Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक मृत्यू कोरोनाबाधित किती ; इतर बातम्या सह…..

गेल्या 24 तासात एक मृत्यू कोरोनाबाधित किती ; इतर बातम्या सह.

 

यवतमाळ दि. 03 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 124 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 259 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1518 व बाहेर जिल्ह्यात 48 अशी एकूण 1566 झाली आहे. त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1525 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1118 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 124 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78004 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74644 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1794 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेली २२ वर्षीय महिला यवतमाळच्या मोठे वडगाव परिसरातील आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 124 रूग्णांमध्ये 59 महिला व 65 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील आठ, बाभुळगाव सात, दारव्हा नऊ, दिग्रस 27, घाटंजी एक, कळंब नऊ, महागाव चार, नेर एक, पुसद आठ, राळेगाव पाच, उमरखेड एक, वणी तीन, यवतमाळ 34, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 21 हजार 782 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 43 हजार 490 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 11.09 आहे तर मृत्यूदर 2.30 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1713 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1713 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 53 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 734 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
__________________________________________________

 

अब्दुल कलाम अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

 

यवतमाळ दि. 03 फेब्रुवारी, : यवतमाळ शहरात नुकतेच स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेल्या अब्दुल कलाम अभ्यासिकेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज भेट दिली. याप्रसंगी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून व त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके आहेत का, अभ्यासिका किती वेळ सुरू राहते, सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत का याबाबत विचारणा केली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना वायफाय सुविधा व ‘द हिंदु’ हे वृत्तपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा ग्रंथपाल राजेश कोरे यांना दिल्या. तसेच कुरूक्षेत्र, योजना व लोकराज्य ही मासिके देखील अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या ठिकाणी महिला बचत गटमार्फत कॅन्टीन चालवण्याबाबत चाचपणी करण्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा ग्रंथपाल राजेश कोरे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
__________________________________________________

कोरोना लसीकरण : दुसऱ्या डोजचे काम वाढवा

जिल्हाधिकारी यांच्या कोविड टास्क फोर्सला सुचना

 

यवतमाळ दि. ३ : मागील २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणात दुसरा डोज देण्याचे काम खुप कमी झाले आहे. आपल्याकडे पहिल्या डोजचा अनुभव आहे, टिम उपलब्ध आहे, तरी स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिक यांचा सहभाग घेऊन व प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन योग्य नियोजनातून दुसऱ्या डोजचे काम वाढविण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

कोरोना टास्क समितीची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, सर्व गट विकास अधिकारी तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात उमरखेड, पुसद, महागाव व आर्णी तालुक्यात लसीकरण कमी असल्याने एकूण टक्केवारीत संपूर्ण जिल्हा मागे पडत आहे. लसीकरण कमी असललेल्या ठिकाणी स्थानिकांच्या अडचणी जाणून त्यावर योग्य पर्याय काढावा. फिरते लसीकरण केंद्र, घरोघरी टिम पाठवून लसीकरण करावे. पुढील २० दिवसांत जिल्ह्यात दुसऱ्या डोजचे काम ५१ टक्के वरून ७५ टक्के व्हावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करावे. आपल्या चांगल्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेण्यात येईल तसेच दुसऱ्या डोजमध्ये ७० टक्के लसीकरण झाल्यावर निर्बंधातूनही जिल्ह्याला शिथीलता मिळेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. १५ ते १७ वयोगटाचे लसीकरण व प्रिकॉशन डोज तसेच कोरोना टेस्टींग वाढविण्याबाबतही त्यांनी सुचना दिल्या.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
__________________________________________________

आदिवासींसाठी 112 कोटीच्या प्रारूप आराखड्यास आदिवासी विकास मंत्र्यांची मान्यता

 

जिल्ह्यधिकारी यांच्या जोरकस मागणीमुळे जिल्ह्याला 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

 

जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

 

 

यवतमाळ, दि 3 फेब्रु जिमाका:- जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी जिल्हा आदिवासी उपयोजनेत सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हाधिकारी यांची 10 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी मंजूर करीत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 112 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी मंजुरी दिली.

 

आज जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सचिव डॉ. अनुपकुमार यादव हे मंत्रालयातून, तर अमरावती येथून आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे, नाशिक येथून आयुक्त हिरालाल सोनवणे, तर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, नियोजन अधिकारी संग्राम पवार उपस्थित होते.

 

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत जिल्ह्यात पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत 71 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असून 126 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदवली होती. तर पुसद प्रकल्प कार्यलयांतर्गत 28 कोटी 39 लक्ष रुपयांच्या आर्थिक मर्यादेत प्रस्ताव तयार केला होता, तसेच 52 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदवली होती. दोन्ही कार्यालयांनी मिळून 102 कोटी 66 लक्ष रुपयांच्या वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव सादर केला.

 

आज जिल्हाधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे आदिवासी आश्रमशाळा मुख्य रस्त्यांशी जोडणे, आश्रमशाळांकरिता फिरते वैद्यकीय पथक सुविधा देणे, आश्रमशाळांना बारमाही पाणी पुरवठा करण्याकरता नळ पाणीपुरवठा योजना राबविणे, आदिवासीबहुल गावे, पाडे यांच्या रस्ते दुरुस्ती, आदिवासी समाजातील कुटुंबाकरता घरगुती वीज कनेक्शन व कृषी पंपाकरता वीज कनेक्शन, नळपाणीपुरवठा नसलेल्या गावांसाठी तरतूद, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी सुविधा निर्माण करणे, औषधी व आहार पुरवठा करणे, तसेच पारधी विकास योजना इत्यादी अत्यंत महत्वाच्या कामांकरिता 178 कोटी निधी आवश्यक असून रु. 178 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी मंजूर करण्याबाबत विनंती केली. मात्र सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निधीची कमतरता असल्याने अतिरिक्त मागणीपैकी 10 कोटी रुपये देण्यास आदिवासी विकास मंत्र्यांनी मान्यता दिली.

 

यावेळी जिल्हाधिकारी यांनी पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण करतांना जिल्ह्यात झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती देताना आदिवासी शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी निधी उपलब्ध, घाटंजी व पांढरकवडा येथे सांस्कृतिक संकुल बांधकाम, सर्व शासकीय आश्रम शाळेवर नऊ मीटर उंचीचे हायमास्ट लाईट आश्रम शाळेला कंपाउंड वॉल सर्व पार्थिव वेळेवर बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले पारधी पॅकेज अंतर्गत निरिक्षा वाटप करण्यात आले आदिवासी लाभार्थ्यांना संकरित गाई म्हशी यांचे वितरण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ इत्यादी नाविन्यपूर्ण कामे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

बैठकीला इतर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

Copyright ©