यवतमाळ सामाजिक

“वारकरी संप्रदाय व गुरूदेव सेवा मंडळांद्वारे राष्ट्रसंतांचे मौलिक विचार समाजापर्यंत जावे “- प्रा. डॉ अनंतकुमार सूर्यकार

“वारकरी संप्रदाय व गुरूदेव सेवा मंडळांद्वारे राष्ट्रसंतांचे मौलिक विचार समाजापर्यंत जावे “- प्रा. डॉ अनंतकुमार सूर्यकार

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ ( तरोडा ) ता.जि. यवतमाळ व समस्त मंगरूळ ग्रामवासीयातर्फे ३० एप्रिलला विश्ववंदनीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ‘ ग्राम जयंती ‘ भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली.
सायंकाळी पाच वाजेपासून टाळ मृदंगाच्या गजरात रथावर आरूढ राष्ट्रसंतांच्या प्रतिमेसह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, संत सेवालाल समाज मंडळ, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा समाज मंडळ, पंचशील समाज मंडळ, संतश्रेष्ठ भिमा भोई समाज मंडळ, संतश्रेष्ठ संताजी जगनाडे तैलिक समाज संघ, शिव जयंती उत्सव समिती, गजानन महाराज महिला भजन मंडळ, बालिका लेझीम मंडळ व गुरूदेव सेवा मंडळ, मंगरुळ सहभागी झाले होते. विठ्ठल गजर व राष्ट्रसंतांच्या गजर ,भजनांनी गाव
निनादून गेले. रस्त्यांनी , गल्ली बोळीतून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मारोती मंदिर, आठवडी बाजार मंगरूळ, येथे ग्रामजयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रथम ” विश्वधर्म सामुदायिक प्रार्थना ” करण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गावातील पुरुष, महिला, तरूण, तरूणी व बाल मंडळी सहभागी झाली होती. प्रार्थनेनंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“राष्ट्रसंतांची जयंती ही ग्रामजयंतीच्या रुपात आपण साजरी करतो . राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा केंद्रबिंदू मुळातच ‘ गाव ‘ आहे. ” गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा । गावची भंगता अवदशा । येईल देशा ।।” असे राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. गाव सुखी तर जग सुखी ह्या विचारधारेने गाव जगले पाहिजे. सद्यस्थितीत गावे सुधारतं आहेत परंतु वाईट वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरूणाई व्यसनाधीन होते आहे, गाव पुढारी गावातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आणि विविध प्रलोभने व आमिष दाखवून त्यांना देशोधडीला लावत आहेत याकरिता गुरूदेव सेवा मंडळ व वारकरी संप्रदायाच्या समन्वयातून जनतेला अज्ञानातून व व्यसनाधीन कुवृत्तीतून काढण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. असे आवाहन प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार, संत साहित्याचे अभ्यासक व यवतमाळ तालुका गुरूदेव सेवा मंडळाचे, संघटक यांनी प्रसंगानुरूप केले.
विठ्ठल कोडापे, संजय कांबळे,मोहन ठाकरे, ज्ञानेश्वर कोडापे, महादेव तुमडाम, रामेश्वर गावंडे, गणेश सोनोने, विजय ढोके, गणेश जोगे, सुनील गिरपुंजे,वसंत वनवे, नारायण सूर्यकार, प्रमोद पवार, रूपेश चव्हाण,बाळू महल्ले, दिलीप मोडले, पार्थ ठाकरे, कांताताई मोडले, राधाताई मोडले यासह गावातील असंख्य पुरुष, महिला, तरूण तरूणी बाल मंडळी चे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम व सहकार्य लाभले. संपूर्ण गावात ‘ गोपाळकाला ‘ वाटण्यात आला.
शेवटी संजय कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Copyright ©