Breaking News

सावळी सदोबा येथे 26 आक्टोंबरला रेशन कार्ड बाबत शिबिर

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

सावळी सदोबा येथे 26 आक्टोंबरला रेशन कार्ड बाबत शिबिर
मुबारक तंवर यांच्या मागणीला यश.

सावळी सदोबा व परिसरातील अनेक गावातील नागरिकांना रेशनकार्ड बाबतच्या अनेक अडचणी होत्या, त्या सर्व अडचणी बाबत एखादे शिबिर अथवा कॅम्प घेऊन सोडविण्यात याव्या, अन्यथा 27 ऑक्टोबर पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिला होता.
विशेष म्हणजे सावळी सदोबा येथील मुबारक तंवर यांच्या मागणीची दखल घेत आर्णी तहसीलदारांनी उपोषणाच्या एक दिवस आधीच म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी सावळी सदोबा येथे रेशन कार्ड बाबत शिबिर घेत असल्याचे लेखी पत्र मुबारक तंवर यांना दिलेले आहे.,
सावळी सदोबा व परिसरातील जवळपास 30 ते 35 गावातील अनेक लोकांकडे रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नाही, काही लोकांकडे रेशन कार्ड नाही, काही लोकांचे रेशनकार्ड जीर्ण झालेले असुन फाटलेले आहे व अनेक रेशन कार्ड हरविलेले आहे, काही लोकांकडे घरात सुनबाई आल्या, नवीन अपत्य जन्माला येऊन सहा वर्षाचे झाले तरी रेशन कार्डामधे वाढिव सदस्यांची नोंदच करण्यात आलेले नाही. तर असंख्य राशन कार्ड आजपावेतो ऑनलाइन झालेले नाही, या व अशा अनेक अडचणी रेशन कार्डबाबतच्या होत्या.
ह्या सर्व अडचणी सोडविण्याच्या मागणीचे निवेदन यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी 8/10/2021 रोजी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते किशोर तिवारी, यवतमाळ जिल्हाधिकारी, आर्णीचे तहसीलदार यांना दिले होते. रेशन कार्ड बाबतच्या अडचणी 27 ऑक्टोबर च्या आत सोडविल्या नाही तर सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर 27 ऑक्टोबर बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता.
मुबारक तंवर यांच्या रास्त मागणीची दखल घेत आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांनी 26 ऑक्टोबर मंगळवार रोजी सावळी सदोबा येथे रेशनकार्ड बाबतच्या अडचणी संदर्भात शिबिर घेण्याचे लेखी पत्र मुबारक तंवर यांना दिले असून रेशनकार्डशी संबंधित पुरवठा विभाग, तलाठी यांना सावळी सदोबा येथील शिबिरासाठी उपस्थित राहून रेशन कार्ड बाबतच्या अडचणी तत्काळ सोडण्याचे आदेश दिलेले आहे.
आर्णी पंचायत समितीचे विस्तार‌ अधिकारी (पंचायत) यांनीही सावळी सदोबा भागातील सर्व ग्रामसेवकांना या शिबिरात ऊपस्थित राहण्याबाबत लेखी सुचना दिलेल्या आहे. 26 आक्टोबर रोजी सावळी सदोबा येथे रेशनकार्ड संबंधी होणाऱ्या शिबिराबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Copyright ©