यवतमाळ सामाजिक

आज एकाचा मृत्यू,तर बाधिताचा वाढता आलेख ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2070

आज एकाचा मृत्यू,तर बाधिताचा वाढता आलेख
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2070

जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत अग्रेसर ठेवण्यासाठी कटिबद्ध
पालकमंत्री

 

पालकमंत्र्यांनी केले मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

यवतमाळ दि. 26 जानेवारी : यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असतांना जनतेच्या कल्याणाची अधिकाधीक कामे झाली पाहिजे, अशी आपली भूमिका असून यासाठी जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या योजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी दिली.

येथील समता मैदानावर (पोस्टल ग्राउंड) आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकासाची कामे केली जात आहेत. मागील दोन वर्षात कोरोना संकटाचे रूपांतर संधीत करून आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी एकशे वीस कोटी रूपये मंजूर केले असून त्यातुन जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणखी अद्यावत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे मयत व्यक्तींच्या कुटुंबातील 600 वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. यात आपला जिल्हा महाराष्ट्रात पहिला आहे. आईवडील दोन्ही गमावलेल्या 12 पैकी 10 मुलांना प्रत्येकी पाच लाख रुपये तात्काळ मदत केली आहे. शिवाय पी.एम. केअर फंड मधून 10 लाख रुपयांची मुदत ठेव मिळण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. एक पालक गमावलेल्या 416 मुलांना वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत अकराशे रुपये दरमाह मदत देण्यात येत आहे.

गरीब व गरजू नागरिकांना पोट भरण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे-अकरा लाख शिवभोजन थाळी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘अन्न सुरक्षा’ योजनेअंतर्गत मोफत गहु व तांदुळ वाटप केले आहे. विविध शासकीय योजनेतून अन्नधान्य वाटपात यवतमाळ जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात 72 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजना जिल्ह्यातून तीन हजार पाचशे कामे प्रस्तावीत केले असून यातून सुमारे सात हजार किलोमीटर पांदण रस्त्यांची कामे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सुरवातीला पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते वीर नारी व वीर माता-पित्यांचा सत्कार करण्यात आली. तसेच यवतमाळ पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत बदकी यांना गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने त्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोद दुबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगीता राठोड, डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, तहसिलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण तसेच विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार व गणमान्य नागरिक उपस्थित होते.

_____________________________________

गेल्या 24 तासात 456 पॉझिटिव्ह

253 कोरोनामुक्त ; एक मृत्यू

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2070

 

यवतमाळ दि. 26 जानेवारी गेल्या 24 तासात जिल्ह्यात 456 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 2039 व बाहेर जिल्ह्यात 31 अशी एकूण 2070 झाली असून त्यातील 91 रूग्ण रूग्णालयात तर 1979 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1690 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 456 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1234 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76479 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72618 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये बाजोरीया नगर, यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 456 रूग्णांमध्ये 151 महिला व 305 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात चार, बाभुळगाव 26, दारव्हा 21, दिग्रस 49, घाटंजी 21, कळंब 11, नेर 53, पांढरकवडा 44, पुसद 30, राळेगाव आठ, उमरखेड एक, वणी 17, यवतमाळ 160, झरी जामणी पाच व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 14 हजार 615 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 37 हजार 960 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 26.98 आहे तर मृत्यूदर 2.34 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1674 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 95 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1674 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 89 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 698 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 6 बेड उपयोगात असून 749 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Copyright ©