Breaking News यवतमाळ

गेल्या 24 तासात एक मृत्यू तर आज कोरीना बाधित किती ? इतर बातम्या सह.पहा

गेल्या 24 तासात एक मृत्यू तर आज कोरीना बाधित किती ? इतर बातम्या सह.पहा

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध

  • ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 877

 

यवतमाळ दि. 10 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 38 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 167 जण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 859 व बाहेर जिल्ह्यात 18 अशी एकूण 877 झाली आहे. त्यातील 42 रूग्ण रूग्णालयात तर 835 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 886 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 848 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78763 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 76085 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1801 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये मोहा ता. यवतमाळ येथील 30 वर्षीय पुरूषचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 38 रूग्णांमध्ये 16 महिला व 22 पुरूष असून त्यात बाभुळगाव तालुक्यातील सात, दारव्हा एक, दिग्रस एक, कळंब तीन, नेर चार, पांढरकवडा एक, पुसद दोन, उमरखेड एक व यवतमाळ येथील 18 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 28 हजार 183 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 49 हजार 362 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.51 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.29 आहे तर मृत्यूदर 2.29 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1713 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 52 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 735 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 1 वेड उपयोगात असून 856 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
__________________________________________________

अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान

18 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ दि. 10 फेब्रुवारी, : राज्यातील नोंदणीकृत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत 2021-22 करिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.

इच्छुक संस्थांनी शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2015 मध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यात परीपुर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 18 फेब्रुवारी 2022 पर्यत सादर करावा, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.
___________________________________________________

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

कळंब व राळेगाव तालुक्यात दिली भेट

ई-पीक, तलाठी दप्तर व बचत गटाच्या कामांची केली पाहणी

 

यवतमाळ दि. 10 फेब्रुवारी, : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज देवनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देवून तेथील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांना व्यवस्थीत लिहता वाचता येते काय, त्यांचेसाठी खेळणे, पिण्याचे पाणी, वर्ग खोल्या तसेच पटसंख्येनुसार शिक्षक आहेत का याबाबत त्यांनी तपासणी केली.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी बचत गटाच्या वनउपज विक्री केंद्र, धान्य स्वच्छता व प्रतवारी मशीन तसेच पाणी फिल्टर मशीनची देखील पाहणी केली. महिलांनी वेगवेगळ्या कामातून आपले उत्पन्न वाढवून व आर्थिकरित्या सक्षम व्हावे याबाबत त्यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.

जोडमोहा, वाढोणा खुर्द व कळंब येथे जिल्हाधिकारी येडगे यांनी तलाठी दप्तर व रेशन दुकाणाची तपासणी केली तसेच लसिकरण सत्राला भेट दिली. तर वाढोणा खुर्द येथे त्यांनी स्वत: ई-पीक पाहणीच्या नोंदी घेतल्या. तलाठी दप्तर व लिपीक दप्तराची तपासणी करतांना कामकाजातील चुका निदर्शनात आणून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांना दिल्या.

याप्रसंगी राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, कळंबचे तहसीलदार सुनिल चव्हाण, अधिक्षक अमोल पवार, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तालुका आरोग्य अधिकारी विजय अकोलकर, मुख्याधिकारी नंदु परळकर, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच, शिक्षक, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच संबंधीत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
__________________________________________________

क्रीडा प्रबोधीनी प्रवेशाकरीता कौशल्य चाचण्यांचे आयोजन

 

यवतमाळ दि. 10 फेब्रुवारी, : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील ११ क्रीडा प्रबोधनी मध्ये अॅथलेटीक्स, ज्युदो, शुटींग, सायकलींग, वेटलिफ्टींग, हॉकी, बॉक्सींग, जिम्नॅस्टीक, फुटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्चरि, हॅन्डबॉल या खेळातील उदयन्मुख खेळाडूंना प्रवेश देण्यासाठी खेळ निहाय सरळ प्रवेश व कौशल्य चाचण्यांचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात आले आहे.

निवासी व अनिवासी प्रवेशाकरीता कौशल्य चाचण्यांचे आयोजन विभागस्तरावर करण्यात आले असून चाचण्या आयोजनाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

जिल्हास्तर चाचणी प्रवेश अर्ज :- अॅथलेटीक्स, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल, हॅन्डबॉल, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, सरळ प्रवेश प्रक्रीये करीता व कौशल्य चाचणी प्रवेशासाठी अर्ज व चाचणी दिनांक -७ ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोधणी रोड, यवतमाळ येथे अर्ज प्राप्त करुन घेवून कार्यालयीन वेळेत सादर करावे.

विभागस्तर चाचणी करीता उपस्थिती :- ॲथलेटीक्स, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल,

हॅन्डबॉल, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, सरळ प्रवेश प्रक्रीये करीता व कौशल्य चाचणी प्रवेशासाठी अर्ज व चाचणी दिनांक २१ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत विभागीय क्रीडा सुंकल,मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहे.

सरळ प्रवेशाकरीता व कौशल्य चाचणी करीता सदर चाचण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज, क्रीडा प्रमाणपत्र, अधारकार्ड, जन्मतारिख दाखला इ. आवश्यक कागदपत्रे माहितीसह सादर करावे. राज्यस्तरीय चाचण्यांचा कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येणार आहे.

अधिक माहिती करीता जिल्हा क्रिडा कार्यालयात राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले, किशोर चौधरी, अरुणा गंधे यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
___________________________________________________

दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संपन्न

 

यवतमाळ दि. 10 फेब्रुवारी : आय. सी. आय. सी. फाउंडेशन, यवतमाळ व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांचे संयुक्त विद्धमाने 8 फेब्रुवारी रोजी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश उ. नेमाडे यांनी बदलते हवामान व कीड व रोगामुळे पिकांमध्ये कमी होणारे उत्पन्न यास पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी कृषी पूरक व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच व्यवसायामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी वर मात करण्या करिता वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा अशी विनंती केली.

विकास अधिकारी राजेश कांबळे, यांनी आय सी आय सी फाउंडेशनच्या ग्रामीण उपजीविका उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्यातील घाटंजी, केळापूर व मारेगाव या तीन तालुक्यामध्ये राबिविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच दुध व दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व व उद्देश विषद केले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. पी. पी. थोरात, यांनी प्रक्रियायुक्त पदार्धाचे मुल्यसंवर्धनचे महत्त्व व विपनन या विषयी मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. निखील सोळंके, खवा, पनीर, दही, लोणी इ. प्रक्रिया उद्योगाविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार बादल राठोड यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी आय सी आय सी फाउंडेशन, यवतमाळचे मंगेश लोखंडे, संदीप बकाल, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©