यवतमाळ सामाजिक

शासन आणि प्रशासनाने कोचिंग क्लासेसचा सबंध शाळा-कॉलेज बरोबर जोडू नये

शासन आणि प्रशासनाने कोचिंग क्लासेसचा सबंध शाळा-कॉलेज बरोबर जोडू नये

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन द्वारे शालेय शिक्षण राज्य मंत्री, मा. नामदार बच्चुभाऊ कडू, यांना निवेदन

यवतमाळ :
कोचिंग क्लासेस हा सुशिक्षित बेरोजगारांचा व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यवसायाप्रमाणे कोचिंग क्लासेसचा व्यवसाय सुद्धा 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. केंद्र शासन जर कोचिंग क्लासेसला MSME मध्ये समाविष्ट करून लघु उद्योगाचा दर्जा देत असेल तर कोचिंग क्लासेसची तुलना शाळा-कॉलेज बरोबर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम लावून राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस तात्काळ सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने शालेय शिक्षण राज्य मंत्री, मा. नामदार बच्चुभाऊ कडू यांना आज मंगळवारी शासकीय विश्रामगृहात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपासून सतत शिक्षण बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होऊन विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचलेले आहे त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटल्यामुळे शिक्षणाचा दर्जाही खालावला. सततच्या शिक्षण बंद मुळे ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकली जात आहेत. शाळा सुरू ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो असे कोणतेही शास्त्रीय पुरावे मिळालेले नाहीत, त्यामुळे कोरोना काळात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अयोग्य आहे,असे जागतिक बॅंकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जेमी सावेन्द्र यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
दिवाळीनंतर, शिक्षण क्षेत्राला पुन्हा गती यायला लागली होती. तेवढ्यातच पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी रेट न पाहता
शासनाने महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालय व कोचिंग क्लासेस सरसकट बंद करून राज्यातील विद्यार्थ्यांचे, पर्यायाने, भावी पिढीचे भवितव्य पुन्हा अंधारमय करणार आहे. संसर्गजन्य पार्श्वभूमीवरती शासनाने घेतलेली काळजी ही जरी हितावह असेल तरीही मुलांकरिता घातक ठरत आहे.
पालक स्व:इच्छेने आपल्या पाल्याला कोचिंगसाठी पाठवत असेल व विद्यार्थी येत असेल तर शैक्षणिक सेवा व्यवसाय म्हणून राज्य शासनाला का आक्षेप असावा? शाळा-कॉलेजेस पेक्षा कोचिंग क्लासेस मध्ये सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात…हा विश्वास गेल्या दीड वर्षांमध्ये पूर्णपणे सेवा समर्पित वृत्तीनं कार्य करणाऱ्या प्रामाणिक कोचिंग क्लासेस संचालकांनी मिळवलेला आहे आणि म्हणूनच आजही पालक शाळा-कॉलेजेस पेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये मोठ्या विश्वासानं आपल्या पाल्याला पाठवायला तयार आहे आणि म्हणून शासनाने सर्व बाजूंचा विचार करून तात्काळ सर्व कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्याबाबतचा नवीन आदेश काढावा व यापुढे कोणतेही निर्बंध आणतांना शासन आणि प्रशासनाने कोचिंग क्लासेसचा सबंध शाळा-कॉलेज बरोबर जोडू नये कारण कोचिंग क्लासेस हा व्यवसाय आहे इतर व्यवसायाप्रमाणे महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस संचालक वेगवेगळे शासनाचे कर भरतो त्यामुळे शाळा-कॉलेजेस बंद केले तर कोचिंग क्लासेस बंद करू नये व इतर व्यवसायाप्रमाणे महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस नियम व अटी सह ५०% ने सुरु ठेवण्याची अनुमती दयावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी श्री.योगीराज अरसोड, अध्यक्ष, विदर्भ विभाग, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (PTA) तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) , जिल्हाध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष शैलेश दुबे, जिल्हासंघटक मोहनसिह शेर , कोषाध्यक्ष संदीप देवपारे, महिला जिल्हाध्यक्ष अस्मिता वैद्य, यवतमाळ तहसील अध्यक्ष सौ. मेघा भास्करवार, सहसंघटक सौ. अंजली माटे, अजिंदार चावला, राम राठी, दिनेश बिसेन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©