यवतमाळ सामाजिक

मनोरुग्ण बाबूरावच्या जीवनाला कलाटणी नंददीप फाउंडेशनच्या दिमतीला डॉक्टरांचे योगदान

मनोरुग्ण बाबूरावच्या जीवनाला कलाटणी
नंददीप फाउंडेशनच्या दिमतीला डॉक्टरांचे योगदान

यवतमाळ : सर्वच स्तरातून दुर्लक्षित मनोरुग्णांच्या अंधकारमय जीवनात एक आशेचा किरण म्हणून नंददीप फाउंडेशन कार्यरत आहे. जिथे सर्व मदत संपते तेथूनच ही फाउंडेशन आपल्या सेवाभावी कार्याला सुरुवात करते. असाच एक मनोरुग्ण जो आपली आक्राळविक्राळ दाढी घेऊन हिंगणघाट येथे भटकत होता. खाजेमुळे त्याच्या शरीराची प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. मात्र, या मनोरुग्णावर नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात उपचार झाल्याने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्याला नुकतेच आपल्या मूळगावी हिंगणघाट येथे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बाबुराव हा मनोरुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून हिंगणघाट येथे भटकत होता. कुणीही त्याची दखल घेतली नाही त्याच्यावर उपचार करण्याची माणुसकी कुणी दाखविली नाही. परंतु,नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी त्याला आपल्या रुग्णवाहिकेतून नंददीप फाउंडेशन मनोरुग्ण निवारा केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यामुळेच बाबुराववर उपचार झाल्यानेच त्याला आता नवीन आयुष्य मिळाले आहे. तीन फूट वाढलेली दाढी, अंगावर खाजीचे व्रण आणि त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे त्याच्या आसपाससुद्धा कुणी फिरकत नव्हते. मात्र, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांनी त्याच्यावर मानसशास्त्रीय आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमर सूरजूसे यांनी औषधोपचार केल्याने जवळपास एक महिन्याच्या कालावधीत तो आता बरा झाला आहे. त्याला १७ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या साक्षीने कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.या मनोरुग्णाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजी घेणाऱ्या नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदिनी, सचिव स्वप्निल बागवाले,सेवा समर्पण प्रतिष्ठानचे प्रशांत बनगिनवार ,अनंतराव कौलगीलकर, रमेश केळकर से. नि. विअपं, गोविंद शर्मा,अक्षय बानोरे, संजय वगारे यांच्यासह नंददीप फाउंडेशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

बॉक्स
शिंदे दाम्पत्यानी केली महिनाभर मलमपट्टी
सामान्यपणे स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराने अनेक मनोरुग्ण बाधित असतात. याच आजारामुळे त्यांना स्वतःची निगा राखता येत नाही. बाबुराव याची दाढी जवळपास तीन फूट वाढलेली होती. याशिवाय शरीराला प्रचंड खाज सुटली होती. प्राथमिक स्तरावर त्याच्या शरीराची स्वच्छता आणि जखमेवर महिनाभर मलमपट्टी करण्याचे काम शिंदे दाम्पत्यानी केले.
रत्याने जाताना अचानक उग्र स्वरूपाची दुर्गंधी आली तर अनेकजण नाकाला रुमाल लावतात परंतु, मनोरुग्णांप्रति आपले जीवन समर्पित केलेले शिंदे दाम्पत्य मात्र दरदिवशी किळस येईल अशा मनोरुग्णाची सुश्रुषा करतात.

 

बॉक्स :
या दोन डॉक्टरांमध्ये देव पाहिला
डॉक्टरांना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या गीतांच्या ओळी माणुसकीचे दर्शन घडविते. याचाच प्रत्यय मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम आणि डॉ. अमर सूरजुसे यांनी दिला. हे दोन्हीही डॉक्टर आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या मनोरुग्णांची काळजी घेतात. त्यांना बरे करण्यासाठी विशेष लक्ष ठेवतात.
त्यांची ही निःस्वार्थ सेवाभावी वृत्ती पाहून त्यांच्यात आम्ही देव पाहिला असे येथील मनोरुग्ण आवर्जून सांगतात.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©