यवतमाळ राजकीय सामाजिक

आ. संजय राठोड यांच्या पाठपुराव्याने अडाण प्रकल्पाच्या संपूर्ण कालव्याच्या अस्तरीकरणास मान्यता

आ. संजय राठोड यांच्या पाठपुराव्याने अडाण प्रकल्पाच्या संपूर्ण कालव्याच्या अस्तरीकरणास मान्यता

मुख्य कालव्याच्या काटछेदामध्ये त्रुटी असल्याने पाणी ‘टेल’ पर्यंत पोहचले नाही

यवतमाळ – दारव्हा तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी ४० वर्षांपूर्वी कारंजा तालुक्यात अडाण नदीवर मसणी येथे बांधण्यात आलेल्या अडाण मध्यम प्रकल्पामधून अद्यापही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले नाही. त्याची दखल घेऊन या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार संजय राठोड यांनी यापूर्वीच्या युती सरकारच्या कार्यकाळात महसूल राज्यमंत्री असताना औरंगाबाद येथील ‘वाल्मी’ संस्थेला या कालव्याचा सूक्ष्म अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले होते. या संस्थेने सुचविलेल्या उपायोजना स्वीकारून मुख्य कालव्याचा संपूर्ण अस्तरीकरणासह ९७.७३ कोटींचा विशेष दुरूस्ती प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या अडाण प्रकल्पाच्या पुर्नस्थापनेच्या प्रस्तावाबाबत काही माध्यमांमध्ये दिशाभूल करणारे वृत्त प्रकाशित झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी आ. संजय राठोड यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी बोलताना आ. संजय राठोड यांनी या प्रकल्पातील त्रुटी दूर सारून नव्याने करण्यात येणाऱ्या दुरूस्तीबाबत सविस्तर माहिती दिली. अडाण नदी प्रकल्पाचा मुख्य कालवा ६५ किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याद्वारे १९७७-७८ पासून सिंचनाकरिता पाणी सोडले जात आहे. परंतु आजपर्यंत या कालव्याचे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १० हजार ६७ हेक्टर असून आजपर्यंत जास्तीत जास्त चार हजार ५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला आहे. ६५ किलोमीटर लांबीच्या कॅनॉलमधून ५० किलोमीटरच्या पुढे पाणी पोहचलेले नाही, असे ते म्हणाले.
कालवा बांधतानाच त्यात त्रुटी निर्माण झाल्याने दारव्हा तालुक्यातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहत आहेत. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या बाबींची दखल घेत जलसंपदा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्प व कालव्यातून सिंचन न होण्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या काट छेदामध्ये त्रुटी असून मुख्य कालव्याची तळरूंदी सुरुवातीचे लांबीत कमी असून व नंतरच्या लांबीमध्ये तळरूंदी अधिक असल्याने पाण्याचा प्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही. तसेच कालव्याची नियमित देखभाल दुरूस्ती न झाल्याने आवश्यक पाणी प्रवाहित होऊ शकत नाही. यावर उपाय शोधण्याकरिता तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असताना औरंगाबाद येथील ‘वाल्मी’ या संस्थेला या कालव्याचा सूक्ष्म अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले. ‘वाल्मी’ या संस्थेकडून या कालव्याच्या संपूर्ण लांबीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला व त्यांनी निरीक्षणाअंती उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार जलसंपदा विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देऊन या संदर्भात वरिष्ठ स्तरावर जलसंपदामंत्री यांच्याकडे वारंवार बैठका घेतल्या, असे आ. राठोड म्हणाले.
जलसंपदा विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार या कालव्याच्या संपूर्ण लांबीमध्ये अस्तरीकरणाचे काम करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्या वेळेसचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सदर कामास प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. सद्यस्थितीत मुख्य कालव्याच्या दुरूस्तीच्या संकल्पनांच्या आराखड्यास मान्यता मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मान्यता प्राप्त होताच निविदा काढण्यात येऊन अडाण प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होणार आहे, असे आ. संजय राठोड म्हणाले. काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा निश्चितच लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Copyright ©