यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 10 पॉझिटिव्ह ; 7 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 10 पॉझिटिव्ह ; 7 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि 12 जुलै :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 62 व बाहेर जिल्ह्यात 4 अशी एकूण 66 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 423 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 413 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79279 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77410 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 87 हजार 348 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख आठ हजार 69 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.93 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.36 आहे तर मृत्यूदर 2.27 आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा तालुक्यातील आठ, यवतमाळ एक व बाहेर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात तीन महिला व सात पुरूषांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

_____________________________

 

जिल्ह्यात 85 टक्के खरीप पीक कर्ज वाटप

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांचे केले अभिनंदन

 

100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी पंधरा दिवसात अजून 300 कोटी वाटपाचे केले आवाहन

 

पीक कर्ज वाटपात यवतमाळ जिल्हा अग्रेसर

मागील वर्षातील आजच्या दिवसाच्या तुलनेत 347 कोटी जादा वाटप

मागील पाच वर्षात प्रथमच 85 टक्के उद्दिष्टपुर्ती

महामंडळांनी कर्ज वाटप प्रकरणे गांभीर्याने घेण्याच्या सूचना

 

यवतमाळ, दि 12 जुलै चालु खरीप हंगामात आतापर्यंत 1632 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करून यवतमाळ जिल्ह्याने मागील पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमच 85 टक्के उद्दिष्टपुर्ती साध्य केली आहे. तसेच गत वर्षी 8 जुलै 2021 पेक्षा या वर्षी 8 जुलै 2022 रोजी 347 कोटी पीक कर्ज जादा वाटप करून चांगले काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकांचे अभिनंदन केले तसेच येत्या दोन आठवड्यात अजून 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करून 100 टक्के उद्दिष्टपुर्ती करण्याचेही आवाहन त्यांनी बँकांना केले.

बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे काल घेण्यात आली. याप्रसंगी रिझर्व बँक नागपूरचे अग्रणी बँक प्रबंधक उमेश भन्साली, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

पीक कर्जासोबतच इतर गैरकृषी क्षेत्र तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना व महामंडळाचे कर्ज प्रकरणात एक महिण्याच्या आत निर्णय घेवून प्रस्ताव मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लाभार्थी गरजवंत नागरिक आपल्याकडे मोठ्या आशेने येतात, बँकेत अनेकवेळा चकरा मारतात तरी त्यांना वेळेवर कर्ज मंजूर केल्यास कर्जाचा निधी त्यांच्या उपयोगी पडावा यासाठी बँकांनी लहान सहान अडचणीसाठी परत न पाठवता त्या गोष्टींची त्यांचेकडून पुर्तता करून घेण्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तांत्रिक युगात लाभार्थ्यांना चकरा मारायला लावण्यापेक्षा जास्तीत जास्त कामे मोबाईलवरून करून घेण्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाकडील कर्ज प्रकरणांचा आढावा घेतांना वर्षभरातील नगण्य कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून पुढील तीन महिण्यात कामकाजात सुधारणा न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी मुद्रा लोन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण व विविध शासकीय योजनांतर्गत कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला.

जिल्ह्याला 2022-23 या वर्षात 1919 कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 171130 खातेदारांना 1632 कोटी 52 लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले असून ते उद्दिष्टाच्या 85 टक्के आहे. तर मागील वर्षी आजच्या तारखेत 149691 खातेदारांना 1273 कोटी (57.76 टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. मागील पाच वर्षातील खरीप पीक कर्ज वाटपाची एकूण टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुक्रमे 58 टक्के, 61 टक्के, 71 टक्के, 78 टक्के व 83 टक्के होती, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये यांनी दिली.

सर्वाधिक पीक कर्ज वाटपामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक 689 कोटी 14 लाख, भारतीय स्टेट बँक 347 कोटी 68 लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 142 कोटी 51 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 109 कोटी 38 लाख, बँक ऑफ महाराष्ट्र 95 कोटी 93 लाख यांचा समावेश आहे.

बैठकीला शासकीय यंत्रणेचे अधिकारी, सर्व बँकांचे प्रतिनिधी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

____________________________

25 जुलै रोजी ‘सैनिक दरबार’

यवतमाळ, दि 12 जुलै माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या फक्त वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे 15 जुलै 2022 पुर्वी सादर करून टोकण प्राप्त करावे. यापुर्वी लोकशाही दिन मध्ये सादर केलेली तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल.

तरी सदहु सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

___________________________

 

प्रशासनाने 17 वर्षीय मुलाचा थांबविला बालविवाह

 

यवतमाळ, दि 12 जुलै बाभूळगाव तालुक्यातील करळगाव येथे 17 वर्षीय अल्पवीन बालकाचा बालविवाह होत असलेबाबत माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कार्यालयाने तातडीने सदर बालविवाह थांबविला.

बाल संरक्षण कक्षाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनील बोक्से यांनी तातडीने करळगाव ता. बाभूळगाव या गावी भेट दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ, व चाईल्ड लाईन १०९८ यवतमाळ यांना बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन बालकाच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व बालविवाह झाल्यास बाल विवाह प्रतीबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते अशी माहिती देण्यात आली. सदर बालकाच्या आई वडिलांकडून बालकाचा विवाह २१ वर्ष पूर्ण झालेनंतरच करण्यात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सुचना पत्र सुद्धा देण्यात आले.

सदर बालविवाह थांबविण्यास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ चे पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक सुजाता मनवर, सहायक पोलीस उपनिरीक्षक रणजीत जाधव, पोलीस कर्मचारी रुपेश नेवारे, चाईल्ड लाईन टीम मेंबर दिलीप दाभाडेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनील बोक्से, गावातील पोलीस पाटील प्रज्ञा बन्सोड, आशा वर्कर रंजना नाईक याच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

____________________________

तंबाखू विरोधी पथकाद्वारे शासकीय रूग्णालय परिसरात धाड

55 नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही

 

यवतमाळ, दि 12 जुलै
श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तथा रुग्णालय परिसरात 7 जुलै रोजी तंबाखू विरोधी आकस्मिक धाडसत्र राबविण्यात आले. सदर धाडसत्रामध्ये कोटपा कायदा 2003 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. यादरम्यान रुग्णालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या व सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला. कोटपा कायद्याअंतर्गत एकुण 55 लोकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली तसेच त्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समुपदेशन करण्यात आले.

वरील धाडसत्र हे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत सदर धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत डॉ. मनाली बांगडे, मोहित पोहेकर, सागर परोपटे, अंजली रिठे, समुपदेशक ॲड. पुनम महात्मे, फराज सौदागर, सोनाली घायवान, किरण ठाकरे सहभागी होते. तसेच पोलीस विभागामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदिप परदेशी यांचे या विशेष सहकार्य लाभले असून सदर धाडसत्रामध्ये पोलीस विभागाचे सहायक फौजदार श्याम बोपचे, महिला पोलीस हवालदार अरुणा भोयर, पोलीस हवालदार मनोज चौधरी, वर्षा पाटील, पोलीस नाईक गोवर्धन वाढई इत्यादी सहभागी होते.

ही मोहीम प्रभावीपणे राबविणे करिता अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, विभाग प्रमुख डॉ.खाकसे यांचे सहकार्य लाभले.

________________________________

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

योजनेतील जाचक अटी काढणार

—————–

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई/यवतमाळ, दि. 12 : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकषात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

___________________________

प्रस्तावीत स्थानबध्द शेख मुद्दसिर शेख जमील यांनी 30 जुलै पुर्वी

समक्ष उपस्थित राहण्याचे जिल्हादंडाधिकारी यांची उद्घोषणा

 

यवतमाळ, दि 12 जुलै
शेख मुद्दासिर शेख जमील वय 23 वर्षे, रा. ताजपुरा वार्ड,उमरखेड, ता.उमरखेड जि. यवतमाळ याने “भारतीय दंड विधान” तसेच इतर कायद्यांचे कलमांअंतर्गत केलेल्या शिक्षापात्र अपराधाचे अनुषंगाने त्यांचे प्रवृत्तीत सुधारणा होण्याकरिता सादर करण्यात आलेल्या एम.पी.डी.ए.1981चे 3 (1) प्रमाणे सादर केलेल्या प्रस्तावावरुन त्यास स्थानबध्द करणे करीता दिनांक 17 जुन 2022 रोजी जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी स्थानबध्दतेचे आदेश पारित केले असता उक्त शेख मुद्दसिर शेख जमील सापडू शकत नाही असे प्रतिवेदन ठाणेदार पो.स्टे.उमरखेड यांचेकडून देण्यात आले आहे.

तरी शेख मुद्दसिर शेख जमील वय हा फरार झालेला आहे किंवा सदर स्थानबध्दता आदेश बजावणी चुकवण्यासाठी तो गुप्तपणे वावरत असल्याची खात्री पटवण्यात आली असल्याने त्यांनी प्रस्तावीत स्थानबध्दास जबाब देण्यासाठी दिनांक 30 जुलै 2022 रोजी किंवा तत्पुर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे उपस्थित होण्याची उद्घोषणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केली आहे.

___________________________

विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

यवतमाळ, दि 12 जुलै सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरीता आपला अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व त्यासोबत आवश्यक सर्व मुळ कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ या कार्यालयाकडे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करावे.

सन २०२२-२३ मध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यायार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: ३ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी यवतमाळ जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासुन वंचित राहु नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थींनी अद्यापही वैधाता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यानी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, यवतमाळ या समितीकडे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज दाखल करावा.

समिती कार्यालयातर्फे जुन २०२२ पर्यंत प्राप्त विद्यार्थांच्या प्रकरणात निर्णय घेण्यात आला असून अर्जदारांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी अर्जात नमुद केलेला ई-मेलवर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळाणी समितीचे उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.

_________________________

 

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी

23 जुलै पर्यंत अर्ज सादर करा

 

यवतमाळ, दि 12 जुलै साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ कार्यालयामार्फत सन 2021-22 या शैक्षणीक वर्षात दहावी, बारावी, वैद्यकीय व अभियांत्रीकी पदवी इत्यादी अभ्यास क्रमात 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन उर्तीण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनीना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रंमाकानुसार उपलब्ध निधिच्या आधीन राहुन अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते.

करिता मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनी यांनी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे संपर्क साधुन , दि.23 जुलै 2022 पर्यंत अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती अर्ज करावे, असे जिल्हा व्यवस्थापक यवतमाळ यांनी कळविले आहे.

________________________

 

उमरखेड तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेज 13 जुलै रोजी बंद राहणार

संततधार पाऊसामुळे आपत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेश

यवतमाळ, दि 12 जुलै संततधार पाऊसामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उमरखेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, कॉलेज (शासकिय, निमशाकिय) 13 जुलै 2022 रोजी एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे.

मागील तीन-चार दिवासपासुन उमरखेड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी-नोले-ओढे दुथडी भरुन वाहत आहे तसेच सदरील नदी – नाले ओढ्यावर असलेल्या रहदारी पुलावरुन प्रवाह वाहत आहे. उमरखेड शहरात व आजूबाजूच्या परीसरात स्थित असलेल्या शाळा व विद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात. पाण्याची परिस्थिती पाहता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता उमरखेड तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय ४८ तास बंद ठेवण्याबाबत स्थानिकांकडून विनंती पत्र प्राप्त झाले होते. त्यास अनुसरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपरोक्त आदेश पारित केला आहे.

Copyright ©