला वंदन करून पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले ऑल इंडिया रेडिओच्या निवृत अधिकारी आणि महानुभव पंथाच्या प्रसारासाठी आपले जीवन व्यतीत करीत असलेल्या सुश्री केशरताई मेश्राम यांनी शुभेच्छा पर विचार व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रवीण बनसोड आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , ” साहित्याचा आद्य स्त्रोत महानुभाव पंथातील लीळाचरित्र महदंबेचे धवळे हे ग्रंथ आहेत. चक्रधर स्वामी यांनी गुजरात पासून इतर प्रदेशात तर दक्षिणेत महात्मा बसवेश्वर यांनी प्रबोधनाची अखंड ज्योत तेवत ठेवली .विशेष म्हणजे सामान्य माणसांना कळेल अशा लोक भाषेत त्यांनी आपले तत्त्वज्ञान मांडले .”
व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या औचित्याने मराठी वाङ्मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी गुणरत्न कांबळे (अध्यक्ष) मोहिनी उघडे ( उपाध्यक्ष) निकिता दुधे (सचिव) गिरीश खोब्रागडे(सहसचिव ) प्रद्युम्न भोसले (कोषाध्यक्ष )तसेच प्रियांका ढोके वैष्णवी कावरे अभिषेक बावणे वैष्णवी कराळे साक्षी कोल्हे या सदस्यांसह कार्यकारिणी घोषित करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत डॉ.एम.डी.वडते प्रा.एम.यु.अर्जुने डॉ. शीतल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी तर आभार प्रा.पंकज चव्हाण यांनी मानले.

Copyright ©