यवतमाळ सामाजिक

कर्तव्य पालनातच मानवाधिकाराचे रहस्य – डॉ. विकास जुनगरीकर्तव्य पालनातच मानवाधिकाराचे रहस्य – डॉ. विकास जुनगरी

 वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

कर्तव्य पालनातच मानवाधिकाराचे रहस्य – डॉ. विकास जुनगरी

” मानव म्हणून विकसित होत असताना मानवाधिकार ही आपली फार मोठी आवश्यकता आहे. जागतिक इतिहासात सत्तारूढांनी मानवाधिकाराची पायमल्ली केल्याची असंख्य उदाहरणे पानोपानी सापडतील. भारतामध्ये अधिकारांच्या सोबत कर्तव्याची भूमिका मांडणाऱ्या चिंतनातून आपल्याला हीच गोष्ट स्पष्ट होते की मी माझ्या मानवी कर्तव्यांचे पालन यथोचित रीतीने केले तर इतर कोणाच्या अधिकारांवर गदा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आपल्या स्वतःच्या सुखा सोबत आनंदा सोबत इतरांच्या मानवाधिकारांचे पालन हा मानवाचा सांस्कृतिक विकासाचा निकष आहे.” असे विचार लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जुनगरी यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या माझे गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात दुर्लक्षित मानवाधिकार या विषयावर ते आपले मत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष आणि नगर वाचनालयाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार गजानन कासावार उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी दोन्ही आयोजक संस्थांच्या कार्याचा आढावा घेत व्याख्यानमालेचे वेगळेपण अधोरेखित केले. तथा वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी शैलीतील व्याख्यानात डॉ. जुनगरी यांनी पाश्चात्य इतिहासातील क्रूर राजसत्ता, त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न, पाश्‍चात्त्य देशात झालेली राज्यक्रांती, त्यातून त्यांना जाणवलेली मानवाधिकाराची आवश्यकता इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवेचन करून, आजच्या काळात दहशतवाद, नक्षलवाद, सांप्रदायिकता इ. माध्यमातून मानवाधिकाराचे होत असलेले हनन यावर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गजानन कासावार यांनी सैनिक, पोलीस आणि हिंदूंच्या नरसंहाराच्या वेळी शांत राहणे आणि दहशतवादी, नक्षलवादी आणि अन्य धर्मीय यांच्या नियंत्रणाच्या वेळी गळे काढणे ही स्वयंघोषित मानवतावाद्यांची दुटप्पी भूमिका नेमकेपणाने अधोरेखित केली. मानवतावाद ही सुंदर संकल्पना असली तरी तिचा वापर एकांगी पद्धतीने होऊ नये यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.सा.संघ वणीचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राम मेंगावार, देवेंद्र भाजीपाले आणि प्रमोद लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©