यवतमाळ सामाजिक

अन् यवतमाळात साजरा झाला ‘शकुंतला वाढदिवस

अन् यवतमाळात साजरा झाला ‘शकुंतला वाढदिवस

रेल्वे बचाव सत्याग्रहींचा पुढाकार

यवतमाळ – यवतमाळ- अचलपूर या नॅरोगेज रेल्वेमार्गावर १०८ वर्षांपूर्वी १ जानेवारी १९१३ रोजी पहिली मालवाहू रेल्वे धावली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून येथील रेल्वे स्थानकावर आज शनिवारी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींच्या वतीने ‘शकुंतला’चा १०९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रेल्वे स्थानक सजवून आणि केक कापून साजरा करण्यात आलेल्या या सोहळ्यास शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. शकुंतला रेल्वेचा सर्व्हे १९०९ साली पूर्ण झाला होता. अवघ्या चार वर्षात पटरी, पूल वगैरे काम पूर्ण करून २९ डिसेंबर १९१३ रोजी मुंबई रेल्वे बोर्डाने अंतिम परीक्षण केले. या मार्गावर १ जानेवारी १९१३ ला पहिली मालगाडी धावली. १ जानेवारी १९१४ ला पॅसेंजर रेल्वे धावली. तीच पुढे शकुंतला म्हणून जगप्रसिद्ध झाली. या दिवसांचे औचित्य साधून २९ डिसेंबर रोजी यवतमाळ रेल्वे स्थानकावर शकुंतला रेल्वे बचाव आंदोलन करण्यात आले. ३० डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तर आज शनिवारी सकाळी नववर्षाचा पहिलाच दिवस शकुंतलाच्या रेल्वे स्थानकास सजवून, केक कापून शकुंतला रेल्वेचा १०९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शकुंतला रेल्वे सुरू व्हावी, ती हेरिटेज रेल्वे, पर्यटक रेल्वे म्हणून जतन करण्यासाठी शकुंतला रेल्वेत कार्य करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. आजच्या कार्यक्रमास शकुंतला रेल्वे बचाव आंदोलनाचे संयोजक विजय विल्हेकर, जयंत बापट, प्रशांत भरूट, वृषभ भरूट, नावेद शेख, भावेश भरूट, सुनिल भरूट, अमिन मखवाणी, जावेद आखबानी, सय्यद वसीम, पंजाब घोडे, राज यादव, चंदन हातागडे, शाम दाणी, सिंधू विल्हेकर, समर दुर्गे, हरिराम शर्मा आदी सहभागी झाले होते. अचलपूर रेल्वे स्थानकावरही आज केक कापून शंकुतलाचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती यावेळी विजय विल्हेकर यांनी दिली.

Copyright ©