यवतमाळ सामाजिक

भालदेव.. म्हणजे काय?

प्रतिनिधी

भालदेव.. म्हणजे काय?

ऋषिकेश पुष्पराज कालोकार

श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर ४ दिवसांनी व कृष्णजन्माष्टमी पासुन १२ दिवसांनी गवळी समाजात ५ दिवसाचे ‘भालदेव’ पुजन केले जाते, पोळा ते दिवाळी दरम्यान अणेक सणांची रेलचेल असते. पण या सगळ्या सणात भालदेव सणाविषयी कुठल्याही दिनदर्शिकेत उल्लेख आढळत नाही, भालदेव साजरा का केला जातो, कधी केला जातो याविषयीची माहिती देखील अनेकांना नसते,तरिही परंपरेने दरवर्षी भालदेव उत्सव साजरा केला जातो यामधे जंगलात आढणाऱ्या लईचे (लव्हाळा गवत) पुजण केले जाते.

गवळी समाजात कृष्ण देवाचे पुजन म्हणून या लईचे पुजन केले जाते याविषयी बऱ्याच मान्यता आजही समाजात पाहायला मिळतात, कृष्ण वनात आसताना एका शिकाऱ्याला कृष्णाचे पाय इतके मोहक दिसले की त्याचक्षणी शिकारी त्या मोहक पायांना बान मारतो, मग कृष्णाला पायाला लागलेलं रक्त तो जवळ असलेल्या लई गवताला पुसतो ज्यामुळे ते गवत पवित्र झाले अशेही मानले जाते, दुसरी कथा अशी आहे की, कृष्ण गोकुळात असताना तो इंद्र देवाची पुजा नाकरतो व गोवर्धन पर्वतामुळे आपल्या गायिंना चारा उपलब्ध होतो, गोवर्धन पर्वत आपल्या उपजिविकेचा भाग आहे म्हणून गोवर्धनाला प्रतिक मानुन निसर्ग पुजन घडवून आणतो आणि याचं नंद कुळातुन स्थलांतर होत आलेला गवळी समाज आजही हिच परंपरा राखुन आहे, पशुपालनावर आणि चराऊ कुरणांवर उपजिविका असल्याने लईचे पुजन केले जाते अशीही मान्यता आहे. भालदेव सणाविषयीं वेगवेगळ्या दंतकथा असल्या तरीही भालदेव हा निसर्ग आणि विज्ञानाची सांगड घालणारा सण आहे. पाणी पडल्यावर जंगल, कुरणे, गायरानात आता चारा उगवायला सुरवात होते पण लगेच चराईला सुरवात केल्यास त्याच बिजप्रसारण होत नाही गवतात पौष्टिकता कमी असते, यामुळे पुर्वी समाजात भालदेव सण झाल्यानंतरच जनावरं जंगलात चरायला सोडत होते ज्यावेळी गवत पोषक असते आणि बिज प्रसारण उत्तम रित्या होते तसेच जंगलात लई मिळण्याच्या प्रमाणावरून जंगलात उपलब्ध असलेला चारा पुढे किती दिवस राहिल याचा अंदाज बांधला जातो. या मुळे या सणाचं महत्व अधिकचं वाढते.

भालदेव सण हा पुर्व विदर्भात गवळी समाजात, मेळघाट परिसरात आणि खानदेशात काही भागात केला जातो, वेगवेगळ्या भागात भालदेव साजरा करण्याच्या पद्धतींचा अवलंब बदलतो. खानदेशात भाद्रपदाच्या पहिल्याच दिवशी भालदेवाची विधीवत स्थापना केली जाते व भालदेव उत्सव पाच, सात व नऊ अशा दिवसांचा साजरा केला जातो. तेच विदर्भात फक्त ५ दिवसांचा केला जातो व याकाळात काळात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध घरातच ठेवले जाते. दुधापासून दही, ताक, बनविले जाते त्याचा दानधर्म केला जातो पण पैशाने विकले जात नाही. पाचही दिवस मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात, गोडधोड केल्या जाते व शेवटच्या चौथ्या दिवशी कामावर असलेले गुराखी, मजुरांना जेवनाचे निमंत्रण दिले जाते व शेवटच्या दिवशी देव रे… भालदेव.. च्या जयघोषात भालदेव नदित विसर्जन केले जाते.

Copyright ©