Breaking News यवतमाळ सामाजिक

अत्याचाराचे बळी ठरलेल्या कुटूंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी देण्यासाठी तातडीने अहवाल सादर करा

अत्याचाराचे बळी ठरलेल्या कुटूंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी देण्यासाठी तातडीने अहवाल सादर करा

जिल्हा दक्षता समितीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ दि. 25 ऑक्टोबर : अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये अत्याचाराचे बळी ठरलेल्या कुटूंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत वर्ग-ड मध्ये नोकरी देण्यासाठी आवश्यक चाचपणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज समाज कल्याण विभागाला दिले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासीक आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती दवे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, पोलीस निरीक्षक पंकज पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

अनुसूचित जाती/जमाती अत्याचाराचे बळी ठरलेल्या प्रकरणात माहे जुलै पर्यंत संबंधीतांना अर्थसहाय्याची 65 प्रकरणे प्राप्त झाली होती. ही सर्व 65 प्रकरणे अर्थसहाय्यासाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी आवश्यक 60 लाख रुपये निधीपैकी 30 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधीची मागणी करून संबंधीतांना अर्थसहाय्य वितरीत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किरकोळ कारणांसाठी कोणतेही प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये असेही त्यांनी सांगितले. अटकपुर्व जामीन मिळालेले जे आरोपी तपासकार्यात मदत करत नसतील त्यांची जमानत रद्द करण्यासाठी न्यायालयात विनंतीपत्र देण्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Copyright ©