यवतमाळ सामाजिक

टिपेश्वरचे पर्यटन सुरु करण्याच्या मागणीसाठी आज सत्याग्रह

 प्रतिनिधी यवतमाळ

टिपेश्वरचे पर्यटन सुरु करण्याच्या मागणीसाठी आज सत्याग्रह

मागणी मान्य न झाल्यास गेट पार करु- किशोर तिवारी

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी तसेच गाईड यांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी टिपेश्वर अभयारण्याचे पर्यटन त्वरीत सुरु करावे अशी आग्रही मागणी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता टिपेश्वर अभयारण्य च्या गेट समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा, टिपेश्वर तसेच इतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद का ? असा प्रश्न किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे. सनदी अधीका-यांनी या आठवड्यात तोडगा काढुन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु न केल्यास टिपेश्वर मेन गेट वरून अभयारण्यात प्रवेश करून सनदशील मार्गाने सत्याग्रह करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी या आधीच केली होती. दरम्यान त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी दुपारी 1 वाजता सुन्ना गेट वर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जातो त्याचवेळी राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन का सुरु करण्यात येत नाही असा प्रश्न सुध्दा तिवारी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वर चे अभयारण्य बंद, चालु करण्यात येत असल्यामुळे जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्या वर उपासमारीची पाळी आली आहे. विशेष येथे कार्यरत सर्वच जिप्सी चालक तसेच गाईड्सने कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहे. वास्तविक पाहता गावात सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. टिपेश्वर अभयारण्यात मात्र बाहेरच्या गर्दीच्या तुलनेत मोजकेच नागरीक पर्यटनासाठी येत असतात. असे असतांना पुन्हा येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील जीप्सी चालक तसेच गाईड्सवर उपासमारीची पाळी आली आहे. याव्यतिरीक्त परीसरातील हॉटेल सुध्दा ग्राहक नसल्याने बंद झाले आहे. त्यामुळे तातडीने पर्यटन सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्याने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले.

Copyright ©