Breaking News यवतमाळ सामाजिक

लसीकरण जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

गेल्या 24 तासात आजचे बाधित किती ? ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1702 इतर बातम्या सह……

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 167 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 203 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1660 व बाहेर जिल्ह्यात 42 अशी एकूण 1702 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1661 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1156 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 989 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77880 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74385 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1793 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 167 रूग्णांमध्ये 72 महिला व 95 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 30, बाभुळगाव सहा, दारव्हा सहा, दिग्रस 19, घाटंजी 11, महागाव एक, नेर एक, पांढरकवडा 11, पुसद नऊ, राळेगाव एक, वणी सहा, यवतमाळ 55, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 20 हजार 670 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 42 हजार 480 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 14.45 आहे तर मृत्यूदर 2.30 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1716 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 50 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1716 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 739 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 855 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

____________________________________________________

लसीकरण जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी: कोरोना लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.

हा चित्ररथ संपुर्ण जिल्ह्यात विशेषत: लसिकरण कमी असलेल्या उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, झरीजामणी, आर्णी येथील शहरी व ग्रामीण भागात फीरून लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे.

_________________________________________________

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज 15 फेब्रुवारीपुर्वी सादर करा

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी, : समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सादर करावयाचे आहे.

तरी सन 2021-22 चे परिपुर्ण अर्ज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पुर्वी सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

_________________________________________________

विधी सेवा प्राधिकरणद्वारे दिव्यांगाकरीता कायदेविषयक प्रबोधन

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी : समाजातील दुर्बल स्तर व सीमांकित वर्गाकरीता मोफत आणि सक्षम विधी सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ व महात्मा जोतीबा समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी दिव्यांगाकरीता असलेल्या कायदेशिर योजना, २०२१ व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ आणि वाहतुकीचे नियम या विषयावर आभासी पध्दतीने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए. शेख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन महात्मा जोतीबा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वाशिमकर, आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ॲड. सुप्रिया रोकडे, जिल्हा वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संजय आत्राम उपस्थित होते.
________________________________________________

नेहरु युवा केन्द्र द्वारा “जिल्हास्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सव संपन्न

 

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी : नेहरू युवा केन्द्र, यवतमाळ या कार्यालयाद्वारे 01 फेब्रुवारी 2022 रोजी आयुर्वेद सेवा समिती, दयाभाई मावजी मजिठिया आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथील सभागृहात जिल्हास्तरीय लोक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विविध लोक संस्कृतीचे प्रदर्शन सादर करण्यात आले.

याप्रसंगी श्रीसाई नृत्य कला मंदीर यवतमाळ यांनी कावडी अट्टम ही कला सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. दितीय क्रमांक नृत्यानंद ग्रुप यवतमाळ यांनी जोगवा सादर करुन तर तृतीय क्रमांक रमाई ग्रुप पांढरकवडा यवतमाळ यांनी लोक नृत्य सादर करुन पटकाविला. उत्तेजनार्थ बक्षिस अविष्कार डांस ग्रुप दारव्हा यांना देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता नेहरु युवा केन्द्राचे सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक स्मिता ठेंगणे, प्रविणा भोयर यांनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडून उपस्थितांना आनंदीत केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. समीर बेलोरकर, दयाभाई मावजी मजिठिया, डॉ. अशोक गिरी, सचिन वानखडे, किरण जवके, सुरी गौरी डेहणकर, सौ. प्रियंका बिसने, नेहरू युवा केन्द्राचे जिल्हा अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढेंगे हे उपस्थित होते.

_______________________________________________

चापडोह झोन अंतर्गत नळ पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी : यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत दर्डा नगर ईएसआर येथे इनलेट, ऑऊटलेट तसेच बायपास व्यवस्थेकरिता क्रॉस कनेक्शनच्या कामासाठी दिनांक 2 व 3 फेब्रुवारी रोजी दोन दिवस चापडोह झोनअंतर्गत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

यामुळे दर्डा नगर, सुयोग नगर टाकी, शिवाजी नगर टाकी, वनवासी मारोती, बेले लेआऊट इत्यादी भागातील पाणी पुरवठा बंद राहील, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता निखिल कवठळकर यांनी कळविले आहे.
_________________________________________________

 

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप

 

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदित असलेल्या सक्रिय पात्र बांधकाम कामगारांना मे. इंडो अलाईड प्रोटीन फूड्स प्रा.लि. मुंबई व मे. गुनिना कमर्शियल प्रा.लि. मुंबई या कंत्राटदार कंपनीमार्फत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जवळ, लोहारा, यवतमाळ येथे सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येत आहेत.

बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी आवश्यक दस्ताऐवजासह स्वत: उपस्थित राहून संच घ्यावेत. सदर संच मंडळाकडून नियुक्त कंपनीद्वारे निशुल्क वाटप होत असल्यामुळे बांधकाम कामगारांडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच यासाठी कोणत्याही दलाल, मध्यस्थी किंवा अन्य व्यक्ती यांची वापटपाकरिता नेमणूक करण्यात आलेली नाही. तरी कोणत्याही भूलपाथांना बळी पडू नये व फसगत करून घेवू नये असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

____________________________________________________

मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमिनी विकास व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व सुविधा, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ओबीसी-व्हीजेएनटी आश्रमशाळा व कोवीड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक. दु. 1 ते 2 राखीव. दु. 2 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 वा. नागपूरकडे प्रयाण करतील.

____________________________________________________

तुर खरेदी नोंदणीस 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी: पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडतर्फे तुर खरेदीसाठी नोंदणीची तारीख आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी 20 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आली होती. प्रत्यक्ष खरेदी दि. 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 पर्यत खरेदी सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून नोंदणी व खरेदी वाढ होण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©