यवतमाळ सामाजिक

वन मजुराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक

वन मजुराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक

पांढरकवडा: केळापूर तालुक्यातील एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या छोट्यासा सायखेडा या गावातील विनय किसन नगराळे झाला पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकताच लागल्या निकालांमध्ये विनय नगराळे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.२०१७ मध्ये झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिल्या परीक्षेत तो अपयशी ठरला मात्र अपयशातुन न खचता आपल्या जिद्द, चिकाटी , धैय ठेवुन २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दुसऱ्यांदा दिला . कठीण परस्थितीवर मात करीत दिवस रात महिन्यात करून आपल्या जिद्द व चिकाटी ,धैय यांच्यावर अखेर पोलीस उपनिरीक्षक बनला .विनय हा गरीब घरान्यातिल विद्यार्थी असून तो वनमजुराचा मुलगा विनय किसन नगराळे होय . सायखेड येथे राहणारा विनय किसन नगराळे हा वनमजूर किसनराव हिरामण नगराळे यांचा मुलगा आहे . त्याचे वडील हे मारेगाव येथे वनविभागात कार्यरत आहे . विनयचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण सायखेडा ( धरण ) व पांढरकवडा येथे झाले तर इंजिनिअरिंग शेगाव येथे झाले . शासकीय अधिकारी बनून लोकसेवा करण्याची ईच्छा पूर्वीपासून मनात असल्याने तो इंजिनिअरिंगकडे न वळता , तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी पांढरकवडा येथील विराट अभ्यासिकामध्ये तो काही वर्षापासून अभ्यास करीत होता व पांढरकवडा येथील मराठी शाळेच्या मैदाना वरती तो शारिरीक चाचणी ची तयारी करीत होता पहिल्या परीक्षेत अपयशी ठरला , मात्र तो डगमगला नाही . घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून तो पुन्हा लढला . अखेर त्याने यश मिळविलेच . लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात तो अनुसूचित जाती प्रवर्गामधून तो राज्यात तिसरा आला त्या यशाला संपूर्ण जिल्ह्यातून व तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून विनय हा एक छोट्याशा घरान्यातील ग्रामीण भागातील सायखेडा या छोट्या. खेडेगावातून येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता तो एक प्रेरणेचा स्त्रोत निर्माण झाला असून त्यांच्याद्वारे केळापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना मिळेल. त्याचे वडील वनमजूर म्हणून मारेगाव वनविभागात कार्यरत आहे तो आपल्या यशाचे श्रेय , आई , वडील किसन नगराळे ,व त्याचे गुरु मेघराज निमसरकार व मित्र मैत्रीण आदींना देत आहे .

ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या अधिकाराचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि. 15 मार्च, : ग्राहकांना प्रत्येक स्तरावर गुणवत्तापुर्ण व चांगली सेवा मिळावी हा ग्राहकांचा हक्क असून ग्राहक संरक्षण कायद्याने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त अन्न औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, प्रादेशिक परिवहनअधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमीटेड, आरोग्य विभाग , विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप्स व कृषी विभाग यांचे मार्फत केमीस्ट भवन, शिवाजी नगर, आर्णी रोड यवतमाळ येथे ग्राहक प्रबोधन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. यावेळी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे यांचे हस्ते सदर ग्राहक प्रबोधन व प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेन्द्र निमोदीया प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की आपण ग्राहक म्हणून मुल्य देवून वस्तु घेतो, त्या मुल्यानुसार योग्य गुणवत्तेची वस्तु आपल्याला मिळावी हा ग्राहकाचा अधिकार आहे. सद्या ईकॉमर्स द्वारे वस्तु खरेदी करण्याचे चलन वाढले असून ई-व्यवहारासाठी देखील ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे. ऑनलाईन व्यवहार करतांना नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, आपला आधार कार्ड नंबर, ओटीपी नंबर व बँक खात्याशी संबधीत माहिती कोणाला देवू नये, याबाबत दक्ष राहावे. शासनाच्या अन्न औषध विभाग, वजन मापे, पुरवठा विभाग, सायबर क्राईम व इतर विभागांनी देखील त्यांच्या विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती व ग्राहकांचे अधिकारराबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकाराबाबत जागृती होईल. तसेच अन्यायग्रस्त नागरिकाच्या तक्रारी शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नंदकुमार वाघमारे यांनी ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी ग्राहक आयोगाकडे यावे, त्यांना आवश्यक मदत करण्यात येईल असे सांगितले. तर प्रा. नारायण मेहरे यांनी सुशिक्षीत नागरिकांनी समाजहितासाठी ग्राहक चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेन्द्र निमोदीया यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी व ग्राहक सक्षम व्हावा यासाठी ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन शिल्पा नगराळे यांनी केले.

कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

तब्बल दोन वर्षानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या शून्यावर

यवतमाळ दि. 15 मार्च, : यवतमाळ जिल्ह्यात मार्च-2020 नंतर आज प्रथमच कोरोनाची सक्रीय रूग्णसंख्या शुन्यावर आली आहे. गत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मंदावली होती त्यात मागील 5 दिवसांपासून केलेल्या तपासणीत एकही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर जिल्ह्यात सक्रीय असलेला एक रूग्ण देखील आज बरा होऊन घरी गेल्याने जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या तीन लाटेनंतर प्रथमच एकही सक्रीय कोरोना रूग्ण नसल्याने यवतमाळ जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाल्याचा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही कायम असून जिल्ह्यातील कोरोना तपासणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद, आजुबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या व तेथून प्रवाशांचे होणारे आवागमन, ही स्थिती पाहता जिल्ह्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढू नये यासाठी कोरोना त्रिसुत्री नियमांचे पालन करणे अजूनही आवश्यक आहे.

दोन वर्षापुर्वी यवतमाळच्या तीन कुटूंबातील 10 सदस्य दुबई टूर वरून 1 मार्च 2020 रोजी भारतात परतल्यावर त्यातील एक सदस्य पुणे येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे यवतमाळ येथील उर्वरित नऊ सदस्यांना 10 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल नागपूर येथून 14 मार्च रोजी प्राप्त झाला असता त्यातील दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. नंतर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा हा आलेख कमी जास्त प्रमाणात वाढतच गेला. जिल्ह्यात आजपर्यंत 79 हजार 65 कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले तर 77 हजार 262 जण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील 1803 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक 1399 कोरोना बाधीत रूग्णांची नोंद दिनांक 3 मे 2021 रोजी, तर सर्वाधिक 46 मृत्यू दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी झाले होते.

सुरवातीला कोरोना तपासणीसाठी नागपूर येथे नमुने पाठवल्या जात होते. नंतर जिल्ह्यात 2 जून 2020 पासून व्ही.आर.डी.एल. मशीन कार्यान्वित झाल्याने कोरोना तपासण्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातच होऊ लागल्या. यात पुढे आर.टी.पी.सी.आर. मशीनची टप्प्याटप्प्याने क्षमता वाढ करून तपासणी संख्या वाढविण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल आठ लाख 48 हजार 920 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 लाख 69 हजार 855 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

नवीन आलेला आजार, अल्पावधीतच वेगाने पसरणारा, त्यात मृत्यूचा धोका. जिल्हा कोरोना पॉझिटीव्ह ते कोरोना निगेटिव्ह होण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अचानक आलेल्या या आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळीच समोर सरसावल्याने नागरिकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास दृढ झाला. कोरोना कालावधीत जिल्ह्यातील एकूण सर्वच लोकप्रतिनीधी तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग व इतर सर्व शासकीय यंत्रणा व काही सेवाभावी संस्था यांनी रात्रंदिवस एकजुटीने काम केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल उभारण्यात येवून मोफत उपचार सेवा देण्यात आली. खाजगी रूग्णालये अधिग्रहीत करण्यात आली. खाजगी संस्थात रूग्णांची लूट होऊ नये म्हणून शासनामार्फत तपसणीचे दर देखील निश्चिती करून देण्यात आले. दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात ऑक्सीजन साठा अद्यावत करण्यात आला. प्रत्येक ग्रामीण आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स मिळून एकूणच आरोग्य सेवेचे अद्यावतीकरण करण्यात आले. शासनातर्फे कोरोना कालावधीत गरजूना मोफत अन्यधान्य व शिवभोजन केंद्राद्वारे मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक संस्था व नागरिकांमार्फत सेवाभावातून एकमेकांना मदत करण्यात आली. त्यातून नागरी एकात्मता व एकमेंकांबद्दल आत्मीयता वाढली. आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने एन्ट्री घेवू नये हीच सर्वाची अपेक्षा आहे.

*नागरिकांनी केलेले नियमांचे पालन व लसिकरणाला दिलेला प्रतिसाद यामुळे कोविड वर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सध्या कोविड चाचण्यांची संख्याही कमी आहे. आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कोविड त्रिसुत्रीचे पालन करावे व कोविडपासून संरक्षणासाठी नागरिकांनी लसिकरण दोन्ही डोज पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.* बॉक्स

_________________________________

विशेष मोहिमेंतर्गत फेब्रुवारीमध्ये जात पडताळणीची 2242 प्रकरणे निकाली

नोव्हेंबर-2021 पर्यंतची जात प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध

 

यवतमाळ दि. 15 मार्च, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी विशेष मोहिमेंतर्गत माहे नोव्हेंबर-2021 पर्यंत प्राप्त सर्वच प्रकरणे तपासून माहे फेब्रुवारी-2022 मध्ये एकूण 2242 प्रकरणाचा निपटारा केला आहे.

निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये शैक्षणिक-1974, सेवा-81, निवडणूक-184 व इतर-3 अशी एकूण 2242 जात पडताणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.

ज्या अर्जदारांनी समितीकडे माहे नोव्हेंबर-2021 पर्यंत प्रकरणे सादर केलेली आहे, त्या सर्व अर्जदारांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अर्जात नमूद ई-मेल वरून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. प्रमाणपत्र बारकोड आधारीत डिजीटल स्वाक्षरीने निर्गमीत केले असल्यामुळे ते मुळ प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नेण्याकरिता समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

समितीमार्फत पुढील प्रकरणे निकाली काढण्याचे काम प्रगतीपथावर असून प्रलंबित प्रकरणात अर्जदारांना ई-मेल व भ्रमणध्वणीवर संगणक प्रणालीमार्फत त्रुटीचा संदेश पाठविण्यात आला आहे. सदर त्रुटीची पुर्तता त्वरीत पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांनी केले आहे.

_______________________________

यवतमाळमध्ये स्थानिक सुट्टया जाहीर

 

यवतमाळ दि. 15 मार्च, : राजनैतिक सेवा विभागाचे शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार 2022 या वर्षाकरिता जिल्ह्यात स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. यात पोळा सण निमित्त शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2022 व लक्ष्मीपुजन (दुसरा दिवस) निमित्त मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 या दिवशी स्थानिक सुटी जाहिर केली आहे. स्थानिक सुट्ट्यांचे क्षेत्र जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय व अधिकोष वगळता संपुर्ण यवतमाळ जिल्हा राहणार आहे.

____________________________

 

वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाला नेतृत्व देण्यासाठी महिला सक्षम व्हाव्या

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि. 15 मार्च, : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाला नेतृत्व देण्यासाठी महिला तयार झाल्या पाहिजे, त्यासाठी प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य दिल्या जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल विकास विभागाच्या सखी वनस्टॉप सेंटर द्वारे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सविता चौधर, स्नेहल कनिचे, जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, आशा वर्कर उषा भुरके, महानंदा टोम्पे, सरिता अभयनिता, श्रीमती भगत, लीलाबाई खंडारे, धनश्री देशमुख, वन स्टॉप सेंटर च्या मिनल जगताप, सोनाली पाटील त्यांची चमू तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेंद्र राजुरकर व चमु व महिला व बालविकास विभागाचे गजानन जुमळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध विभागाच्या महिला प्रतिनिधी, विद्यार्थीनी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©