यवतमाळ सामाजिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गायन व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

रोव्हर मोजणी यंत्रामुळे जमीन मोजणीला मिळणार गती

यवतमाळ, दि,31 :- एक एकर शेतजमीन किंवा प्लॉटची मोजणी करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने 1 दिवस लागायचा तर आधुनिक रोव्हर यंत्राच्या साह्याने पारंपरिक मोजणीच्या 5 ते 6 पट जलद गतीने मोजणी होणार असल्याने जमीन मोजणीला गती मिळणार आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागागाकडे असलेले जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे यामुळे मार्गी लागतील असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.

रोव्हर मशीन हे (GPS) जीपीएस वर आधारित असल्याने मोजणी काम अतिशय अचूक होऊन मोजणी कामाचा दर्जा आणखी वाढणार आहे. अत्याधुनिक मोजणी यंत्र सॅटेलाईटशी जोडले असल्यामुळे अचूक अक्षांश व रेखांश दर्शविते. त्यामुळे जमीन मोजमापमध्ये अचुकपणा व पारदर्शीपणा येतो. याचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना होणार आहे.

अपुऱ्या मनुष्य बळाअभावी जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे जलद निकाली निघणार असून भूकर मापकावरील ताण सुद्धा कमी होणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या जमिनीचे भूसंपादन मोजणी काम, वनहक्क दावे मोजणी जलद वेगाने पूर्ण होणार आहे.

रोव्हर मशीन हे हाताळण्यास अतिशय सोईचे आणि सोपे असून सहज वाहतूक योग्य आहे. जागेवर उंच पीक असणे किंवा जमिन दलदलची असणे इ. जमिनीवरील अडथळे असतांना यापूर्वी मोजणी करता येत नव्हती, मात्र रोव्हर यंत्रामुळे अडथळे असतांना देखील मोजणी करता येणार आहे.मोजणी जलद होत असल्यामुळे पावसाळयात थोडा वेळ जरी पाऊस थांबला तरी त्यावेळेत मोजणीची कार्यवाही पूर्ण करता येईल.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गायन व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

यवतमाळ दि. 31, : प्रजासत्ताक दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्याचप्रमाणे यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना गौरवचिन्ह देण्यात आले.

संस्थेतील शिल्प निदेशक श्रीकृष्ण रेवसकर आणि उल्हास गोलाइत यांच्या पुढाकाराने आयोजित या देशभक्तीपर कार्यक्रमात संस्थेतील प्रशिक्षणार्थी पत्लवी जोगळेकर, प्रियंका कोल्हे, सुशांत झिंझुरकर, दिव्या टेंभुर्णे, करण चव्हाण, शिवम सहारे, कुणाल बिरगड, विशाल शिंदे, रेणुका गोफणे, अपूर्वा जूनघरे, आचल राठोड या प्रशिक्षणार्थ्यांनी अतिशय सुरेलपणे देशभक्तीपर गीते सादर केली.

या वेळी संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी गायकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून या उपक्रमाचे कौतुक केले. याबरोबरच संस्थेत संविधान दिनानिमित्त जे.एस. वानखडे यांच्या समन्वयनाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक ऋषिकेश वाघ, फिटर ट्रेड द्वितिय क्रमांक प्राजक्ता बोरकर एसपी ट्रेड , तृतिय क्रमांक प्रणाली क्षिरसागर यांना विशेष सम्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन कु. कोमल वाळके व दिव्या मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक एस.ए. पांडे, एस.एम. पोटे व सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले. कार्यक्रमास कार्यालय अधिक्षक सौ. मांडळे, सौ. आगरकर, गटनिदेशक रत्नदर्शी तसेच बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील पेंटर( जनरल )या व्यवसायाचे शिल्प निदेशक उल्हास गोलाईत व गीता पवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या सहकार्याने आजादी का अमृत महोत्सव ही थीम घेऊन अतिशय सुंदर वॉल पेंटिंग तयार केले आहे. संस्थेस भेट देणाऱ्यां सर्वांचे हे वॉल पेंटिंग आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.

शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता 14 गाळे उपलब्ध अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत मुदवाढ

यवतमाळ दि. 31, (जिमाका) : जिल्हा नियोजन निधी नावीन्यपुर्ण योजने अंतर्गत स्थापन करण्यात आलेले कै. वसंतरावजी नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवीणेकरीता हक्काची जागा, बाजार उपलब्ध करुन देण्यासाठी बसस्थानक चौक यवतमाळ येथे दुकान गाळे उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने व्यवस्थापन समिती कै. वसंतरावजी नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्राचे 14 गाळे उपलब्ध करण्यात आले आहे.

सदर दुकान गाळे, आत्मा अंतर्गत नोंदणी असलेले शेतकरी गट, फार्मर प्रोडुसर कंपनी, यांना प्रायोगीक तत्वावर पाच महीन्याकरीता भाड्याने देण्याचे नियोजन आहे. त्याकरीता इच्छुक शेतकरी गट, फार्मर प्रोडुसर कंपनी यांनी जि.प. कृषी विभाग, शासकीय रुग्णालयाजवळ, यवतमाळ, यांचेकडे कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता दिनांक ०५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकरी गटानी याचा लाभ घ्यावा असे जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी कळविले आहे.

मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ दि. 31, : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२१-२२ अंतर्गत नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरण प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसा चालविणा ऱ्या संस्था या धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या मदरसांना केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे.

अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक मदरसांनी शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्यात परीपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्यांत यावे. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव कोणत्याही परीस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद घेण्यांत यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांनी कळविले आहे.

Copyright ©