यवतमाळ सामाजिक

ना. संजय राठोड यांचे आज यवतमाळात प्रथम आगमन – समर्थकांकडून स्वागताची जय्यत तयारी

ना. संजय राठोड यांचे आज यवतमाळात प्रथम आगमन
– समर्थकांकडून स्वागताची जय्यत तयारी

यवतमाळ – राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ना. संजय राठोड यांचे उद्या शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ते यापूर्वी युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री तर महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. यावेळी संजय राठोड यांनी मंत्रिपदाची ‘हॅटट्रिक’ करीत तिसऱ्यांदा शपथ घेतली.
शपथविधीनंतर ना. संजय राठोड पहिल्यांदाच स्वजिल्ह्यात दाखल होत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे. ना. संजय राठोड हे नागपूरहून कळंब येथे सकाळी ११ वाजता पोहचणार आहेत. तेथे स्वागत व चिंतामणी मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर ते दुपारी १२ वाजता यवतमाळला पोहचणार आहेत. येथे आगमन झाल्यानंतर स्थानिक शनिमंदिर चौकात त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, वसंतरावजी नाईक आदी थोर पुरुषांच्या पुतळ्यांना हारार्पण व वंदन करून अभ्यंकर कन्या शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील समर्थकांसह दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी ना. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी यवतमाळ येथे मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत.

‘झेंडावंदन’ ना. संजय राठोड यांच्याहस्ते
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जिल्ह्यास पालकमंत्री नसल्याने १५ ऑगस्ट रोजी ‘झेंडावंदन’ कोण करणार, हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र शासनाने गुरुवारी परिपत्रक काढून, जिल्ह्यात झेंडावंदन कोण करणार हे स्पष्ट केले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात ना. संजय राठोड यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन होणार आहे. यापूर्वी संजय राठोड यांनी दोन वेळा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Copyright ©