यवतमाळ सामाजिक

विदर्भातील बंद 11 साखर कारखान्यांना ‘नवसंजीवनी’ची चिन्हे माणिकराव ठाकरेंच्या पुढाकारात सहकार मंत्र्यांची बैठक

विदर्भातील बंद 11 साखर कारखान्यांना ‘नवसंजीवनी’ची चिन्हे माणिकराव ठाकरेंच्या पुढाकारात सहकार मंत्र्यांची बैठक

बोदेगावच्या ‘जय किसान’ची चाके फिरणार
यवतमाळ : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विदर्भात उभारलेले 11 साखर कारखाने आज रोजी बंद पडले आहे. हे कारखाने पुन्हा सुरू व्हावे यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच काल 12 मे रोजी सहकार मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले. त्यामुळे विदर्भातील कारखान्यांना ‘नवसंजीवनी’ मिळण्याची चिन्हे उमटली आहे.
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विदर्भात असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर यवतमाळचा अव्वल क्रमांक लागतो. पारंपरिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत कुठलाच बदल झाला नाही. त्यामुळे सहकारी तत्त्वावर विदर्भात साखर कारखाने उभारून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक स्थिती, सिंचनाची दुरवस्था, कामगारांचा प्रश्‍न आदी कारणांमुळे विदर्भातील अनेक साखर कारखाने बंद पडले. कोट्यवधीचे कर्ज झाल्याने आज रोजी हे कारखाने अखेरच्या घटका मोजत आहे. त्यात दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र लिहून हा कारखाना सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. जय किसान भाडेतत्त्वावर किंवा इतर मार्गाने सुरू व्हावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. त्याचबरोबर त्यांनी विदर्भातीलही बंद साखर कारखान्यासंदर्भात सहकार विभागाने धोरण आखावे, अशी मागणी करणारे पत्र दिले होते. त्यावरून 11 मे रोजी सहकार मंत्र्यांच्या सूचनेवरून पुण्यातील राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बैठकीचे पत्र काढले होते. या बैठकीला सहकार मंत्र्यांचे खासगी सचिव, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, सहकार, पणन वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव इतकेच नव्हेतर अमरावती येथील साखरचे प्रादेशिक सहसंचालक, राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक व बोदेगाव साखर कारखान्याच्या अवसायकालाही या बैठकीला निमंत्रित केले होते. 12 मे रोजी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील समिती कक्ष क्र. 702 मध्ये ही बैठक घेण्यात आली. त्यामध्ये माणिकराव ठाकरे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे जय किसानसह विदर्भातील बंद 11 कारखान्यासंदर्भातील समस्या मांडल्या. कारखाने बंद का पडले याची कारणमिमांसा होण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी ठाकरे यांनी केली. विदर्भातील साखर कारखाने विक्री न करता, ती भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
—— बॉक्स
*कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या अटीत सुधारणा*
विदर्भातील बंद साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात सहकार विभागाच्या काही अटी व शर्ती आहे. त्यामध्ये कारखाना भाडेतत्त्वावर घेणाऱ्यास 75 लाख रुपये अनामत द्यावी लागते. तसेच प्रत्येक टन उसाच्या गाळपामागे 100 रुपये द्यावे लागते. नेमक्या या अटीवर माणिकराव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. 75 लाख कुणीही देणार नाही तसेच टनामागे 100 रुपये मिळणे कठीण आहे. या अटीत सुधारणा व्हावी, अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे त्यांनी केली. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी या अटीत सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले. 75 लाखांऐवजी 25 ते 50 लाख अनामत रक्कम व टनामागे 100 ऐवजी 25 रुपये घेण्यासंदर्भातही समितीपुढे प्रस्ताव ठेवून धोरण ठरविले जाईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली.
—– बॉक्स
साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
विदर्भातील बंद 11 साखर कारखाने सुरू होण्याच्या दृष्टीने ठाकरे यांनी सहकार मंत्र्यांकडे उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी केली होती. त्यावरून सहकार मंत्र्यांनी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली जाईल, अशी ग्वाही दिली. ही समिती सर्व कारखान्यांचा अभ्यास अहवाल लवकरच सादर करणार आहे. त्यामुळे आता जय किसानच नव्हे तर विदर्भातील बंद 11 कारखान्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
——– बॉक्स,
‘जय किसान’च्या व्यथाही मांडल्या
दारव्हा तालुक्यातील बोदेगावमध्ये जय किसान सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला. कालांतराने या कारखान्यांवर कर्जाचे डोंगर उभे झाले. त्यामुळे कारखाना बंद पडू नये म्हणून माणिकराव ठाकरे यांनी माजी मंत्री विनय कोरे यांच्या वारणा समूहाला हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला. मात्र, त्यावेळी अडाण सिंचन प्रकल्पातील जलसाठा संपुष्ठात आल्याने उसाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे वारणा समूहाला हा कारखाना चालविणे अवघड झाल्याने त्यांनी गाशा गुंडाळला. या कारणामुळे हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. राज्य सहकारी बँकेचे मोठे कर्ज असून हा कारखाना भाडेतत्त्वावर द्यावा, अशी मागणीही यावेळी ठाकरे यांनी केली.
——- बॉक्स
7 वर्ष नव्हे 25 वर्षांसाठी कारखाना देणार
साखर कारखाना भाडेतत्त्वावर देताना तो सात वर्षांसाठी दिला जातो. त्यामुळे कुणी कारखाना घेण्यास पुढे येत नाही. त्यामुळे या अटीत सुधारणा करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी आता साखर कारखाने सात वर्षांसाठी नव्हेतर 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊ, असे जाहीर केले. राज्यातील उद्योजकांनी विदर्भातील बंद कारखाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना हवे तसे बदल करून देऊ व विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाहीसुद्धा सहकार मंत्र्यांनी ठाकरे यांना दिली.
——————-

Copyright ©