Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात किती कोरोना बाधित; 1 मृत्यू ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1868 इतर बातम्या सह

गेल्या 24 तासात किती कोरोना बाधित; 1 मृत्यू ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1868 इतर बातम्या सह

यवतमाळ दि. 25 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 124 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 152 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1840 व बाहेर जिल्ह्यात 28 अशी एकूण 1868 झाली असून त्यातील 77 रूग्ण रूग्णालयात तर 1791 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1057 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 124 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 933 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76023 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72365 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1790 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 76 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 124 रूग्णांमध्ये 59 महिला व 65 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात तीन, बाभुळगाव पाच, दारव्हा चार, दिग्रस सात, घाटंजी सात, मारेगाव एक, पांढरकवडा सहा, पुसद दोन, राळेगाव दोन, उमरखेड तीन, वणी 18, यवतमाळ 60 व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 12 हजार 749 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 36 हजार 494 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.35 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 11.73 आहे तर मृत्यूदर 2.35 आहे.

जिल्ह्यातील एक अहवाल ओमिक्रान पॉझिटीव्ह :

जिल्ह्यातून दरमहिण्याल कोरोना पॉझिटीव्ह आलेले 100 नमुने दिल्ली व 30 नमुने पुणे येथे असे एकूण 130 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी दर महिण्यात पाठविण्यात येतात. त्यातील 13 जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यापैकी एक अहवाल ओमीक्रॉन पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली आहे. पाझिटिव्ह आलेला रूग्ण 28 वर्षीय पुरूष असून परदेशातून यवतमाळ शहरात आला होता. तपासणीचे वेळी या रुग्णाला कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्याची प्रकृती आता पुर्णपणे बरी झाली आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1681 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 88 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1681 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 80 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 707 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 8 बेड उपयोगात असून 747 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

______________________________________

मतदानातून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ दि. 25 जानेवारी : मतदारांनी चांगले शासन तयार करण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडणून द्यावे. संविधानाने मतदारांना मतदानाची शक्ती दिली आहे. ही शक्ती ओळखून कोणत्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी प्रत्येक निवडणूकीत मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिवसानमित्त जिल्हा प्रशासनातर्फे जाजू कॉलेज येथे आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे, तहसिलदार कुणाल झाल्टे, जाजू कॉलेज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, प्राचार्य दिनेश चांडक उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवमतदार वाढले आहे. निवडणूक साक्षरतेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाची नोंद शासनाने घेतली आहे. हे टिमवर्क मुळे शक्य झाले असून यात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्वांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तस्कीन फातेमा, निकिता धुमणे, विनायक चावरे, शेख इरशाद या नवमतदारांना इपीक मतदार छायाचित्र ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेते तनुश्री मुरतकर, श्रद्धा घाडेकर, अमृता यावरी, देव्यानी दुधे, दादाजी किनकर, भाग्यश्री गहुकार, तुषार खडेकर, मिनाली रहाटे, तनया देशमुख, समृद्धी अलोणी, बोधीसत्व खंडेराव, रिद्धी कांडूरवार यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शैलेश काळे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कुणाल झाल्टे, नायब तहसिलदार आर. बी. बीजे, ग्रामसेवक शेख उस्माण, ऑपरेटर अमित मोगरकर यांचा जिल्हास्तरावर उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला.

*मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे निवडणूक विभागातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती विभागातून यवतमाळच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.*

कार्यक्रमाला संजय गोरलेवार, अतुल शिंगरवाडे, शितल पाटील, निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जाजू कॉलेज येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

______________________________________

जिल्ह्यात “एक गाव एक दिवस मोहिम राबवा”

कृषी धोरण २०२० चा प्रचार-प्रसार वाढवा

– ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

 

• जिल्ह्यातील ऊर्जाविकासाचा घेतला आढावा

 

यवतमाळ दि. 25 जानेवारी : शेतकरी हिताचे धोरण अंमलात आणूनही जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी या धोरणात सहभागी होत नसल्याचे दिसून येत असून याचे कारण शोधावे. त्यांना कृषी धोरणाची माहीती देण्यासाठी व वीज ग्राहकांच्या इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हयात ” एक गाव एक दिवस” सारख्या मोहिमा राबविण्यात याव्यात, तसेच मुकूटबन येथील १३२ केव्ही उपकेंद्र व चालू असलेली कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महापारेषण विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

 

वणी येथील बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात काल झालेल्या झालेल्या महावितरण, महापारेषण आणि महाऊर्जा विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरण नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के, महाऊर्जाचे उप महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, अधिक्षक अभियंते सुरेश मडावी, दिलीप खानंदे, हरीश गजबे, मुकेश तट्टे, गोविंद जाधव, प्रमोद पखाले यांच्यासह कार्यकारी अभियंते नरेंद्र कटारे, भारतभूषण औगड, सचिन जीवने उपस्थित होते.

 

यावेळी ऊर्जामंत्री यांनी विविध कामाचा सविस्तर आढावा घेतला. कृषी धोरणाचा आढावा घेतांना जिल्ह्यातील कृषी थकबाकीच्या १४४७ कोटी पैकी निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफ करून येत्या ३१ मार्चपुर्वी ग्राहकांनी लाभ घेतल्यास कृषी ग्राहकांना ६७ टक्क्यांपर्यंत माफी देणारे व शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणारे हे धोरण असल्याचे शेतकऱ्यांना पटवून देण्यात यावेत, अशा सुचना त्यांनी दिल्या. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेत उभ्या पीकामुळे आतापर्यंत न देता आलेल्या (HVDS) योजनेतील १२७६ वीज जोडण्या आता तत्काळ देण्याचे निर्देश दिले. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जिल्ह्यात ८८३ वीज जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी, या योजनेत आणखी वीज जोडण्या देणे शक्य असल्यास तसे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयांना सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात महापारेषणच्या देवळी – घाटोडी २२० केव्ही, पांढरकवढा – वणी २२० केव्ही या अती-उच्च दाब वीज वाहिन्यांचे काम सुरू असून मुकूटबन येथे १३२ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करून त्याचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी मुख्य कार्यालयात पाठविल्याची माहिती महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के यांनी यावेळी दिली. तसेच १३२ के केव्ही पांढरकवढा उपकेंद्राची क्षमता वाढ करून येत्या मार्च पर्यंत त्याचे रूपांतर २२० केव्ही उपकेंद्रात होणार असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंता मस्के यांनी दिली.

Copyright ©