यवतमाळ सामाजिक

एकल महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम

एकल महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम
———————————————
वाणाच्या स्वरूपात संविधानाची प्रास्तविक महिलांना भेट
———————————————-
माऊली संस्थेचा पुढाकार
———————————————-
घाटंजी:- सौभाग्याचं लेण हरवलेल्या महिलांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचा काम माऊली बहुउद्देशीय संस्था, घाटंजी मार्फत तालुक्यातील सर्वात जास्त एकल महीला असलेल्या कोपरा गावात करण्यात आले.
मकरसंक्रात म्हटलं तर सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण.आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रात साजरी करतात. याच मकरसंक्रातीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून संस्थेमार्फत
‘समतेची मकर संक्रात ‘ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकल महिलांच्या सन्मानासाठी हा मकरसंक्रातीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
समाजामध्ये एकल महिलांना सणावाराला तसेच इतर सर्वच ठिकाणी जी वागणूक मिळते, ज्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघितले जाते, त्यांना जे दुय्यम स्थान दिलं जात,त्यांना जी विषमतेची वागून दिली जाते
ह्या सर्वच समाज विघातक बाबींना आळा बसावा व एक संविधानीक मूल्य जपणारी समाज व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ह्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात एकल महिलांना संपूर्ण देशाला समतेची शिकवण देणाऱ्या संविधानाच्या प्रास्ताविक वाण स्वरूपात देण्यात आल्या. तसेच यावेळी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सूचना व नियमावली चे पालन करून सदर कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाह प्रतिबंधित कायदा २००६ व एकल महिलांसाठी असलेल्या शासकीय योजना आणि कोविड च्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता. आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
मकर संक्रातीचा सण हा वर्षातील पहिलाच सण. त्यामुळे मोठ्या उत्साहात ही संक्रात साजरी केली जाते. या दिवशी अनेक महिला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना वाण देण्यासाठी आमंत्रण देतात. अशा कार्यक्रमांत मात्र विधवा महिलांना कोठेही आमंत्रण दिल जात नाही. आता मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून या महिलांनी आनंदात आपली संक्रात साजरी केली. कोपरा गावातील सहभागी एकल महिलांना आपला जोडीदार सोडून गेल्याच दुःख होतंच, पण चेहऱ्यावर एक सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता. हाच आनंद आणखी द्विगुणीत होण्यासाठी समाजाने आता पुढे येण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी समजाणे या एकल महिलांनासुध्दा माणूस म्हणुन स्वीकारने व त्यांचा सन्मान करणे तितकेच गरजेचे आहे.
यावेळी आकाश बुर्रेवार, ऋषाताई बोरकर,पूनम सीसले, जीवनदास चांदेकर, मीराबाई रामटेके, सुनंदा धुर्वे, मंदाबाई पोयाम, शांताबाई मेश्राम, किरणबाई बोरकर, अंजलीताई उमेकर,दुर्गा मेश्राम, लीलाबाई येरमे, संस्थेचे संचालक मंडळ व आदी महिला उपस्थित होत्या.
—————————————-
एकल महिलांकडे समाज एका वेगळ्या दृष्टीने बघतो. हीच दृष्टी आणि दृष्टीकोन बदलण्याचं माऊली बहुउद्देशीय संस्थेने ठरवलं आहे. त्यासाठी विवीध उपक्रमाचे आयोजन करून तसेच शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल.
-आकाश बुर्रेवार
(माऊली बहुद्देशीय संस्था घाटंजी)
—————————————-

Copyright ©