Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोघांचा मृत्यू कोरोणा बाधित किती?इतर बातम्या सह पहा.

गेल्या 24 तासात दोघांचा मृत्यू कोरोणा बाधित किती?इतर बातम्या सह पहा.

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1007

 

यवतमाळ दि. 09 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 121 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 192 जण कोरोनामुक्त झाले असून दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 979 व बाहेर जिल्ह्यात 28 अशी एकूण 1007 झाली आहे. त्यातील 44 रूग्ण रूग्णालयात तर 963 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1272 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 121 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1151 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78725 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 75918 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1800 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये पिंपानेर ता. आर्णी येथील 31 वर्षीय पुरूष व लोणी ता. आर्णी येथील 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 121 रूग्णांमध्ये 51 महिला व 70 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 18, बाभुळगाव एक, दारव्हा चार, दिग्रस 16, घाटंजी नऊ, कळंब दोन, महागाव एक, मारेगाव एक, नेर एक, पांढरकवडा आठ, पुसद दोन, राळेगाव तीन, उमरखेड 16, यवतमाळ 37 व इतर जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 27 हजार 274 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 48 हजार 516 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.52 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 9.51 आहे तर मृत्यूदर 2.29 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1712 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 54 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1712 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 734 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 1 वेड उपयोगात असून 856 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
_________________________________________________

शहरी भागातील प्राथमिक शाळा आजपासून सुरू

 

यवतमाळ दि. 09 फेब्रुवारी : जिल्ह्यात शहरी भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग दिनांक 10 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागात इयत्ता पहिलीपासून तसेच शहरी भागातील इयत्ता पाचवी पासूनचे सर्व वर्ग यापुर्वीच सुरू करण्यात आले आहेत. विद्याथी शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक राहील. तसेच पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.

शासनाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शाळा परिसरात सर्वांना मास्क वापरने सक्तीचे राहील. शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्याचे, पालकांना लसिकरणासाठी प्रोत्साहीत करण्याचे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत सकाळ व दुपार च्या पाळीत वर्ग भरविणे, मैदानी खेळ, स्नेहसंमेलन इ. गर्दीचे कार्यक्रमांवर बंदी, सर्दी, ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती न करण्याचे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय पर्यवेक्षीय यंत्रणांनी शाळेत भेटी देऊन कोविड-19 नियमांचे पालन करून शाळा सुरू असल्याबाबत खात्री करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.

__________________________________________________

फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 09 फेब्रुवारी, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित केले आहे.

प्रक्षेत्र प्रशिक्षणामध्ये फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, आंबा, पेरू सघन लागवड, विदेशी फळपिक लागवड, फळबाग व्यवस्थापण लागवड, बहार व्यवस्थापण, काटेकोर शेती व्यवस्थापण, कांदाचाळ, संरक्षीत शेती, एकात्मिक किड, रोप अन्नद्रव्य व्यवस्थापण, काढणी पश्चात व्यवस्थापण प्राथमीक प्रक्रीया केंद्र काजू, बेदाना, सिताफळ, आवळा, डाळींब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायफेनिंग चेंबर शित वाहक, बाजारपेठ उपलब्धता, निर्यात, फायटो सॅनेटरी, पेस्टीसाईट रेसिडी मॅनेजमेंट इत्यादीबाबत मार्गदर्शन तसेच कृषी पर्यटन या विषयांचा समावेश आहे.

फळबाग लागवडी, कांदाचाळ, संरक्षीत शेती, प्राथमिक प्रक्रिया इत्यादीचा लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छीत असलेल्या, चालू आर्थीक वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना राज्यअंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणाकरिता अर्ज करता येईल. लक्षांकाच्या मर्यादेपेक्षा अधीक अर्ज प्राप्त झाल्यास विहित पद्धतीने सोडत काढण्यात येईल.

सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच दिवसाचा राहील. यामध्ये प्रवास, भोजन व निवास याकरिता प्रति लाभार्थी एक हजार रुपये प्रति दिन अनुदान आहे.

शेतकऱ्याने अर्ज करतांना पुर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा प्रवर्ग, स्त्री, पुरूष मोबाईल नंबर, घटक, सातबाराची प्रत यांचा अर्जात समावेश करावा.

लाभार्थी यादीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची मान्यता मिळाल्यानंतर राज्यांतर्गत प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करून वेळापत्रक निवड लाभार्थींना कळविण्यात येईल. अधीक माहितीकरिता शेतकऱ्यांनी आपले तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे, असे उपविभागीय कृषी अधिकारी तेजस चव्हाण यांनी कळविले आहे.

Copyright ©