Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 1 चां मृत्यू ,तर किती कोरोणा बाधित,पहा इतर बातम्या सह.. ; एक मृत्यू

गेल्या 24 तासात 1 चां मृत्यू ,तर किती कोरोणा बाधित,पहा इतर बातम्या सह..; एक मृत्यू

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1738

यवतमाळ दि. 01 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 101 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 178 जण कोरोनामुक्त झाले असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1706 व बाहेर जिल्ह्यात 32 अशी एकूण 1738 झाली असून त्यातील 53 रूग्ण रूग्णालयात तर 1685 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 965 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 101 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 864 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77713 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74182 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1793 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये डोर्लीपुरा यवतमाळ येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 101 रूग्णांमध्ये 48 महिला व 53 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील एक, बाभुळगाव एक, दिग्रस दोन, घाटंजी आठ, कळंब एक, मारेगाव आठ, नेर 13, पांढरकवडा एक, पुसद 22, उमरखेड दोन, वणी पाच, यवतमाळ 34 व इतर जिल्ह्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 19 हजार 472 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 41 हजार 480 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.48 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 10.47 आहे तर मृत्यूदर 2.31 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1704 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 62 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1704 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 60 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 727 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 855 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
___________________________________________________

महाविद्यालये ४ फेब्रुवारी तर शाळा ७ फेब्रुवारी पासून अनलॉक

 

दोन डोज घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात उपस्थित राहण्यास परवानगी

ग्रामीण भागात पहिलीपासूनचे तर शहरी भागात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार

 

 

यवतमाळ दि. 01 फेब्रुवारी : जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग तसेच शहरी भागातील इयत्ता पाचवी पासूनचे वर्ग दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरू करण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.

इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग यापुर्वीच 27 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहेत तर शहरी भागातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत यथावकाश निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.

शासनाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्याचे, पालकांना लसिकरणासाठी प्रोत्साहीत करण्याचे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत सकाळ व दुपार च्या पाळीत वर्ग भरविणे, मैदानी खेळ, स्नेहसंमेलन इ. गर्दीचे कार्यक्रमांवर बंदी, सर्दी, ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती न करण्याचे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच निर्देशीत सूचनांचे शाळेत पालन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासुन सुरू होणार :

जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थामधील नियमित वर्ग दिनांक 04 फेब्रुवारी 2022 पासून विशेष सुचनांचे पालनास प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांमध्ये ज्यांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशा विद्यार्थी/ विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापि, लसीकरण (दोन्ही डोस) न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

विद्यापीठ /महाविद्यालयांच्या दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात. तद्नंतर घेण्यात येणा-या परीक्षा ऑफलाईन/ ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा विद्यार्थी अथवा त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्यविषयक इतर समस्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याची ऑफलाईन/ ऑनलाईन पध्दतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. काही भागात नेटवर्क सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जिल्हाधिका-यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्याच्या परीक्षा घेण्यात याव्यात.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याना येणा-या संभाव्य अडचणी व शंकांचे निरासन करण्यासाठी विद्यापीठे/ महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाईन नंबर, इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करुन द्यावी. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.

ज्या विद्यार्थी/ विद्यार्थीनींनी कोव्हिड ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख / महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे देखिल लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.

जिल्ह्यातील सुरु होणारी सर्व विद्यापीठे व त्यांच्याशि संलग्नित महाविद्यालयांनी कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश राज्यशासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

__________________________________________________

या महिन्यातील लोकशाही दिन रद्द ई-मेलद्वारे प्राप्त अर्जांवर होणार कार्यवाही

 

यवतमाळ दि. 01 फेब्रुवारी : जिल्हा मुख्यालयातील बचत भवन येथे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या महिन्यातील पहिला सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजीच्या लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. तथापि तक्रारकर्त्यांचे अर्ज yavatmal.lokshahidin@gmail.com या ई-मेल वर स्विकारून त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©