यवतमाळ सामाजिक

आजचे कोरोना बाधित किती पहा सविस्तर इतर बातम्या सह.

आजचे कोरोना बाधित किती पहा सविस्तर इतर बातम्या सह.

वणी येथील शासकीय रूग्णालयाचे कामाला गती द्या

– पालकमंत्री संदिपान भुमरे

कोविड, जलजीवन, अपंग कल्याण निधीचा आढावा

सानुग्रह अनुदान मंजुरीचे प्रस्ताव मंजुर करून घेण्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर

प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शाळेत प्राधाण्याचे नळ जोडण्या द्या

अपंग कल्याण निधी तातडीने खर्च करा

कोविड आढावा

यवतमाळ दि. 27 जानेवारी : वणी येथे 100 खाटांचे शासकीय रूग्णालय मंजुर करण्यात आले आहे, मात्र हे रूग्णालय उभारणीच्या कामात आवश्यक गती राखण्यात आलेली नाही तरी रूग्णालय उभारणीचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. रूग्णालयाचे कामात आरोग्य विभागाने आपल्या अडचणी कळविल्यास आपण त्या सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल कोविड उपाययोजना, जलजीवन मिशन व दिव्यांग कल्याण निधी या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया, पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा प्रकल्प संचालक मनोजकुमार चौधर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात नऊ पी.एस.ए. व सहा एल.एम.ओ. प्लॅन्टसह एकूण 98.29 मे.टन ऑक्सीजन साठवण क्षमता निर्मितीचे काम पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केली. तसेच कोवीडमुळे मयत व्यक्तींच्या कुटुंबातील वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत 2376 अर्ज प्राप्त झाले असून 1869 अर्जांना मंजूरी मिळाली आहे. राज्यात सर्वात जास्त अर्ज मंजुर करून घेण्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी सादर केली.

पालकमंत्री यांनी नागरिकांना कोविड लसिकरणाचा दुसरा डोस देण्याकडे विशेष लक्ष देण्याचे तसेच शासकीय वैद्यकीय रुगणालयात स्वच्छता मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या.

जलजीवन मिशनचा आढावा घेतांना पालकमंत्री यांनी गावात पाण्याचे कनेक्शन देतेवेळी कोणतेही गाव सुटू नये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शाळेत प्राधाण्याचे नळ जोडण्या देण्याचे सांगितले. नळ-जोडण्या देतांना अगोदर पाण्याच्या स्रोताची खात्री करून घेण्याचेही त्यांनी सांगितले. दिव्यांग नागरिकांना तिनचाकी सायकल, स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन व आटाचक्कीचा पुरवठा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार व अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार प्राधाण्यक्रमाणे देण्यात यावे व उपलब्ध्य निधी तातडीने खर्च करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
___________________
___________________

आधुनिक मोजणीयंत्राद्वारे नागरिकांचे कामे जलदगतीने करा

– पालकमंत्री

भूमि अभिलेख विभागास अत्याधुनिक मोजणी साहित्याचे वाटप

 

यवतमाळ दि. 27 जानेवारी : भूमि अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेले अत्याधुनिक मोजणी यंत्र सॅटेलाईटशी कनेक्ट होऊन अचूक अक्षांश व रेखांश दर्शविते त्यामुळे जमीन मोजमापमध्ये अचुकपणा व पारदर्शीपणा येतो. याचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना होणार असुन भूमि अभिलेख विभागाने या मोजणीयंत्राचा उपयोग नागरिकांची कामे जलदगतीने पुर्ण करण्यासाठी करावा, असा आशावाद पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण यवतमाळ यांचे निधीतुन यवतमाळ जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयासाठी अत्याधुनिक मोजणी साहित्य खरेदी साठी निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीमधुन खरेदी करण्यात आलेल्या रोव्हर, संगणक, ईटीएस मशीन, प्लॉटर मशीन ई अत्याधुनिक मोजणीयंत्राचे वाटप व लोकार्पण काल पालकमंत्री सांदिपान भुमरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार वजाहत मिर्झा, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवदास गुंड यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अंजू बोपचे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपअधीक्षक बळवंत मस्के यांनी व्यक्त केले.

______________________________________

“यवतमाळचे पक्षी वैभव” पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

 

यवतमाळ दि. 27 जानेवारी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वनविभाग यवतमाळ तर्फे प्रकाशित “यवतमाळचे पक्षी वैभव” या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री संदीप पानभुमरे यांच्या हस्ते काल बचत भवन येथे करण्यात आले. या पुस्तकामुळे पक्षीप्रेमी अभ्यासक व पर्यावरण प्रेमींना यवतमाळचे पक्षी वैभव आकर्षित करुण यवतमाळची नव्याने ओळख होईल व पर्यटनास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक अनंता डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम व पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ.प्रवीण जोशी उपस्थित होते.

सदर पुस्तकात यवतमाळ तालुक्यासह लगतच्या अन्य सहा तालुक्यातील जलाशये माळराने झुडपी जंगले या अधिवासात आढळणाऱ्या स्थलांतरीत व स्थानीक असे 323 पक्ष्यांचे उत्तम छायाचित्र व त्यांचे संक्षिप्त वर्णन दिलेले आहे, सोबतच पक्षी आढळणाऱ्या जागांचा नकाशा दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे सुरवातीला पक्षांची शास्त्रीय सुची दिलेली आहे. या उपक्रमासठी पालक मंत्र्यांनी वनविभागाचे अधिकारी व लेखक प्रा.डॉ. प्रवीण जोशी यांचे अभिनंदन केले व भविष्यात असे प्रकारच्या अन्य उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

______________________________________

 

गेल्या 24 तासात 288 पॉझिटिव्ह ; 246 कोरोनामुक्त

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2112

 

यवतमाळ दि. 27 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 288 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 2069 व बाहेर जिल्ह्यात 43 अशी एकूण 2112 झाली असून त्यातील 84 रूग्ण रूग्णालयात तर 2028 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 508 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 220 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76767 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72864 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 288 रूग्णांमध्ये 110 महिला व 178 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 27, बाभुळगाव चार, दारव्हा 43, दिग्रस पाच, घाटंजी एक, कळंब 12, महागाव तीन, नेर 13, पांढरकवडा 27, पुसद 10, राळेगाव 32, उमरखेड दोन, वणी चार, यवतमाळ 93 व इतर जिल्ह्यातील 12 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 14 हजार 882 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 38 हजार 43 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 56.69 आहे तर मृत्यूदर 2.33 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1675 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 94 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1675 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 91 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 696 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
______________________________________

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज 31 जानुवारीपुर्वी सादर करा

समाजकल्याण विभागाचे आवाहन

यवतमाळ दि. 27 जानेवारी : समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सादर करावयाचे आहे.

तरी सन 2021-22 चे परिपुर्ण अर्ज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी दिनांक 31 जानेवारी 2022 पुर्वी मुळ टि.सी. सह सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

______________________________________

सुशिक्षीत बेरोजगार काम वाटप सभा 1 फेब्रुवारी रोजी

 

यवतमाळ दि. 27 जानेवारी : सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ अंतर्गत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह 31 जानेवारी 2022 पर्यंत कार्यालयात येवून सभेत सहभागाबाबत नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी केले असल्याचे, कार्यकारी अभियंता मु.गो.कचरे यांनी कळविले आहे.

Copyright ©