यवतमाळ सामाजिक

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

ज्वारी मका व गहू खरेदीसाठी नोंदणी सुरू,इतर महत्वाच्या बातम्या सह.

 

यवतमाळ दि. 19 एप्रिल, :- राज्य शासनामार्फत आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व गहू खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत करण्यात येत आहे.

महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत 5 खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. यात महागाव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती महागाव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

तरी ऑनलाइन नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सात-बारा उतारा, पीकपेरा व बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत संबंधीत केंद्रावर देवून ज्वारी, मका व गहू खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.

____________________________________________

बालकांच्या शारिरीक व मानसिक विकासासाठी

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना 25 एप्रिल रोजी देणार जंतनाशक गोळ्या

सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतनाशकाचा डोज

औषधाचा कोणतेही दुष्परिणाम नाही

औषध देण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता नाही

 

यवतमाळ दि. 19 एप्रिल, लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्ताक्षयाचा आजार कमी होवून आरोग्यात सुधारणा होते व बालकांचा शारिरीक व मानसिक विकास होवून अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढत. त्यामुळे येत्या 25 तारखेला 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या 25 एप्रिल रोजी शासकीय व खाजगी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात तसेच शाळाबाह्य मुलांना समुदाय स्तरावर अल्बेंडाझोल ही जंतनाशक गोळी देण्यात यावी. या दिवशी सर्व मुले शाळेत उपस्थित राहीतील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या किंवा आजारपणामुळे किंवा अन्य कारणामुळे हे औषध देण्यात न आल्यास 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मॉप-अप दिनी ते शाळा महाविद्यालयात व घरोघरी जावून देण्यात यावे. हे औषध बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी शासनामार्फत मोफत देण्यात येते. याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने शासकीय किंवा खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशकाचे औषध देण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जंतामुळे होणारे त्रास व औषधाचे परिणाम व महत्व पालकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

बैठकीला डॉ. किशोरी जोशी-केळापुरे, अनिल शेंडगे, डॉ. प्रिती दुधे, डॉ. संदिप भटकर, वैशाली चोरमले, किरण ठाकरे, सचिन बोपाने, जलालुद्दिन गिलाणी, प्रशांत पाटील तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

____________________________________________

 

पोकरा योजनेतील विहिरी व जलसंधारणाची कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करा

 

शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जावून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

 

यवतमाळ दि. 19 एप्रिल, :- जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत विहिरी बाधकामाची तसेच जलसंधारणातील कामांच्या संथगतीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नाराजी व्यक्त करून ही कामे येत्या दोन दिवसात सुरू करून पावसाळा सुरू होण्यापुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला बचत गट यांचेकरिता अवजारे बँक, गोडाऊन, अन्न प्रक्रिया केंद्र, औषधी वनस्पती प्रक्रीया केंद्र, दाल मिल इत्यादी साठी शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्याचे व आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पोकरा योजना व बियाणे व खताबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभीये, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक श्री पेन्दाम, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.

पोकरा योजनेंतर्गत नोंदणी केलेले सर्व शेतकरी यांना ठिंबक व तुषार सिंचनाची सुविधा तसेच फळबाग व रेशीम शेतीची कामे मिळण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचेकडून मागणी अर्ज घ्यावे व त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावात यावर्षी किमान एक तरी रेशीम शेतीचे उद्दिष्ट ठेवावे जेणेकरून त्यांना होणारा लाभ पाहून पुढील वर्षी इतरही शेतकरी रेशीम शेतीकडे वळतील असे त्यांनी सांगितले.

बियाणे व खताबाबत आढावा घेतांना कृषी विभागाने वेळोवेळी बियाणे व खतांच्या तपासण्या कराव्या व शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जावून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांकडे सोयाबीन लागवडीसाठी घरचे बियाणे उपलब्ध राहतील याबाबत लक्ष देण्याचे व त्या बियाण्यांची चाचणी करून घेण्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात ग्राम कृषी समिती स्थापन झाली आहे का याबाबत तपासणी करणे, 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान पीक कर्ज मेळावे आयोजित करणे, शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे फायदे सांगून ते वापरासाठी जनजागृती करणे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जैविक खताचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, त्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन करणे व त्यासोबतच नरेगा योजनेमध्ये फळबाग व रेशीमची जास्तीत जास्त पिके घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

____________________________________________

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला आणखी एक बालविवाह

 

यवतमाळ दि. 19 एप्रिल, :- जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावातील १६ वर्षीय बालिकेचा विवाह दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता नियोजित असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळाली. त्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व घाटंजीच्या तहसीलदार पूजा मातोडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व तालुका प्रशासन यांनी तातडीने कारवाई केली व होणारा बालविवाह वेळीच रोखला.

मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होत पर्यत लग्न न करणे बाबत समजून सांगण्यात आले. मुलींच्या घरी भेट देऊन मुलीच्या कुटुंबास व नातेवाईक यांना मुलीचे लग्न ती सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समज देण्यात आली. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखल पात्र गुन्हा आहे याबाबत माहिती देण्यात आली.

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करू नये याबाबत लेखी जवाब उपस्थित अधिकारी व पदाधिकार्‍यांना मुलीच्या नातेवाईक यांनी दिला व बालिकेला बाल कल्याण समितीला हजर करणे बाबत सूचना पत्र जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिले तसेच पोलीस स्टेशन घाटंजी द्वारे कलम १४९ अन्वये नोटीस देण्यात आली. गावातील जबाबदार व्यक्तींनी बालविवाह बाबत सतर्क राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

सदर कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, देवेंद्र राजूरकर यांनी तालुका प्रशासनाच्या मदतीने योग्य वेळी तत्परतेने कारवाई केली. यामध्ये कार्यवाहीमध्ये घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम, तालुका बाल संरक्षण समिती सदस्य- अरुण कांबळे, चाईल्ड लाईनचे दिलीप दाभाडकर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चे स्वप्नील शेटे, ग्रामसेवक- विजय उडाखे, तलाठी- एम बी राठोड, सरपंच- कुणाल राठोड, उप सरपंच- जितेंद्र राठोड, पोलीस पाटील- प्रवीण बोडाळे, अंगणवाडी सेविका- नर्मदा राठोड इत्यादी सहभागी होते.

01 जानेवारी 2022 ते 17 एप्रिल 2022 पर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एकूण 11 बालविवाह रोखले असून त्यापैकी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांनी बालविवाह बाबत सतर्क राहावे व बालविवाह बाबत माहिती असल्यास त्वरित चाइल्ड लाईन १०९८ वर माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

“०३ मे २०२२ रोजी अक्षय तृतीया आहे व हा शुभ मुहूर्त समजल्या जातो यादिवशी अधिकाधिक विवाह होतात यामध्ये बालविवाह चे प्रमाण देखील आहे अश्या वेळी नागरिकांनी दक्ष राहावे, गावात बालविवाह होत असतील तर गावचे ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना माहिती द्यावी व बालविवाह रोखून बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यास मदत करावी असे आवाहन देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.”

Copyright ©