यवतमाळ सामाजिक

जास्त रोजगार निर्मिती करणारे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

जास्त रोजगार निर्मिती करणारे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

तालुका स्पेसिफीक योजना राबविणार

प्रत्येक तालुक्याला 2 कोटी निधी

मधाचे गाव विकसित करा

 

यवतमाळ, दि. 10 ऑगस्ट : मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुका स्पेसिफीक योजना राबविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील समाविष्ट नऊ तालुक्यांना प्रत्येकी 2 कोटी निधी वितरीत करण्यात येणार असून त्यातून उत्पन्नात वाढ करणारे, मुल्यवर्धक व जास्तीत जास्त रोजगार निर्मिती देणारे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधीत विभागांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

मानव विकास कार्यक्रम योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी घेतला. याप्रसंगी मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी अ.वि.सुने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, माविमचे रंजन वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश असून प्रत्येक तालुक्याला 2 कोटी प्रमाणे एकूण 18 कोटी निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यांसाठी विशेष योजना तयार करतांना महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती / जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासी वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट, आदिवासी सहकारी संस्था, मच्छिमार सहकारी संस्था व इतर सहकारी संस्था, आदिवासी पेसा भागातील ग्रामसभा तसेच उमेद व माविम व्यतिरिक्त इतर संस्थांनी स्थापन केले महिला बचत गट यांनी देखील योजनेचे लाभार्थी म्हणून विविध प्रस्तावांसोबतचे ड्रोन फवारणी, अन्न प्रक्रीया उद्योग गोट बँक यासारखे नाविण्यपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मधाचे गाव विकसित करा : आग्यामध संकलन केंद्र तयार करण्यासाठी तालुकानिहाय 15 लाख रुपये निधी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून मध संकलनासाठी प्रशिक्षण व साहित्यही देण्याचे तसेच जिल्हास्तरावर मधप्रक्रीया केंद्र सुरू करून जिल्ह्यात मधाचे गाव विकसित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

बैठकीला कृषी, रेशीम उद्योग, मत्सव्यवसाय, खादी ग्रामोद्योग, शबरी महामंडळ, पेसा, ग्रामपंचायत यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

____________________________

नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

निष्काळजीपणे मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी- जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

पूर परिस्थितीचा घेतला आढावा

 

यवतमाळ,
दि १० ऑगस्ट :- वर्धा नदीच्या उगमक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे अप्पर वर्धा आणि निम्नवर्धा धरणातून वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पुढिल काही तसात प्रकल्पात येणाऱ्या येव्यानुसार धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. विशेष करून वणी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभुळगाव या तालुक्यातिल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अलर्ट मोडवर काम करावे. गरज पडल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठीचे नियोजन करून ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आज आपत्ती व्यवस्थापन संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्यात.

सद्यस्थितीत बेंबळा प्रकल्पातून विसर्ग कमी झालेला असला तरी मध्य प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सध्या अप्परवर्धा धरण 88 टक्के भरले असून त्यातून 3800 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर निम्न वर्धा धरणातून 3549.82 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे अशी माहिती अप्परवर्धा आणि निम्नवर्धा धरणाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. तसेच ईसापुर धरण हे 96 टक्के भरलेले असून सध्या विसर्ग 611 क्युमेक्स सुरू आहे.

त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत नसला तरी इतर जिल्ह्यातील धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आपल्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुढचे सात दिवस पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे . यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गावातच राहावे. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये दवंडीद्वारे अलर्ट सूचना द्यावी. जीवित हानी टाळण्यासाठी नाल्यावरून पाणी वाहत असताना निष्काळजीपणे नाल्याच्या पाण्यातून कुणीही वाहन चालवणार नाही यासाठी सुद्धा गावामध्ये सूचना देण्यात याव्यात.

मागील पावसामुळे झालेले नुकसान आणि आता आलेला पाऊस आणि पुरामुळे नवीन मंडळामध्ये झालेले नुकसान याची माहिती शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. आताच्या पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे. त्यानुसार निधी प्राप्त झाल्यास त्याचे वाटप तत्परतेने होईल याची काळजी घ्यावी. तसेच मृत्यू झालेल्या प्रकरणात तातडीने मदतीचे वाटप करावे. तालुक्याला जिल्हा चमुची गरज भासल्यास तसे तात्काळ जिल्हयाला कळवावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

यावेळी दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व तहसीलदार उपविभागीय अधिकारी, बेंबळा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प कार्यकारी अभियंता आणि अप्पर वर्धा प्रकल्प तसेच ईसापूर धरण कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Copyright ©