यवतमाळ सामाजिक

महागाव, कळंब, मारेगाव, बाभूळगाव नगरपंचायतच्या सदस्यपदासाठी आरक्षणाची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध

महागाव, कळंब, मारेगाव, बाभूळगाव नगरपंचायतच्या सदस्यपदासाठी आरक्षणाची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध

यवतमाळ, दि 28 :- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, मारेगाव आणि बाभूळगाव या नगरपंचायतच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला अशा आरक्षणास अंतिम मान्यता मिळालेली आहे. सदर सुधारित आरक्षणाची अंतीम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचना महागाव, कळंब, मारेगाव आणि बाभूळगाव नगरपंचायत कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय yavatmal.nic.in या वेबसाइटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित नगरपंचायतमधील नागरिकांना सदर अधिसूचना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

_______________________________________

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 30 डिसेंबरला
ऑनलाईन होणार आयोजन

यवतमाळ, दि.28 डिसेंबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा जिल्हास्तरीय शालेय युवा महोत्सवाचे आयोजन 30 डिसेंबरला सकाळी 10 वाजता पासून दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीताचा समावेश करण्यात आलेला आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय हे 15 ते 29 वर्षापर्यंत असावे. प्रवेश अर्ज दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावे. विहित मुदतीपूर्वी संघ लिंक व वेळ कळविण्यात येईल. संघास दिलेल्या लिंकवर व दिलेल्या वेळी ऑनलाइनद्वारे इच्छुक स्थळावरून सादरीकरण करावे लागेल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकास दिलेल्या निश्चित वेळेतच स्पर्धा ऑनलाइन उपस्थित राहून कामगिरी व कौशल्य दाखवावे लागेल. ऑनलाइन परीक्षेकरिता पंच, निरीक्षक क्रीडा कार्यालयातून परीक्षण करतील. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाची व संघाच्या विभागीय स्तरावर निवड करण्यात येईल.

प्रवेश अर्ज सादर करताना संस्थेने/ मंडळाने स्पर्धकाचे प्रवेश अर्ज, विहीत नमुन्यातील ओळखपत्र, (इग्रंजी मधील) आधार कार्ड व जन्मतारखेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर स्पर्धेची बाब स्पष्टपणे नमूद असावी. मागील तीन वर्षात सहभागी झालेले युवक-युवती हे युवा महोत्सवमध्ये सहभागी होऊ शकत नाही. अधिक माहिती व नियमावली लकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ, येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.
______________________________________

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाची फरदड घेऊ नका

कृषी विभागाचे आवाहन

यवतमाळ, दि.28 डिसेंबर : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाची फरदड घेऊ नका, असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते, फुले, व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळीला तसेच मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणखी मोठ्या प्रमाणावर होतो.

डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाटयात अळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतीतील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. डिसेंबर नंतर कपाशीचे पीक ठेवल्याने बोंड अळीच्या वाढीसाठी बोंड सतत उपलब्ध होतात. त्यामुळे वाढीस आणखी चालना मिळते. अळीच्या जीवनक्रमाच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

बि.टी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास अळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. त्यामुळे पुढील हंगामात तिचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध नसल्यास ती सुप्तावस्थेत जाते. या कारणास्तव कपाशीची फरदड घेऊ नये. याकरिता कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्रांचा (श्रेडरचा) वापर करावा व ते सेंद्रिय खतांमध्ये रूपांतरित करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या परहाटया व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे रुईचा उतारा घटून कापसाला बाजार भाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकऱयांनी फरदड घेऊ नये असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

Copyright ©