यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 22 पॉझिटिव्ह ; 16 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 22 पॉझिटिव्ह ; 16 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 13 जुलै :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 16 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 67 व बाहेर जिल्ह्यात 5 अशी एकूण 72 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 410 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 388 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79301 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77426 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 87 हजार 758 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख आठ हजार 457 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.93 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5.37 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभूळगाव तालुक्यातील सहा, दारव्हा सहा, घाटंजी एक, नेर पाच, पुसद एक, राळेगाव एक, यवतमाळ एक व बाहेर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात आठ महिला व 14 पुरूषांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

__________________________

पावसामुळे होणारी हाणी टाळणेकरिता

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

 

यवतमाळ, दि 13 जुलै :- जिल्ह्यात 11 जुलै पासून सतत पाऊस सुरू असून या सततच्या पावसामुळे होणारी जिवीत व वित्त हाणी टाळणेकरिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याअनुषंगाने दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार पुर येण्याची पुर्वसुचना मिळाल्यास रेडीओ, टि.व्ही. व स्थानिक प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे. अफवावर विश्वास ठेवु नये वा अफवा पसरवु नये. सततच्या पावसामुळे व पुरपरिस्थितीत मातीची घरे लवकर पडतात अशा घरात राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्या‍वी. पूर परिस्थिती दरम्या‍न लहान मुलांना पाण्याजवळ जावु देवु नये. नदी/ नाल्यास पुर आल्यांस पाण्याची पातळी कमी होई पर्यंत नदी/ नाला ओलाडंण्याचे धाडस करु नये व अशा रस्ता व पुलांवरून गाडी नेवू नये, अशामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यंता नाकारता येत नाही. पुरपरिस्थितीत पिण्याचे पाणी, बिस्कीट, गुळ, शेंगदाणे यासारखे सुके खाद्य पदार्थ यांचा योग्य साठा घरामध्ये असावा. विजेच्या उपकरणांचा वापर करु नये, विजेचा पुरवठा बंद करावा. नदी नाले, ओढे, डबके इत्यादी ठिकाणी मासेमारी करिता जावू नये. पुरपरिस्थितीत साथीचे रोग पसरण्यारची शक्यता असते अशा परिस्थितीत साथीच्या रोगापासुन संरक्षणासाठी उकळलेले पाणी प्यावे, अन्न पदार्थ झाकुन ठेवावे. साथीच्या रोगापासुन संरक्षणासाठी प्राप्त झालेल्या औषधांचा योग्य वापर करावा. स्थालांतर करावे लागल्यास आवश्यक वस्तु‍ सोबत घ्यावे व सुरक्षित रस्त्याचा वापर करावा. घरातील उपयुक्त सामान उंच सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्तीच्या प्रसंगी जवळील तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन अथवा अग्निशामक दलाशी संपर्क साधावा.

गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांनी ग्रामस्थांना पुर परिस्थिती तसेच अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्ती दरम्यान घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. शासकीय व प्रशासकीय प्रतिनिधी यांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे, वरिष्ठ कार्यालयाच्या संपर्कात राहणे, मुख्यालयी राहणे, पूर्णवेळ दूरध्वणी सुरू ठेवणे, तसेच कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठ प्रशासनास माहिती देवून आपत्ती निवारणाची कार्यवाही दिलेल्या सूचनांनुसार करावी, असे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
_____________________________

18 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

 

यवतमाळ, दि 13 जुलै :- चालू महिन्यातील जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तीसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो.

तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी.

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषयक, आस्थापनाविषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.
_____________________________

शहरातील सायकल ट्रॅक रद्द करुन रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करा

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आदेश

यवतमाळ, दि 13 जुलै :- यवतमाळ शहरातील मुख्य वाहतूकीचा रस्ता बसस्थानक चौकापासून ते पांढरकवडा रोडवर नगर परिषदेने तयार केलेल्या सायकल ट्रॅक रद्द करून पुर्वी प्रमाणे रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले.

सायकल ट्रॅकमुळे अडथळा व अपघात होण्याची शक्यतेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अहवाल मागविले होते. प्राप्त अभिप्रायानुसार सदर सायकल ट्रॅक हा रस्ता वाहतूकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचा आहे तसेच वाहतूक, गर्दी, अपघात इत्यादी बाबींचा विचार करता मुख्य मार्गावर तयार करणे योग्य आहे काय ह्याबाबत जिल्हा स्तरीय रस्ता सुरक्षा समिती ह्यांचे अभिप्राय घेऊन कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच सदर सायकल ट्रॅक हा सलग लांबीचा किंवा रस्ता वाहतूकीसाठी आवश्यक रुंदी सोडून केलेला नाही. सदर सायकल ट्रॅक हा सायकलस्वारांसाठी तसेच रस्त्यांवरील वाहनांसाठी असुरक्षित असल्याचे दिसते, सदरील ट्रॅक चा वापर हा सायकलस्वारांकडून होत असल्याचेही दिसून येत नाही. याउलट याचा उपयोग दुकानदारांकडून तसेच वाहने पार्कींग करिता होताना दिसत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सदर सायकल ट्रॅक रद्द करण्याचे आदेश दिले.

यासोबतच मुख्य रस्त्याचा कोणताही भाग हा रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीचे प्रयोजन सोडून पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण इत्यादी कारणासाठी वापरला जाणार नाही याबाबत पोलीस विभाग वाहतूक नियंत्रण शाखा व नगर पालीका प्रशासन यांनी समन्वयातून कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.

__________________________
रोजगार केंद्रामध्ये नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार क्रमांक लिंक करावा

 

यवतमाळ, दि 13 जुलै यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नोकरीइच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपले आधार कार्ड जोडले (लिंक) नसेल, अशा सर्व उमेदवारांनी 31 जुलै 2022 पर्यंत www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने आधार लिंक पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा / सुविधा आता या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. याव्दारे उमेदवारांस प्रामुख्याने राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे आणि त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे, आणि सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यांमध्ये दुरुस्ती करणे तसेच वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचीत केलेली रिक्तपदांची माहिती मिळवून त्यासाठी आपल्या उमेदवारीचा अर्ज सादर करणे, इ.बाबींचा समावेश होतो.

उद्योजकांनी वेळोवेळी गरज व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी आपल्या नोंदणीस आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या नोंदणीस आधार कार्ड जोडणी (लिंक) करणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवार या प्रकारच्या संधी पासून वंचित राहू शकतो.

आधार नोंदणी केल्यानंतर किंवा याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयास ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर अथवा yavatmalrojgar@gmail.com, asstdiremp.yavatmal@ese.maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

______________________

 

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष,

जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्काचे निर्देश

 

मुंबई/यवतमाळ दि. १३ : – राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘ सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

Copyright ©