महाराष्ट्र सामाजिक

आरोग्य भारतीचा व्याख्यान सोहळा संपन्न

 

 नगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद चवंडके

आरोग्य भारतीचा व्याख्यान सोहळा संपन्न

निसर्गाशी समरस जीवनशैलीच
स्वास्थ्य सुदृढ राखण्याचे कार्य करते – अशोक वार्ष्णेय

नगर – भारतीय संस्कृती, भारतीय रूढी-परंपरा आणि भारतीय जीवनशैली भारतीयांचे स्वास्थ्य सुदृढ राखण्याचे कार्य प्रभावीपणे करते, असे प्रतिपादन आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव श्री. अशोक वार्ष्णेय यांनी केले.

आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत नगर जिल्ह्याच्यावतीने येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर आरोग्य भारतीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य डाॅ.किशोरकुमार पुरकर, पश्चिम क्षेत्र संयोजक श्री. मुकेश कसबेकर, जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव करंदीकर, सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डाॅ. मंगला भोसले व सौ. ज्योती गोसावी हे मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव करंदीकर यांनी स्वागत केले. प्राचार्य डाॅ.राजेंद्र शिंदे यांनी प्रास्तविक करताना युवक-युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या उपक्रमाची माहिती दिली. उपप्राचार्या डाॅ. मंगला भोसले यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

श्री. वार्ष्णेय पुढे म्हणाले, जीवनशैली बिघडल्यामुळे ८३% रोग होतात, असे आरोग्य सर्व्हेक्षण अहवाल सांगतो. जीवनशैली निसर्गानुरूप असल्यास शारिरीक क्षमता वाढते आणि असाध्य रोगाचा मुकाबला करणे सहज शक्य होते. लोकसंख्येची तुलना करता भारतात कोरोनाकाळात स्वच्छता राखा, गरम पाणी प्या. हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्कार करा, काढा प्या, थाळीनाद करा अशा छोट्या-छोट्या सूचना दिल्या गेल्या. या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने आपला परिसर व गाव कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत झाल्याचे आपण सर्वांनी अनुभवले. आपली जीवनशैली निसर्गाशी समरस राहिल याची दक्षता घेतल्यास आपण जीवघेण्या आजारापासूनही दूर राहू शकतो हे स्पष्ट झाले. आपले जीवन स्वास्थ्य उत्तम राहिले तर अंतर्गत शारिरीक क्षमता वाढते व टिकूनही रहाते. प्रकृती आधारित भोजन केले तर अन्य कोणतेही प्रोटीन घेण्याची गरज पडत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिनही ऋतूनुसार फळे, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. यामधून शुध्द नैसर्गिक व्हिटॅमिन, मिनरल मिळते. आयोडिनयुक्त मीठ भाजी शिजवताना टाकले जाते. भाजीच्या वाफेसोबत मीठातील आयोडिनचा घटक निघून जातो, हे लक्षात घेतले तर भारतीयांना आयोडिनयुक्त मीठाची अजिबात आवश्यकता नाही, हे लक्षात येते. उकडलेले अन्नपदार्थ गरम न करता खाताना त्यावर आयोडिनयुक्त मीठ टाकले जाते, हि वस्तुस्थिती ध्यानी घेतली पाहिजे. प्रकृतीच्या सोबत राहिल्यास स्वास्थ्य उत्तम रहाण्यास मदतच होते. विदेशांवर सिझनल फूड अभियान राबवण्याची वेळ आली आहे. आपण जेथे रहातो त्या भागातील १०० किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील फळे-भाज्या खाव्यात. भारतात राहून विदेशी फळे खाण्याची प्रौढी मिरवू नये.

सकारात्मक विचारच यशापर्यंत नेऊन पोहोचवतात. व्यक्ती स्वस्थ तर परिवार स्वस्थ. परिवार स्वस्थ तर गाव स्वस्थ, गाव स्वस्थ तर राष्ट्र स्वस्थ. आरोग्यभारती हे स्वास्थ्य क्षेत्रात काम करणारे अखिल भारतीय संघटन आहे. योग, निसर्गोपचार, वनौषधी, पर्यावरण हे निसर्ग संरक्षण व संवर्धनास उपयुक्त क्षेत्र आरोग्यभारतीच्या कार्याचे प्रेरणास्थान आहेत. आरोग्यसंपन्न जीवनशैलीमधून आपल्या व कुटूंबियांच्या जीवनाचे रक्षण करा, असे आवाहन श्री.अशोक वार्ष्णेय यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.राजू रिक्कल यांनी केले. प्रा.महेश कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमास आरोग्य भारतीचे सर्वश्री प्रकाशराव कुलकर्णी, कैलास चोथे, श्रीपाद शिंदीकर, मिलिंद चवंडके, प्रकाश गोसावी तसेच प्रा.भूषण देशपांडे, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या. युवक-युवतींमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याच्या आरोग्य भारतीच्या उपक्रमाचे प्राध्यापकवृंदामधून कौतुक करण्यात येत होते.

Copyright ©