यवतमाळ सामाजिक

निधी वेळेत खर्च करा- जिल्हाधिकारी जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून

वंचितांच्या समस्या सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध:अमोल येडके
कोरोणा बाधित किती? इतर बातम्या सह..

पारधी बेड्यावर समाधान शिबीरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन

जातीचे दाखले, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण

यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी, : शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जातीचे दाखले, रेशन कार्ड, ओळखपत्र, विविध योजनेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दुर्गम भागातील आदिवासी पोड व पारधी बेड्यावरील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये व सर्वांचा विकास व्हावा या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ यासारख्या उपक्रमातून प्रशासन आपल्या जवळ पोहचून आपल्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

यवतमाळ तालुक्यातील महसुल मंडळ कापरा (मे) येथे तहसिल कार्यालय यवतमाळ यांचे वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते.

या शिबीरात पारधी समाज बांधवाना जातीचे दाखले, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पांदण रस्ता अतिक्रमण निष्कासन, सात-बारा फेरफार वाटप, कृषी साहित्य, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजने बाबत मंजुर प्रकरणातील प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी येडगे यांचे हस्ते कापरा ते सावरच्या पानंद रस्त्याचे भुमीपूजन व सनी कापरेकर यांचे शेतामध्ये रब्बी पिकाबाबत ई-पिक पाहणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

या समाधान शिबीरामध्ये विविध विभागाचे कॅम्प लावण्यात आले होते. यवतमाळ वाईल्ड लाईन 1098 लक्षगट हस्तक्षेप परीयोजना, मतदान नोंदणी निवडणूक विभाग, एकात्मीक महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान, संजय गांधी निराधार योजना, कृषी विभाग, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग डिमायन्स फाऊन्डेशन अंतर्गत शेतकरी उत्पादक संघटना, उत्पादक कंपनी व वैद्यकीय महाविद्यालय तर्फे रक्तदान व लसिकरण कॅम्प व आधार अपडेशन कॅम्प व आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले. तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी प्रस्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार राजेश कहारे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात सरपंच अनिता ढोले, मंडळ अधिकारी व्हि. डब्ल्यु. बकाले, तलाठी निशा उईके, ग्रामसेवक किशार जिवतोडे, संजय निबोरकर, प्रविण सोयाम, राजु महाजन, अमर शेंडे, केशव गायकी, मोहन तराडे, यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन व परिश्रम केले. तसेच जि.प.प्राथमिक शाळा कापरे येथील मुख्याध्यापक विनोद डाखोर व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे, रिलायन्स ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
__________________________________________________

निधी वेळेत खर्च करा- जिल्हाधिकारी जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

 

यवतमाळ, दि 11 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम या तिन्ही योजनेतील निधी सर्व विभागांनी 15 मार्च पर्यंत खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम आणि खनिज प्रतिष्ठान निधीच्या खर्चाचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी बचत भवन येथे घेतला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते.

जिल्हा परिषद आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विभागांनी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित कामाचे कार्यादेश द्यावेत. दिलेला निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. निधी खर्च न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील असेही त्यांनी यावेळी बजावले.

नगर पालिका, क्रीडा विभाग, कौशल्य विकास, वीज वितरण कंपनी, यांनी मंगळवार पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अन्यथा निधी समर्पित करावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

खनिज प्रतिष्ठान निधीतून निधी देण्यात आलेल्या विभागांनी अद्यापही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, छायाचित्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले नाही. काम झाल्याचे आणि निधी खर्च झाल्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा विभाग, मेडा आणि वीज वितरण कंपनीने अद्यापही प्रस्ताव सादर न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. क्रीडा विभागाने तिन्ही योजनांमध्ये प्रस्ताव सादर न केल्याबाबत क्रीडा विभागाच्या कार्यप्रणालीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्रीडा विभागाची वेगळी बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. बैठकीला उपस्थित नसलेल्या विभागप्रमुखाना विचारणा करावी तसेच त्यांच्या वरिष्ठांना याबाबत अवगत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिलेत.

बैठकीला संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
__________________________________________________
दि. 11 फेब्रुवारी 2022

गेल्या 24 तासात 54 पॉझिटिव्ह ; 173 कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 758

 

यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 54 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 173 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 746 व बाहेर जिल्ह्यात 12 अशी एकूण 758 झाली आहे. त्यातील 45 रूग्ण रूग्णालयात तर 713 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1057 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 54 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1003 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78817 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 76258 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1801 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 54 रूग्णांमध्ये 28 महिला व 26 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील तीन, दारव्हा तीन, घाटंजी सहा, कळंब सहा, नेर चार, पांढरकवडा चार, पुसद एक, राळेगाव 11, यवतमाळ 15 व झरी जामणी येथील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 29 हजार 264 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 50 हजार 374 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.50 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 5.11 आहे तर मृत्यूदर 2.29 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1713 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 734 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
__________________________________________________

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या

नामांकित निवासी शाळेत नि:शुल्क प्रवेश

यवतमाळ, दि. 11 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव व यवतमाळ तालुक्यांचा समावेश असून या कार्यक्षेत्रात सन 2022-23 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत पहिल्या व दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत विद्यार्थ्याच्या जन्म तारखेचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, दोन पासपोर्ट फोटो, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे. इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2022 असा आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.
_________________________
_________________________

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

 

यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी, : पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 13 ते 15फेब्रुवारी 2022 या कालावधीत यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

13 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व मुक्काम. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व खनिज विकास निधी भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत योजनांचा आढावा. दुपारी 12 वाजता आदिवासी उपयोजनेचा आढावा. दुपारी 12.30 वाजता अनुसूचित जाती उपयोजना खर्चाचा आढावा. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री ग्रम सडक योजनेचा आढावा. दुपारी 3.30 वाजता प्रकल्प संचालक नॅशनल हायवे ऑथोरिघ्टी ऑफ इंडिया आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता महाप्रबंधक वेकोलि वणी नॉर्थ व वणी एरिया यांचे समवेत आढावा बैठक. रात्री विश्रामगृह येथे मुक्काम.

15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथून झरी जामणीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता झरी येथे आगमन व नगर पंचायत, तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयास भेट. दुपरी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता. झरी येथून मुकूटबनकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता मुकूटबन येथे आगमन व आर.सी.सी.पी.एल. भेट व पाहणी. सायंकाळी 4 वाजता मुकूटबन येथून नागपूरकडे प्रयाण.
_________________________
_________________________

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार : 2021

प्रवेशिका पाठविण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 

यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी, : यवतमाळ दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी अधिकाअधिक पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलेले आहेत.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक, अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती कार्यालय येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यात पुरस्कारासह 51 हजार रुपये पारितोषिक, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क), समाज माध्यम पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार तसेच विभागीय पुरस्कारामध्ये अमरावती विभागाकरिता लोकनायक बापूजी अणे पुरस्काराचा समावेश आहे.

या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल. 2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार : ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार : केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा : इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

छायाचित्रकार पुरस्कार : “तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

 

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार : विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे. प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

Copyright ©