यवतमाळ सामाजिक

आरंभीच्या युवकांची आर्णीच्या वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

आरंभीच्या युवकांची आर्णीच्या वृद्धाश्रमात दिवाळी साजरी

‘एक हात मदतीचा मंच’ संस्थेतर्फे साहित्य व फराळाचे वाटप

तालुक्यातील आरंभी येथील ‘एक हात मदतीचा मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आर्णी तालुक्यातील दाभडी रोडवरील उमरी फाटा येथील मातोश्री सुशिलाबाई नागपुरे वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली. या संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील ४५ वृद्धांना थंडीपासून बचावात्मक साहित्य, टॉवेल, स्टीलच्या थाळीचा सट, तांदळाचा कट्टा आणि फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे वृद्धांसमवेत मंचाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
दिवाळी या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाशाच्या या पर्वाला सर्वजण आपलेसे करतात. मात्र संततीकडून वाळीत टाकलेल्या वयोवृद्ध जेष्ठ लोकांना याचा आनंद घेता येत नाही, हीच बाब हेरून ‘एक हात मदतीचा मंच’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी न चुकता वेगवेगळ्या वृद्धाश्रमात जाऊन ही संस्था अशा वंचित लोकांसोबत आपली दिवाळी साजरी करतात. हल्ली दिवाळीची सुट्टी असल्याने आजची तरुणाई क्रिकेट, कबड्डी या खेळाचे आयोजन करून मौजमस्ती करताना दिसतात. मात्र यापलीकडे जाऊन हे तरुण वृद्धांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावताना दिसून येतात.

आजवर या संस्थेने वृद्धाश्रमात जाऊन विविध उपक्रम राबविले आहे. त्यामध्ये आरोग्य शिबीर, दैनंदिन गरजेच्या वस्तू, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, फराळ वाटप आदींचा समावेश आहे. अशा सेवेला वाहून घेण्यासाठी संस्थेचे सदस्य दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. वृद्धांना आपल्या संततीची कमी जाणवू नये, त्यांना भावनिक आधार द्यावा, त्यांची दिवाळी गोड व्हावी, या भावनेतून हे तरुण दरवर्षी झटतांना दिसतात, हे विशेष…!

मातोश्री सुशिलाबाई नागपुरे या वृद्धाश्रमाचे मुख्य संचालक खुशाल नागपुरे तब्बल ५२ वृद्धांच्या पोटापाण्याचा गाडा हाकण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. संतोष बोखारे, प्रशांत गुडे, लिंकेश वाकोडे यांचे सहकार्य देखील वाखाणण्याजोगे आहे. या वृद्धाश्रमाला मदतीची गरज असून सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Copyright ©