Breaking News यवतमाळ सामाजिक

आज कोरोणा बाधिताची संख्या किती पहा इतर बातम्या सह..

आज कोरोणा बाधिताची संख्या किती पहा इतर बातम्या सह..

प्रकल्पबाधित गावांच्या पुनर्वसनाची कामे वेळेत पूर्ण करा

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

 

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत देण्यात जिल्हा राज्यात प्रथम असल्याबाबत केले कौतुक

 

यवतमाळ, दि 4 फेब्रु जिमाका :- सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाची कामे दर्जेदार होण्यासोबतच ती दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. पूरबाधित गावांचे पुनर्वसन, कोविड लसीकरण आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्याच्या वारसांना अर्थसहाय्य इत्यादी बाबींचा आढावा त्यांनी आज घेतला, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीला आमदार तथा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार विजय खडसे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे उपस्थित होते.

बेंबळा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील 20 गावांच्या पुनर्वसनापैकी 17 गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र दर्जेदार नागरी सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध असतानाही काम अपूर्ण असल्याबाबत श्री वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. सदर नागरी सुविधांची कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी कोहळ लघु पाटबंधारे योजना, बेंबळा, अरुणावती, टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्प, अमडापुर लघु प्रकल्प, निम्न पैनगंगा, खर्डा लघु प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्पातील उदापुर, अमडापुर लघु प्रकल्पातील कुरळी, घमापूर या तीन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना श्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात पूर आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान आणि भरपाईबाबत आढावा घेतांना वर्षभरात वीज पडून 21 व्यक्तींचा मृत्यू झाल्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. असे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक गावात वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच मंडळ निहाय वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रलंबित 3 कोटी 18 लक्ष निधी आणि नुकसान भरपाई साठीचा 82 कोटी 31 लक्ष रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळांचा आढावाही श्री वडेट्टीवार यांनी घेतला. जिल्ह्यात 78 आश्रमशाळांपैकी ‘अ’ दर्जाच्या आश्रमशाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून ‘अ’ दर्जाच्या शाळांची यादी पाठविण्याचे निर्देश दिलेत.

कोविड बाबत आढावा घेताना त्यांनी कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुनियोजनामुळे शासनामार्फत आतापर्यंत जिल्ह्यातील 1334 प्रकरणात मदत निधीची मंजूर देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याबाबत वडेट्टीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

__________________________________________________

गेल्या 24 तासात 162 पॉझिटिव्ह ; 240 कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1488

 

यवतमाळ दि. 04 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 162 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1450 व बाहेर जिल्ह्यात 38 अशी एकूण 1488 झाली आहे. त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1447 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78166 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74884 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1794 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 162 रूग्णांमध्ये 65 महिला व 97 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 13, बाभुळगाव 17, दारव्हा पाच, दिग्रस दोन, घाटंजी नऊ, कळंब चार, महागाव एक, मारेगाव चार, नेर 12, पांढरकवडा 18, पुसद तीन, राळेगाव चार, वणी एक, यवतमाळ 61, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1725 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 746 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

___________________________________________________

 

रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन

 

यवतमाळ दि. 04 फेब्रुवारी, : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतुने जिल्ह्यातील बेरोजगार तरूण तरूणींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ज्यांनी अद्याप रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी केली नाही किंवा अद्ययावत केली नाही अशा उमेदवारांनी आधार कार्ड, नावात बदल, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.
__________________________________________________

व्यसनमुक्ती व स्वयंसेवी संस्थांकडून समिती सदस्यत्वकरिता प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ दि. 04 फेब्रुवारी, : अवैध दारू निर्मिती, वाहतुक व विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती तसेच जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. सदर समितीमध्ये दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व व्यसनमुक्ती संस्थेतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला सदस्यांच्या नावाचे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. संबंधीतांनी व्यसनमुक्ती कार्यासह आपले प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ येथे सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी कळविले आहे.

_________________________________________________

 

“जागतिक सुर्य नमस्कार दिन”

कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्यांचा क्रीडा विभाग करणार गौरव

 

यवतमाळ दि. 04 फेब्रुवारी, : क्रीडा विभाग तसेच क्रीडा भारती, भारत स्वाभिमान न्यास यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना, मंडळे व युवक संघटना, मंडळे तथा सर्व नागरीकांनी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक सुर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाचे निमित्याने आपल्या स्तरावर कमीत कमी १३ सुर्य नमस्कार घालावे व स्वतः चे आरोग्य सुदृढ ठेवावे. सामुहिकरित्या सुर्यनमस्कार घालतांना सुरक्षीत अंतर ठेवून व कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.

ज्या शाळा/महाविद्यालय तसेच युवक मंडळे, संघटना यांनी सामुहिक सुर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांनी त्याचे फोटो तसेच व्हि.डी.ओ. क्लीप व सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा. उत्कृष्ट आयोजन करणाऱ्यांचा गौरव या कार्यालयाच्या वतीने करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.

Copyright ©